ग्रामस्वच्छता चळवळीचे आद्यजनक संत गाडगे महाराज - स्वाती लोंढे-चव्हाण
| मधोमध संत गाडगेबाबा, उजवीकडे डॉ. आंबेडकर, डावीकडे कर्मवीर भाऊराव पाटील |
मुत्सुद्देगिरी विशेष
स्वच्छतेची आद्यचळवळ महाराष्ट्रात १८ व्या शतकात ज्यांनी सुरू केली त्या महान समाजप्रबोधनकार, लोकसंत, वैराग्यमूर्ती संत गाडगे महाराजांच्या स्मृतीदिनानिमित्त ही शब्द सुमनांजली...
ज्या काळात संपूर्ण देशात अनिष्ट रूढी-परंपररांनी थैमान घातलं होतं. चातुर्वर्ण्य व्यवस्थेचं साम्राज्य अस्तित्वात होत. त्या काळात किर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन, जनजागृती करण्याचे काम गाडगेबाबांनी केलं. संत गाडगेमहाराज एक चालते बोलते सामाजिक विद्यापीठ होते. त्यांनी मांडलेला स्वच्छता आणि अंधश्रद्धा निर्मुलनाचा सिद्धांत आपल्याला आजही वैज्ञानिक दृष्टीकोन देत आहे. स्वच्छतेतूनच माणसाचा शाश्वत विकास होऊ शकतो, हे संत गाडगेबाबांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले. स्वच्छतेला चळवळीचे स्वरूप खर्या अर्थाने गाडगे महाराजांनी दिले. आजघडीला संपूर्ण देशात चालू असलेल्या "स्वच्छ भारत" अभियानाचा पाया अठराव्या शतकात गाडगेमहाराजांनीच घातला होता, असे म्हटले तरी ते वावगे ठरणार नाही.
दिवसभर गावस्वच्छता करणाऱ्या गाडगे बाबांनी रात्रीच्यावेळी किर्तनातून माणसांच्या विचारांची स्वच्छता करत समाजाला मानसिक गुलामगिरीतून मुक्त करण्याचे महतत्वपूर्ण कार्य केले. चोरी करू नये, कर्ज काढून चैन करू नये, दारू पिऊ नये, देवांपुढे पशुंचा बळी देऊ नये, हा उपदेश अतिशय साध्या आणि सोप्या व मार्मिक भाषेत गाडगेबाबा लोकांना सांगत असत. संत कबीर आणि संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचा त्यांच्या किर्तनात समावेश असे. संत तुकाराम महाराजांना ते गुरू मानत. बाबा लहानपणापासूनच जातीभेद मानत नसणाऱ्या बाबांनी जातीभेद नष्ट करून समाजात समानता प्रस्थापित व्हावी, यासाठी किर्तनाच्या माध्यमातून जनजागृती केली.
ग्रामस्वच्छता, शिक्षणाचे महत्व, अंधश्रद्धा निर्मुलन, हिंसाबंदी, दारूबंदी, पशुबळी प्रथा निवारण, अस्पृश्यता निवारण, धर्मशाळा, गोशाळा, रूग्णालये, शाळा आणि वसतीगृह बांधकाम करून समाजापुढे एक वेगळाच आदर्श निर्माण करणाऱ्या गाडगे बाबांनी अनेक क्रांतीकारी निर्णय घेत आपल्या किर्तनातून अंधश्रद्धा आणि कर्मकांडावर जोरदार प्रहार केले.
लोकहो !
देव तीर्थात किंवा मूर्तीत नाही,
दरिद्री नारायणाच्या रूपाने
तो तुमच्या समोर उभा आहे,
दिन दुबळ्यांच्या डोळ्यातील एक अश्रु पुसला की,
देवाला एक अभिषेक घडतो हो!!!
देव पुजू नका, देव मूर्तीत नाही तर माणसाच्या माणुसकीत आणि एकमेकांना मदत करण्याच्या भावनेतच आहे. खरी देवपूजा हीच, हे किर्तनातून सांगणारे एकमेव संत म्हणजे गाडगे महाराज होय. संत गाडगे महाराजांनी दिलेला दशसूत्री संदेश हा समाजाच्या प्रगतीसाठी अतिशय हितकारक आहे.
भुकेलेल्यांना अन्न,
तहानलेल्यांना पाणी,
उघड्यानागड्यांना वस्त्र,
गरीब मुला-मुलींना शिक्षणासाठी मदत,
बेघरांना आसरा,
पशुपक्षी मुक्या प्राण्यांना अभय,
गरीब तरूण तरूणीचे लग्न,
गोरगरीबांना शिक्षण.
संत गाडगेमहाराजांनी दिलेल्या दशसूत्रीवरच आज शासनाच्या सर्व समाजकल्याणकारी योजना आधारलेल्या दिसतात. त्यामुळे गाडगेबाबांनी सांगितलेला दशसूत्री संदेश हाच मार्गदर्शक असल्याचे आपल्याला दिसून येते. आजघडीला माणसाची उन्नती वैज्ञानिक दृष्टीकोन अंगीकारल्यानेच होणार आहे हे बर्याच वर्षापूर्वी गाडगेमहाराजांनी सांगितले होते.
बापहो !
पैसे नसतील तर जेवणाचे ताट मोडा,
हातावर भाकरी खा,
बायकोले लुगडे कमी भावाचे घ्या,
पण मुलाले शाळेत घातल्याशिवाय राहू नका.
एकही दिवस शाळेत न गेलेल्या या निरक्षर अवलियाने समाजाला शिक्षणाचे महत्व सोप्या भाषेत पटवून दिले. याचाच अर्थ माणसाची उन्नती शिक्षणामुळे होणार आहे हे त्यावेळी त्यांना पक्के उमगले होते. देव देवळात नाही, मूर्तीपूजेत नाही हे त्यांनी त्यावेळी समाजाला पटवून दिले. शिक्षणाचे महत्व पटल्यामुळे त्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील आणि भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचा गौरव केला. कर्मवीर भाऊरावांना आणि डाॅ. बाबासाहेबांना मदत करण्याचे आवाहन त्यांनी लोकांना केलं. स्वतः बांधलेली वसतीगृहं त्यांना शैक्षणिक कार्यासाठी दिली. स्वतःच्या मुलाच्या मृत्युने गाडगेबाबांवर काहीही परिणाम झाला नाही, परंतु डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा मृत्यु झाला हे समजल्यावर केवळ १४ दिवसात अतीव दुःखाने प्राणत्याग करणारा हा अवलिया संत म्हणजे कदाचित नियतीला पडलेलं एक महान कोडं असावं.
त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून महाराष्ट्र शासनाने २०००-२००१ साली संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान या नावाने अभियानाची सुरूवात केली. तसेच अमरावती विद्यापीठाला गाडगे महाराजांचे नाव दिले गेले. स्वतः निरक्षर असूनही समाजप्रबोधनाचे कार्य करणारे संत गाडगे महाराज हे खर्या अर्थाने लोकसंत आणि वैराग्यमूर्ती आहेत. एकही अक्षर शाळेत जाऊन न शिकलेल्या संताचे नाव एका विद्यापीठाला दिले जाते,यावरूनच त्या महान संताच्या ठायी असलेल्या असामान्य प्रतिभेची जाणीव आपल्याला होते.
त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या पावन स्मृतींना विनम्र अभिवादन
(लेखिका - स्वाती लोंढे-चव्हाण, ग्रामसेविका, कांदलगाव - ७३५०२२३०००)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा