इंदापूरमध्ये राजू शेट्टींचे केंद्र सरकार देशद्रोही; तर राज्य सरकार फसवे असल्याचे आरोप



समीर सय्यद (उपसंपादक, मासिक मुत्सुद्देगिरी)

इंदापूर (१० फेब्रुवारी) : मोदी सरकार कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवण्याचा प्रयत्न करत असून, शेतकऱ्यांना मागील ८० दिवसांपासून कडाक्याच्या थंडीत आंदोलन करण्यासाठी भाग पाडणारे व शेतकऱ्यांवर अन्याय करणारे केंद्र सरकार हेच खऱ्या अर्थी देशद्रोही असल्याचा गंभीर आरोप माजी खासदार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केला आहे. सोबतच राज्य सरकारने वीज बिलासंदर्भात शेतकऱ्यांना फसवले असून, वीज कनेक्शन तोडल्यास दोन हात करू, असा सज्जड दम राज्य सरकारला देखील भरला आहे. काल ते इंदापूर न्यायालयात चालू असलेल्या खटल्या संदर्भात इंदापूरमध्ये आले होते.

ऊस दरवाढी संदर्भात २०१३ साली स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने इंदापूर येथील कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्यासमोर करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान कुंडलिक कोकाटे या आंदोलनकर्त्या युवकाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी इंदापूर न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याच्या सुनावणीसाठी माजी खासदार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी काल (९ फेब्रुवारी) इंदापूरमध्ये आले होते.

यावेळी राजू शेट्टी यांनी मोदी सरकारवर घणाघाती टीका करताना, ८० कोटी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला मूठभर शेतकऱ्यांचे आंदोलन भासवण्याचा केविलवाणा प्रयत्न करणारे मोदी सरकार आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना कधी खलिस्तानी, कधी नक्षली तर कधी देशद्रोही ठरवण्याचा प्रयत्न करत असून, उद्योगपतींचे खिसे भरण्यासाठी शेतकऱ्यांवर लादलेल्या काळ्या कायद्यांच्या विरोधात मागील ८० दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर अत्याचार करणारे केंद्र सरकार हेच खऱ्या अर्थी देशद्रोही असल्याचा गंभीर आरोप केला आहे. आंदोलनाच्या माध्यमातून स्वातंत्र्य मिळवलेल्या आपल्या देशात सीमेवर लढणारे ६० टक्के जवान हे शेतकऱ्यांची मुले असून देखील सरकार शेतकऱ्यांना देशद्रोही म्हणत असेल तर आम्हाला वेदना होणार नाही का? राग येणार नाही का? असा सवालही त्यांनी यावेळी केला. तर मोदींनी राज्यसभेत शेतकऱ्यांविषयी केलेल्या अपमानजनक वक्तव्याचा देखील निषेध राजू शेट्टी यांनी यावेळी केला.

हे देखील वाचा - इंदापूरमधील व्यापाऱ्याला चारचाकी वाहनाने धडक देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न

घरातल्या ढेकणांचा बंदोबस्त करण्यासाठी घर जाळायला निघालेले सरकार काळानुसार कायद्यांत बदल करण्याऐवजी संपूर्ण व्यवस्थाच नष्ट करत असल्याचे सांगताना, राजू शेट्टी यांनी शेतकरी कायद्यांच्या बाबतीत शरद पवार यांच्या भूमिकेचे मात्र समर्थन केले आहे. अदानी अंबानी सारख्या व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांना वीज विकत घ्यावी लागू नये याकरीता शेतकऱ्यांनी थकीत वीज बिल भरावे असे आवाहन देखील राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना केले. सोबतच लॉकडाऊनच्या काळातील वीज बिल माफ झाले पाहिजे असेही यावेळी सांगितले. तर वीज बिलासंदर्भात राज्य सरकारने शेतकऱ्यांना फसवल्याचा उल्लेख करताना, वीज कनेक्शन तोडल्यास आम्ही दोन हात करू असा सज्जड दम देखील राज्य सरकारला भरला आहे. तर शेतकऱ्यांच्या जनआंदोलनाविरोधात सरकारी लाभ घ्यायला सोकावलेल्या तथाकथित सेलिब्रिटींनी आम्हाला देशभक्ती शिकवू नये असा मोफत सल्लाही सचिन तेंडुलकरसह इतर सेलिब्रिटींना देऊन टाकला आहे.









टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट