आज मध्यरात्रीपासून निर्बंध आणखी कडक होणार; स्थानिक प्रशासनालाही कडक निर्बंध लावण्याची मुभा
मागील काही दिवसांपासून भारतात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली असून, ओमायक्राॅनचे संकटही आता गडद होऊ लागले आहे. सध्या देशात सक्रिय कोरोना बाधितांची संख्या ८२,००० च्या वर गेली आहे. गेल्या २४ तासांत देशात १० हजारांहून अधिक नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. ओमायक्रॉन व कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता राज्यातील टास्क फोर्स, मुख्यमंत्री आणि संबंधित मंत्र्यांची बैठक घेण्यात आली होती. राज्य सरकारच्या आपत्ती विभागाने गुरुवारी (३० डिसेंबर) परिपत्रक जारी करत राज्यातील निर्बंध आणखी कडक केले असून, सरकारच्या नव्या नियमावलीनुसार राज्यात ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून आणखी कडक निर्बंध लागू करण्यात येणार आहेत. तर स्थानिक प्रशासनाला परिस्थितीनुरूप निर्णय घेत कडक निर्बंध लागू करण्याची मुभा देण्यात आली आहे.
या निर्बंधांमध्ये, बंदिस्त हॉल किंवा रिकाम्या जागेतील लग्न संमारंभासाठी केवळ ५० लोकांच्या उपस्थितीला परवानगी देण्यात आली आहे. सर्व प्रकारचे सांस्कृतिक, राजकीय आणि धार्मिक कार्यक्रमांसाठी, मग ते बंदिस्त हॉल असो किंवा रिकाम्या जागी असोत, अशा कार्यक्रमांना ५० लोकांनाच उपस्थितीची परवानगी असून, अंत्यविधीसाठी केवळ २० लोकांना उपस्थितीची परवानगी असणार आहे. पर्यटन स्थळे, समुद्र किनारे, रिकामी मैदाने आदी ठिकाणी कलम १४४ लागू करण्यात आले आहे. तर परिस्थिती पाहून स्थानिक प्रशासनाला कडक निर्बंध लावण्याची मुभा देण्यात आली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा