इंदापूर नगरपरिषदेच्या सफाई कामगारांना पक्की घरे मिळणार?
| सफाई कामगारांचं पक्क्या घराचं स्वप्न पूर्ण होणार? |
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क
इंदापूर (१८ डिसेंबर) :- कुणी घर देतं कारे घर ! एक तुफान भिंतीवाचून, छपरावाचून, माणसाच्या मायेपासून, देवाच्या दयेपासून, डोंगरा डोंगरात हिंडत आहे.. जिथून कोणी उठवणार नाही अशी जागा धुंडत आहे...या नटसम्राट चित्रपटातील नाना पाटेकरांप्रमाणे घर आणि मायेसाठी आर्त हाक इंदापूर शहरातील घाणेरड्या गटारींशी, मलमुत्रांशी आणि अस्वच्छतेशी दोन हात करत शहरवासियांची दुर्गंधी व अनेक आजारांपासून बचाव करणारे इंदापूर नगरपरिषदेचे सफाई कामगार देखील अनेक वर्षांपासून लगावत आहेत. यांची मागणी आहे केवळ पक्क्या आणि हक्काच्या घरासाठी. होय केवळ पक्क्या आणि हक्काच्या घरासाठी.
इंदापूर नगरपरिषदेने संघटित परिश्रमाच्या जोरावर केंद्र व राज्य शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत अनेकवेळा बाजी मारली आहे. मात्र, साहजिकच यामध्ये मोलाचा वाटा आहे तो तुम्हा आम्हाला दुर्गंधी आणि अस्वच्छतेपासून वाचणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचा. कचरामुक्त शहराच्या स्पर्धेत तब्बल चार वेळा ३ स्टार मानांकन प्राप्त करून देशपातळीवर इंदापूरचे नाव गाजवणाऱ्या नगरपरिषदेला शासनाकडून मिळालेल्या प्रोत्साहनात्मक रकमेतून सफाई कामगारांना इंदापूर नगरपरिषदेने कायमस्वरूपी पक्की घरे बांधून द्यावीत अशी मागणी इंदापूर नगरपरिषदेच्या आरोग्य विभागातील सफाई कामगार सत्यवान ज्ञानदेव सागर यांनी एका निवेदनाच्या माध्यमातून मुख्याधिकाऱ्यांसह संबंधित शासनविभाग व प्रशासनाच्या पदाधिकाऱ्यांकडे केली आहे. सफाई कामगारांचं घराचं स्वप्न कसं पूर्ण होऊ शकतं यासाठी त्यांनी २०१९ साली राज्यशासनाने घेतलेल्या शासन निर्णयाचा आणि नगरविकास विभागाच्या शुद्धीपत्रकाचा हवाला देत हा मुद्दा जनरल बोर्डाच्या बैठकीत मांडण्याची विनंती केली आहे.
आपले कुटुंब तीन पिढ्यांपासून, तर आपण स्वतः मागील १२ वर्षांपासून इमाने इतबारे जीवघेण्या जीवजंतूंशी व मलमूत्राशी निगडित सफाईच्या कामांच्या माध्यमातून शहर आणि नगरपरिषदेची सेवा करीत असून, संस्थेने आम्हा सफाई कामगारांच्या परिश्रमामुळे केंद्र आणि राज्य शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत अनेकवेळा बाजी मारली आहे. या स्पर्धेतील यशामुळे शहराचे नांव देशपातळीवर पोहोचले असून, उत्कृष्ट कामगिरीबद्दल संस्थेला केंद्र व राज्य शासनाकडून कोट्यावधींची प्रोत्साहनात्मक रक्कम देखील मिळाली आहे. २५ जुलै २०१९ चा शासन निर्णय आणि राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने १८ सप्टेंबर २०१९ रोजी काढलेल्या शुद्धीपत्रकान्वये या रकमेतील विशिष्ट रक्कम जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने संस्थेतील सफाई कर्मचाऱ्यांसाठी योजना तयार करून खर्च करावी अशा सूचना नगरपरिषद प्रशासनाला केल्या होत्या. सफाई कर्मचाऱ्यांसाठी पक्के घर हा अतिशय महत्वाचा आणि त्यांच्या आयुष्यातील अतिसंवेदनशील विषय असल्याने नगरपरिषद प्रशासनाने हा विषय जनरल बोर्डाच्या बैठकीत मांडून हा विषय तडीस न्यावा अशी मागणी या निवेदनाच्या माध्यमातून सत्यवान सागर यांनी थोड्याच दिवसात चांगले अधिकारी म्हणून ओळखले जाऊ लागलेले मुख्याधिकारी रामराजे कापरे यांच्यासह शासन आणि संबंधित प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना केली आहे.
अपवाद वगळता समाधानकारक कामगिरी करणाऱ्या नगरपरिषदेने संबंधित विषयावर सकारात्मक मानसिकता दाखवल्यास उपेक्षित घटक आणि पिढ्यांपिढ्या पक्क्या घराचं स्वप्न बघणाऱ्या गोरगरीब सफाई कामगारांना पक्की व हक्काची घरे तर मिळतीलच, सोबत, हा निर्णय नगरपरिषदेच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल. बघुयात इंदापूर नगरपरिषद या सफाई कर्मचाऱ्यांचं पक्क्या घराचं स्वप्न पूर्ण करून त्यांना हक्काचं घर देतं का ते.
सफाई कर्मचाऱ्यांच्या घराचा मुद्दा अनेक वर्षांपासून नगरपरिषदेच्या अजेंड्यावर?
अकलूज रस्त्याकडेच्या डम्पिंग ग्राउंड येथे अंदाजे २५-३० वर्षांपूर्वी नगरपरिषद सफाई कर्मचाऱ्यांसाठी नियोजित जागा असा नामोल्लेख असलेला फलक अस्तित्वात होता. त्यामुळे सफाई कर्मचाऱ्यांसाठी पक्क्या घरांचा मुद्दा अनेक वर्षांपासून नगरपरिषदेच्या अजेंड्यावर असल्याचे दिसत आहे. मात्र हा अजेंडा अद्याप मूर्त स्वरूपात अस्तित्वात येऊ न शकल्याने सफाई कर्मचारी आजही पक्क्या घरापासून वंचित आहेत. पुणे जिल्ह्यातील एकूण १३ नगरपरिषदांमध्ये सर्वप्रथम संगणिकृत होण्याचा मान इंदापूर नगरपरिषदेला मिळाला आहे. स्वच्छ सर्वेक्षणाच्या माध्यमातून इंदापूर नगरपरिषदेने इंदापूरचे नांव देशपातळीवर गाजवले. मागील काही वर्षात समाधानकारक कारभार करणारी नगरपरिषद सफाई कर्मचाऱ्यांच्या घरासारख्या संवेदनशील मुद्द्यावर सकारात्मक दृष्टीकोन दाखवून ऐतिहासिक निर्णय घेईल अशी आशा आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा