कांदलगाव प्रकरण - भ्रष्टाचाऱ्याला शिक्षा झालीच पाहिजे; मात्र भ्रष्टाचार झालाच नसेल तर?
संपादकीय कांदलगावातील १३ वेगवेगळ्या रस्त्यांच्या कामात ३९ लाखांचा फ्रॉड झाल्याचे प्रकरण समोर आले होते. यासंदर्भात माध्यमांमध्ये रस्ते गायब या मथळ्याखाली अनेक बातम्याही प्रसारित झाल्या. परिणामी वेगवेगळे उपक्रम राबवून कांदलगाव ग्रामपंचायतीला शासनाचे अनेक पुरस्कार मिळवून देण्यात, किंबहुना इंदापूर तालुक्याच्या एका कोपऱ्यातून कांदलगावला राज्य पातळीवर पोहचवण्यात मोलाचा वाटा उचलणाऱ्या ग्रामसेविका स्वाती लोंढे यांच्यावर महाराष्ट्र जिल्हा परिषदा, जिल्हा सेवा (शिस्त व अपील) १९६४ (४) अन्वये बदली आणि वेतनवाढ रोखण्यासारख्या बदनामीकारक शिक्षेचा आसूड उगारण्यात आला. मात्र या प्रकरणी निष्पक्ष चौकशी झाली नसल्याची, अनेक दोषींना वाचवण्यात आल्याची आणि प्रकरणाला राजकीय पार्श्वभूमी असल्याची कुजबुज होऊ लागली आहे. खरं तर इंदापूर तालुक्यातील कोट्यवधींच्या रस्त्यांच्या कामात झालेल्या टक्केवारीची आणि भ्रष्टाचाराची चर्चा तालुक्याला नवी नाही. अनेक निवेदने, आंदोलने झाली, मात्र एकाही भ्रष्ट ठेकेदारावर, संबंधित विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली नाही. किंतु परंतु कांदलगाव रस्त्यांच्या प्रकरणात सलग तीन वर्ष...