इंदापूरमधील व्यापाऱ्याला चारचाकी वाहनाने धडक देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न?



मीर सय्यद (उपसंपादक, मासिक मुत्सुद्देगिरी)

रविवार (७ फेब्रुवारी) : इंदापूर शहराला वळसा घालणाऱ्या पुणे सोलापूर हायवेच्या बायपासलगत असणाऱ्या सर्व्हिस रोडवर गुरुवारी रात्री ९ वा. ४० मिनिटांच्या सुमारास पांढऱ्या रंगाच्या अज्ञात चारचाकी वाहनाने धडक दिल्याने विजय शिवाजी शेवाळे हे गंभीर जखमी झाले आहेत. वरकरणी हा अपघात वाटत असला तरी या अपघातामागे जीवे मारण्याचा प्रयत्न झाला असण्याची दाट शक्यता विजय शेवाळे यांच्या कुटुंबियांनी वर्तवली आहे. त्या अनुषंगाने तपास व्हावा याकामी घातपाताच्या शंकांमागील विविध कारणांची माहिती देणारा अर्ज अजय शिवाजी शेवाळे यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात दाखल केला आहे.

सविस्तर वृत्त असे की, इंदापूर शहरातील प्रसिद्ध व्यापारी विजय शिवाजी शेवाळे (वय ४१ वर्ष, रा. इंदापूर, जि. पुणे) हे गुरुवारी (४ फेब्रुवारी) नेहमीप्रमाणे लकी हॉटेलवर मित्रांशी गप्पा मारून रात्री ९ वाजून ४० मिनिटांच्या सुमारास आपल्या काळ्या रंगाच्या होंडा कंपनीच्या युनिकॉर्न या दुचाकीवरून (एमएच ४२ एइ ००३०) इंदापूर शहराला वळसा घालणाऱ्या पुणे सोलापूर हायवेच्या बायपासला लागून असलेल्या सर्व्हिस रोडवरून घरी निघाले असता मागून एका अज्ञात पांढऱ्या रंगाच्या चारचाकी वाहनाने त्यांना धडक दिली. धडक देणारी गाडी ह्युंडाई कंपनीची व पांढऱ्या रंगाची असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

ही धडक एवढी जबरदस्त होती की विजय शेवाळे हे अंदाजे २०-२५ फुटांपर्यंत दूर फेकले गेले तर त्यांची दुचाकी रस्त्याकडेला असणाऱ्या चारीमध्ये पडली. या धडकेत त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली आहे. अवघ्या काही मिनिटांच्या अंतराने अपघातस्थळी पोहोचलेल्या अन्सार शेख, अमन शेख आणि साजिद शेख यांनी तत्परता दाखवत विजय शेवाळे यांना मंगेश पाटील यांच्या रुग्णालयात व तदनंतर अकलूज येथील डॉ. इनामदार यांच्या अश्विनी हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल केले. सध्या याच ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू असून हळूहळू त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत आहे.

हा अपघात नसून जीवे मारण्याचा प्रयत्न - कुटुंबियांना शंका; शहरातही कुजबुज

वरकरणी हा अपघात वाटत असला तरी हा अपघात नसून यामागे घातपात असण्याची शक्यता शेवाळे कुटुंबियांनी वर्तवली आहे. इंदापूर शहरातील नागरिकांमध्ये देखील काहीशी अशीच चर्चा सुरू आहे. विजय शेवाळे यांचा फुटवेअरचा व्यवसाय असून, व्यवसायाच्या अनुषंगाने अनेकांशी उसनवारीचे आर्थिक व्यवहार होत असल्याचे व त्यातून भूतकाळात अनेकांशी वादविवाद झाल्याचे व त्यातूनच काही जणांनी विजय शेवाळे यांना हातपाय तोडण्याची व जीवे मारण्याची धमकी दिली होती. विजय शेवाळे यांनी याबाबतची तक्रार देखील यापूर्वी इंदापूर पोलीस ठाण्यात दाखल केलेली आहे. ही पार्श्वभूमी पाहता हा अपघात नसून आपल्या भावाला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, या अपघातसदृश घातपाताचा योग्य दिशेने तपास व्हावा या अनुषंगाने वरील आशयाचा अर्ज अजय शिवाजी शेवाळे यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात काल (६ फेब्रुवारी) दाखल केला आहे.

अपघात घडला तो परिसर सुनसान; पाळत ठेऊन केलेले कृत्य

ज्या ठिकाणी ही घटना घडली तो भाग वाघ पेट्रोल पंप आणि शशांक मोहिते नांव असलेल्या बोर्डादरम्यानचा आहे. हा भाग मनुष्यविरहीत व पूर्ण अंधारमय असलेला आहे, त्यामुळे याठिकाणी सिसिटिव्ही असण्याचाही प्रश्न नाही. तर विजय शेवाळे रोज नित्यनियमाने लकी हॉटेलवर हॉटेलचे मालक जावेद शेख व इतर मित्रांशी गप्पा मारण्यासाठी याच मार्गाने ये जा करत असतात. मागील धमक्यांची पार्श्वभूमी पाहता त्यांच्या लकी हॉटेलवर येण्या जाण्याच्या वेळांवर पाळत ठेऊन तसेच अंधारमय परिसराचा फायदा घेऊन हा घातपात केला असण्याची दाट शंका त्यांच्या कुटुंबियांनी व्यक्त केली आहे. त्या अनुषंगाने पुढील तपास व्हावा तसेच या भागाच्या आसपासचे सर्व सिसिटिव्ही फुटेज तपासण्यात यावेत अशी मागणी अजय शेवाळे यांनी अर्जाच्या माध्यमातून इंदापूर पोलीसांना केली आहे.









टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट