मागण्या मान्य झाल्याने अॅड. राहुल मखरे यांचे आंदोलन स्थगित; काय होत्या मागण्या आणि काय मिळाली आश्वासने?
इंदापूर (१० डिसेंबर) :- बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव अॅड. राहुल मखरे यांनी, नगरपरिषदेच्या दिवंगत कर्मचाऱ्यांच्या वारसा (अनुकंपा) अधिकाराच्या पात्र उमेदवारांना नियुक्ती देण्यात यावी, मतदार याद्यांतून बोगस मतदारांना वगळण्यात यावे, वरकुटे (खुर्द) येथील ग्रामपंचायतीमध्ये कागदी भ्रष्टाचार करणाऱ्या तत्कालीन ग्रामसेवक व जबाबदार व्यक्तींवर कारवाई करावी, अशा विविध मागण्यांसाठी सोमवार (६ डिसेंबर) पासून इंदापूर नगरपरिषदेसमोर आमरण उपोषणाचा पावित्रा घेतला होता. दखल न घेतल्यास रास्ता रोको, जेलभरो आंदोलन आणि नगरपरिषदेला ताळे ठोकण्याचाही इशारा त्यांनी दिला होता. मात्र, तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्या पुढाकाराने मागण्यांसंबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांशी जवळपास ५ तास झालेल्या चर्चेअंती कारवाईच्या मिळालेल्या आश्वासनानंतर अॅड. मखरे यांनी हे आंदोलन मंगळवारी (७ डिसेंबर) मागे घेतले.
काय होत्या अॅड. राहुल मखरे यांच्या मागण्या आणि काय मिळाली आश्वासने?
मागणी क्र. १ - नगरपरिषदेच्या दिवंगत कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वानुसार नियुक्ती मिळावी.
आश्वासन - इंदापूर नगरपरिषदेच्या सात दिवंगत (४ सफाई कर्मचारी, १ शिपाई, १ मजूर, १ लिपिक) कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वानुसार नियुक्ती प्रक्रिया पुढील १५ दिवसात सुरू करण्यात येईल, मान्यता मिळाल्यास संबंधित चारही उमेदवारांना प्रतीक्षा यादीनुसार नियुक्त्याही देण्यात येतील असे लिखित आश्वासन देण्यात आले.
मागणी क्र. २ - मतदारयादीतून बोगस, स्थलांतरीत, दुबार, आणि मयत मतदारांना वगळण्यात यावे.
आश्वासन - संबंधित विषयावर कामकाज युद्धपातळीवर सुरु असून, अशा जवळपास अडीच हजार मतदारांची यादी तयार करण्यात आली आहे. त्यांची स्थळपाहणी, पंचनामे तयार करण्यात आले आहेत. या मतदारांना वगळण्यात येईल. कोणी चुकून राहीले अथवा दोन ठिकाणी मतदान करत असल्याचे आढळून आले तर अशा मतदारांवर गुन्हे दाखल करण्यात येतील. अशा संशयित मतदारांची वेगळी सूची तयार करण्यात येईल.
मागणी क्र. ३ - वरकुटे (खुर्द) ग्रामपंचायतीची महत्वाची कागदपत्रे गायब करणाऱ्या तत्कालीन ग्रामसेवकासह या प्रकरणाशी संबंधित लोकांवर कारवाई व्हावी.
आश्वासन - वरकुटे (खुर्द) येथील दोषींवर कारवाई करण्याचा अहवाल मुख्याधिकारी (जिल्हा परिषद, पुणे) यांना पाठविण्यात येत आहे.
अॅड. मखरे यांच्या मागण्यांसंबंधित विषयांवर त्या त्या विभागाच्या अधिकाऱ्यांशी मंगळवारी (७ डिसेंबर) सायंकाळी ५ वाजल्यापासून रात्री ९.३० पर्यंत चाललेल्या चर्चेत कारवाईचे लिखित आश्वासन मिळाल्यानंतर अॅड. मखरे यांनी आपले आंदोलन मागे घेत असल्याचे जाहीर केले. या चर्चेत गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी कापरे, नगरसेवक भरत शहा यांनी सहभाग घेतला.
अॅड. मखरे यांनी याआधीही विविध सामाजिक विषयांवर यशस्वी आंदोलने केली आहेत. त्यामुळे त्यांच्या आंदोलनापुढे प्रशासन लोटांगण घेणार हे निश्चित होतं. बस आता बघावे लागेल या आश्वासनांना मूर्त स्वरूप येतं का ते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा