इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क

इंदापूर (११ जानेवारी) :- दुचाकीवरून आलेल्या तिघा युवकांनी एका ६५ वर्षीय महिलेला लोखंडी रॉडने मारहाण करत रक्तबंबाळ केले. मारहाणीची ही घटना शुक्रवारी (५ जानेवारी) इंदापूर शहरातील मुख्य बाजारपेठेत रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली होती. या घटनेत जखमी झालेल्या कमल मोतीलाल परदेशी (रा. सिद्धेश्वर मंदिराजवळ, इंदापूर) यांच्या फिर्यादीवरून अमोल गणेश परदेशी, आदित्य संजय परदेशी आणि क्षितीज संजय परदेशी (तिघेही रा. खडकपूरा, इंदापूर) या तिघा युवकांविरोधात मंगळवारी (९ जानेवारी) इंदापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

फिर्यादी ह्या इंदापूर शहरात प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाचे काम पाहतात. शुक्रवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास त्या बाजारपेठेतील विठ्ठल रुक्मिणी मंदिरातून घरी जात असताना हा प्रकार घडला. दुचाकीवर आलेल्या तिघा आरोपींनी त्यांना पाठीमागून धडक दिली. तदनंतर आरोपींनी फिर्यादी यांना इंदापूर आणि बारामती येथील न्यायालयातील तक्रार मागे घेण्याचे बजावत शिवीगाळ आणि दमदाटी केली. एवढ्यावरच न थांबता आरोपींनी फिर्यादी यांना लाथाबुक्क्यांनी आणि लोखंडी रॉडने मारहाण केली.

हे देखील वाचा - पोलीस ठाण्याच्या परिसरात पेटवून घेतल्यानंतरही पत्रकारांनी प्रश्न विचारायचा नाही?

मारहाणीच्या परिणामी डोक्यात जखम झाल्याने रक्तबंबाळ झालेल्या फिर्यादी यांना उपचारार्थ प्रथम इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात, तदनंतर अकलूज येथील डॉ. इनामदार यांच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

महिलांच्या सुरक्षेसंदर्भात प्रश्नचिन्ह...?

१६ नोव्हेंबर रोजी एका २८ वर्षीय महिलेने इंदापूर पोलीस ठाण्याच्या परिसरात आत्मदहन केले होते. या घटनेसंदर्भात तत्कालीन पोलीस निरीक्षक दिलीप पवार आरोपांच्या घेऱ्यात आहेत. दरम्यान, ही गंभीर घटना अद्याप ताजी असतानाच वरील घटनेतील फिर्यादी महिलेला मुख्य बाजारपेठेत तिघांनी रक्तबंबाळ होईपर्यंत केलेली मारहाण इंदापूर शहरातील महिलांच्या सुरक्षेसंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण करणारी, तर गुंड प्रवृत्तींमध्ये कायद्याचा, पोलिसांचा धाक कितपत उरला आहे याबाबत चिंतन करण्यास भाग पाडणारी आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट