शरीर सौष्ठव स्पर्धेत इंदापूर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

विजेत्यांचे अभिनंदन करताना प्राचार्य व इतर

आंतर महाविद्यालयीन सर्धेत ५ विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या गटात मारली बाजी

मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क

इंदापूर (२० डिसेंबर) :- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ तसेच पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समिती अंतर्गत राजगुरूनगर (ता. खेड) येथील हुतात्मा महाविद्यालयात १६ डिसेंबर रोजी पार पडलेल्या आंतर महाविद्यालयीन शरीर सौष्ठव स्पर्धेमध्ये इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. तब्बल ५ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत वेगवेगळ्या गटात बाजी मारली आहे. यामध्ये ५५-६० किलो वजन गटात निलेश ढावरे याने प्रथम क्रमांक, तर सरफराज मणेरी याने द्वितीय क्रमांक पटकावला. ६५-७० किलो वजन गटात मोहम्मद सैफ काझी याने प्रथम, तर तुषार ढगे याने द्वितीय क्रमांक पटकावला. ७०-७५ किलो वजन गटात तेजस शिंदे याने प्रथम क्रमांक पटकावला आहे.

इंदापूर शिक्षण प्रसारक मंडळाच्या इतिहासात शरीर शौष्ठव स्पर्धेत एकाचवेळी ५ जणांनी बाजी मारल्याची ही पहिलीच वेळ असून, आज (२० डिसेंबर) रोजी पुणे विद्यापीठ अंतर्गत श्रीरामपूर (जि. अहमदनगर) येथे होणाऱ्या आंतर विभागीय शरीर सौष्ठव स्पर्धेसाठी या सर्वांची निवड करण्यात आली आहे. आज श्रीरामपूर येथील स्पर्धेत बाजी मारल्यास हे विद्यार्थी अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहेत. "तुमच्याकडे परिणाम किंवा कारण (बहाणा) दोन्ही पैकी एक असू शकतं. दोन्ही नाही. (You can have results or excuses. Not both.) शरीर सौष्ठवच्या दुनियेचा बेताज बादशाह अरनॉल्डच्या वाक्यापासून बोध घेतलेल्या या ५ विद्यार्थ्यांनी यश मिळवण्यासाठी कठीण परिश्रम घेतले आहेत. याकामी त्यांना शारीरिक शिक्षण संचालक डॉ. भरत भुजबळ व प्रा. बापू घोगरे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे. तर प्रशिक्षक म्हणून मोहसीन शेख (एबीएस जीम) यांनी विशेष परिश्रम घेतले.

हे देखील वाचा - कुणी घर देतं कारे घर ! इंदापूर नगरपालिकेचा सफाई कामगार का करतोय पक्क्या घराची मागणी?

यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, संस्थेचे सचिव मुकुंद शहा, पूर्ण संचालक मंडळ आणि प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांच्यासह, राष्ट्रवादीचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, माजी नगराध्यक्ष विठ्ठल (आप्पा) ननवरे, गटनेते कैलास कदम, भाजपचे इंदापूर शहराध्यक्ष शकीलभाई सय्यद, ॲड.  इनायतअली काझी, माजी नगरसेवक दादासाहेब सोनवणे, प्रा. अशोक मखरे, इंदापूर तालुका क्रीडा अधिकारी महेश चावले, तसेच विविध राजकीय पक्ष आणि विविध क्षेत्राशी निगडित नागरिकांनी अभिनंदन केले असून, आज (२० डिसेंबर) रोजी श्रीरामपूर येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट