दहशत बिबट्याची - विठ्ठलवाडी हद्दीत बिबट्या दिसल्याच्या चर्चा; वन विभागाच्या नागरिकांना खबरदारीच्या सूचना
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क
बुधवार (१ जून) :- मंगळवारी (३१ मे) इंदापूर शहरातील शेंडे मळ्यातील शेतकऱ्याच्या मालकीच्या तीन रेडकांवर हल्ला करणारा प्राणी बिबट्या नसून लांडगा अथवा त्यासारखा तत्सम प्राणी असल्याचा अंदाज वन अधिकारी अजित सुर्यवंशी यांनी वर्तवला होता. मात्र बुधवारी (१ जून) दुपारच्या सुमारास विठ्ठलवाडी हद्दीत काही नागरिकांना बिबट्या सदृश प्राणी दिसल्याच्या चर्चांमुळे इंदापूर शहरासह संपूर्ण विठ्ठलवाडी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून वन विभागाकडून नागरिकांना विविध सूचना देण्यात आल्या आहेत.
मंगळवारी रात्री इंदापूर शहरातील शेंडे मळा येथील प्रवीण शेंडे यांच्या मालकीच्या तीन रेडकांवर बिबट्याने हल्ला केल्याची चर्चा संपूर्ण शहरात आगीसारखी पसरली होती. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र हल्ला करणारा प्राणी बिबट्या असल्याबाबत कुठलाही पुरावा सापडला नसल्याचे सांगताना तो प्राणी लांडगा अथवा तत्सम प्राणी असावा असा अंदाज वन अधिकारी अजित सुर्यवंशी यांनी वर्तवला होता. वन विभागातर्फे घटनास्थळी सीसीटीव्ही कॅमेरे देखील बसवण्यात आले होते. मात्र बुधवारी (१ मे) दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास विठ्ठलवाडी गावाच्या हद्दीत काही नागरिकांनी बिबट्या सदृश प्राणी दिसल्याने विठ्ठलवाडी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा बिबट्या सदृश प्राणी इंदापूर कांदा मार्केटच्या पाठीमागून विठ्ठलवाडी हद्दीत गेला असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे.
हे देखील वाचा - जनावरांवरील तो हल्ला बिबट्याचा नव्हे लांडग्याचा; वन अधिकाऱ्याचा खुलासा
घटना समजताच वन विभागाच्या टीमने संबंधित परिसराची पाहणी केली असून, प्रत्यक्षदर्शींकडेही विचारपूस करण्यात आली. अद्याप हा प्राणी बिबट्या असल्याबाबत स्पष्ट पुरावे आमच्या हाती लागले नसल्याचे वन अधिकारी अजित सुर्यवंशी यांनी म्हटले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून घराबाहेर एकट्याने पडू नये, गरज नसल्यास घराबाहेर पडू नये, घराबाहेर पडल्यास मोबाईल वर गाणी जोरात वाजवत जावे या वेगवेगळ्या सूचना वनविभागातर्फे संबंधित परिसरातील नागरिकांनी देण्यात आल्या आहेत.
प्राण्याच्या पायांचे ठसे तपासणीसाठी वाईल्ड लाईफ तज्ञांकडे...
घटनास्थळावरून संबंधित प्राण्याच्या पायांच्या ठशांचे फोटो घेतले आहेत. बिबट्या सदृश प्राणी १००-१५० फुटांवरून पाहिलेल्या प्रत्यक्षदर्शीं नागरिकांना वाघ, लांडगा, बिबट्या आणि तरसाचे फोटो आणि त्यांची चालण्याची पद्धत दाखवण्यात आली. यावर प्रत्यक्षदर्शींचा कल तरसाकडे असल्याचे जाणवले. अधिक अचूक माहितीसाठी संबंधित प्राण्याच्या पायाच्या ठशांचे नमुने वाईल्ड लाईफ तज्ञांना पाठवण्यात आले असून, संबंधित माहिती वरिष्ठ कार्यालयाला देखील कळविण्यात आली आहे. वेगवेगळ्या भागातील सीसीटिव्ही फुटेज तपासण्यात आले आहेत. मात्र निष्कर्षापर्यंत पोहोचण्या इतपत त्यांच्यात स्पष्टता नाही - अजित सुर्यवंशी (वन परिक्षेत्र अधिकारी)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा