शिवाजी महाराजांबद्दल मुस्लिमांना काय वाटते?


संपादकीय

शिवराय म्हणजे सर्व धर्मातील लोकांना सोबत घेऊन स्वराज्य स्थापन करणारे व्यक्तिमत्व. शिवरायांची स्वराज्य कल्पना म्हणजे सर्व जाती धर्मातील रयतेच्या आशा आकांक्षा पुर्ण करणारे लोकल्याणकारी राज्य. भारतीय राज्यघटना ज्यांच्या कल्पनेवर उभी आहे त्या राज्यघटनेचे आद्य शिल्पकार छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास विविधांगांनी मांडला जाऊ शकतो किंबहुना आपापल्या परीने मांडण्याचे प्रयत्न अनेकांकडून अनेकदा झालेही. परंतु सद्ययुगात सर्वात जास्त उपेक्षित, दुर्लक्षित आणि मुख्य प्रवाहापासून दूर फेकण्यात आलेल्या मुस्लिम समाजाच्या दृष्टीकोनातून छत्रपती शिवरायांबद्दल सत्य इतिहासाच्या स्वरूपातील काही विचार मांडणे फार कठीण आहे. कारण आज बहुसंख्य लोक विनाअभ्यास, विनाचिकित्सा आणि पूर्वग्रहदूषित मानसिकता मनी बाळगूनच इतिहासाकडे पाहतात. ज्या मुस्लिम मावळ्यांबद्दल शिवराय असाधारण विश्वास बाळगायचे त्यांच्याबाबत जाणून बुजून द्वेषपूर्ण लिखाण करताना काही इतिहासकारांनी इंग्रजांच्या फोडा झोडा आणि राज्य करा या योजनेंतर्गत, खोटे बोला पण रेटून बोला अशा जाणून बुजून राबवलेल्या अपप्रचार मोहिमेतील खोटे, विना पुरावा, संदर्भहीन लिखाणावरच रेघोट्या मारण्यात धन्यता मानली. याचा खोलवर परिणाम असा झाला की वर्तमानात देखील बरेच देशबांधव मुस्लिम समाजाबद्दल शिवरायांशी असलेल्या निष्ठेवर पूर्वग्रहदूषित मानसिकतेतून हेतुपरस्पर शंका बाळगतात.

असो ! परिस्थिती हळूहळू बदलत आहे.  शिवरायांबद्दल या प्रकारे लिखाण करताना जी जाणीव मला झाली तीच जाणीव या क्षेत्रांत वावरणाऱ्या रथी महारथींना नक्कीच झाली असणार की छत्रपती शिवरायांना एका लेखात, काही शब्दांत मांडता येणे अशक्य आहे. जगभरातील महामानवांची यादी खूप मोठी व त्यांच्या अनुयायांची संख्याही असंख्य आहे. अनेक लोकांच्या आस्था आणि प्रेरणास्थान वेगवेगळे आहेत परंतु सोबतच जो खरा इतिहास जाणतात त्यांच्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांना देखील मानाचे स्थान आहे.

शिवजयंतीचे संस्थापक शिवकुलभूषण "महात्मा ज्योतिराव फुलेंनी" बळीराजाचा वारसा सांगत शिवरायांचा उल्लेख "कुळवाडी भूषण" म्हणजे अठरा पगड जाती, बारा बलुतेदार, सर्व जाती, सर्व धर्मातील जनतेला बरोबर घेऊन जाणारा, लोककल्याणकारी, प्रजाहितदक्ष, म्हणजेच रयतेचा राजा असा केला आहे. शिवराय सर्व धर्मांचा सन्मान करायचे हे सांगायची गरज नाही. त्यांच्या लष्कर आणि प्रशासनिक नियुक्त्यांमध्ये देखील या धोरणाची झलक पाहायला मिळते.

शिवरायांनी रायगडावर अगदी महालासमोर बांधलेली मशीद, शिवाजी महाराजांना आपले आजोबा मालोजीराजे यांनी मुस्लिम संत शाहशरीफ (श्रीगोंदा, अहमदनगर) यांच्या नावावर आपल्या पुत्रांची नावे शहा-जी आणि शरीफ-जी ठेवल्याचा मिळालेला वारसा (१), गुरूच्या स्थानी असलेल्या माँ जिजाऊ, संत तुकाराम महाराज, केळशीचे सुफी संत याकूत बाबा (२), शिवरायांच्या सैन्यात बहुसंख्य असलेले मुस्लिम सैनिक, अंगरक्षक आणि पदाधिकारी, एकाही पत्रात शत्रूंचा धार्मिक ओळखीने नसलेला उल्लेख, स्वराज्यनिर्मितीत कित्तेक पटीने झालेला स्वकीयांचा त्रास, हे शिवाजी महाराज कोणत्याही एका विशिष्ट आस्थेवर नव्हे तर न्यायावर आधारित स्वराज्याचे संस्थापक असल्याचा पुरावा आहे. सर्व जाती धर्मांबरोबरच मुस्लिम समाज देखील शिवरायांच्या या स्वराज्य निर्मितीत त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभा राहिला होता, आहे आणि राहणार यात देखील काही वेगळे आणि अकल्पित मुळीच नाही. कारण मुस्लिम व्यक्ती हा ज्या अस्मानी ग्रंथावर श्रद्धा बाळगतो त्याची शिकवण त्याला या कामासाठी प्रेरित करते.

"हे श्रधावंतांनो !....जे कार्य पुण्याईचे व ईशपरायणतेचे आहे, त्यामध्ये सर्वांशी सहकार्य करा आणि जी पाप व अत्याचाराची कामे आहेत, त्यामध्ये कोणाशीही सहकार्य करू नका. ईश्वराचे भय बाळगा, त्याची शिक्षा फार कठोर आहे.
(अस्मानी ग्रंथ कुरआन ५:२)


शिवाजी महाराजांनी आपल्या प्रशासनात मानवता हे एकमेव धोरण अवलंबविले होते ज्यात कोणत्याच एका विशिष्ट विचारसरणीला स्थान नव्हते. "धर्माच्या बाबतीत कोणतीही जबरदस्ती नाही" या अस्मानी ग्रंथ कुरआनच्या शिकवणींना साजेसे शिवरायांचे हे फर्मान अतिशय महत्वपूर्ण आहे की, "ज्याचा धर्म त्याचा त्याने पालन करावा, त्यात कुणी बखेडा करू नये."
(३) हे फर्मान शिवरायांचे सहिष्णू धोरण स्पष्ट करते. जातीय सलोखा कायम ठेवणे आणि जास्तीत जास्त क्षेत्रात स्वराज्य प्रस्थापित करणे हा त्यांचा प्राथमिक उद्देश असल्यानेच महाराजांच्या सैन्यात समावेशासाठी अंगी असलेल्या गुुणांशिवाय कोणत्याही जाती वा धर्माची अट नव्हती. म्हणूनच शिवरायांच्या सैन्यातील बहुतांश अधिकारी आणि सैनिक सर्व जाती धर्मातील असून आपापल्या धर्मावर आस्था ठेवणारे तर होतेच बरोबर शिवरायांवर प्रामाणिक निष्ठा बाळगणारे होते. "अवघे विश्वची माझे घर" अशीच महाराजांची भूमिका हा या गोष्टीचा सबळ पुरावा आहे की शिवराय सर्व मानवांना भाऊ भाऊ मानत. मग ही अस्मानी ग्रंथ कुरआनच्या शिकवणीशी साम्य असणारी शिवरायांची भूमिका मुस्लिमांना आकर्षित न करेल तर नवलच.

"हे लोकहो ! आपल्या पालनकर्त्याचे भय बाळगा ज्याने तुम्हाला एका जीवापासून निर्माण केले आणि त्याच जीवापासून त्याची सहचारिणी (पत्नी) बनविली आणि या एकाच जोडप्यापासून समस्त पुरुष व स्त्रिया जगात पसरविल्या."
(अस्मानी ग्रंथ कुरआन ४:१)


छत्रपती शिवाजी महाराज नेहमी म्हणत "हे राज्य अवघ्यांचे सर्व जातीपातींनी ते रक्षावे." स्वराज्याविषयी इमानदारी हीच प्रमुख अट तिथे लागू होती. महाराजांनी राज्य कारभार करताना काही महत्वपूर्ण आदेशही आपल्या मावळ्यांना दिले होते. "युद्धप्रसंगी मस्जिदीला धक्का लावु नका." कोणतीही स्त्री कैदी म्हणून हाती पडली तर त्या स्त्रीच्या कुटुंबाकडे स्वाधीन होईपर्यंत तिची काटेकोरपणे निगा राखावी, तिचा उपमर्द होता कामा नये. आपण जसे आपल्या आई किंवा बहिणीशी बोलतो तशाच प्रकारे आदरपूर्वक त्यांचेशी बोला, शिवाजी महाराजांनी आपल्या सैन्याला स्पष्ट आदेश दिला होता की, कोणत्याही परिस्थितीत महिला आणि लहान मुलांबरोबर गैरवर्तणूक व्हायला नको. कल्याणच्या सभेदाराच्या सुनेला शिवाजी महाराजांकडून दिल्या गेलेल्या सन्मानाची गोष्ट सगळ्यांना माहिती आहेच. पर्शियन कागदपत्रात नोंद सापडते की सन १६५८ मध्ये कल्याणचा सुभेदार मौलाना अहमद यांच्या सुनेला आबाजी सोनदेव या मंत्र्याने पळवून आणल्यानंतर शिवाजी महाराजांनी तिला आपली बहीण मानून आदरसत्कारपूर्वक संपूर्ण बंदोबस्तात विजापूरला पाठवले होते. याचाच परिणाम की त्या दिवशी मौलाना अहमदने आपल्या सर्व सहकाऱ्यांना कुरआनच्या साक्षीने शपथ दिली होती की अशा स्त्रियांना माय भगिनी समजणाऱ्या शिवाजी महाराजांवर कधीच हत्यार उगारणार नाही आणि याच प्रसंगाने प्रेरित होऊन विजापूरच्या ७०० पठाणांची तुकडी स्वराज्याच्या सैन्यदलात दाखल झाली आणि शेवटपर्यंत इमानदार राहिली.(४)


"अस्मानी ग्रंथ कुरआनविषयी महाराज म्हणत" युद्धप्रसंगी ते मिळाल्यास आदरपुर्वक मुस्लिम सैनिकाच्या स्वाधीन करावे. कारण महाराजांचे असे मत होते की हे कोण्या माणसाने लिहीले नसून आकाशातून म्हणजेच ईश्वराकडून अवतरीत झालेला अपौरुषीय ग्रंथ आहे. कुरआनच्या मूळ शिकवणीशी तंतोतंत जुळणारी शिवरायांची ही भूमिका स्पष्ट करते की शिवरायांचे कुरआनविषयी अध्ययन किती खोलवर होते. यामुळेच पवित्र कुरआनची प्रत हाती लागताच पालखीतून वाजत गाजत सन्मानपूर्वक मुस्लिम व्यक्तीकडे परतावणी करत असत.
(५) धन्य असो कुरआनचा आदर आणि अध्ययन करणारे शिवराय.

अलिफ, लाऽऽम, रा. हे मुहम्मद (स.), हा एक ग्रंथ आहे जो आम्ही (ईश्वराने) तुम्हावर अवतरित केला आहे, जेणेकरून तुम्ही लोकांना अंधाराच्या गर्तेतून काढून  दिव्य प्रकाशाकडे आणावे, त्यांच्या पालनकर्त्याच्या इच्छेने जो जबरदस्त आणि स्वयंभू स्तुतीस पात्र आहे.
(अस्मानी ग्रंथ कुरआन १४:१)


शिवरायांनी औरंगजेबाला लिहिलेल्या एका पत्रात देखील कुरआनाच्या अध्याय क्रमांक १ च्या श्लोक क्रमांक १ चा (प्रशंसा फक्त अल्लाहसाठीच आहे जो समस्त सृष्टीचा पालनकर्ता आहे.) दाखला देऊन लिहिले होते की,

"अल्लाह काय फक्त तुम्हा मुस्लिमांचाच नसून तो आम्हा हिंदूंचाही आहे. कारण अस्मानी किताब कुरआनात लिहलेलं आहे की, तो 'रब्बूल आलमीन' म्हणजे सगळ्या सृष्टीचा रब (पालनकर्ता) आहे."(६)

छत्रपती शिवाजी महाराजांवर बालवयातच माँ जिजाऊंनी उच्चप्रतीचे संस्कार केले होते म्हणूनच स्वराज्याच्या उभारणीत अनेक संत महात्म्यांबरोबर मुस्लिम संत व पिरांचेही मार्गदर्शन ते घेऊ शकले. यात विशेषतः मौनी बाबा, शेख मुहम्मद बाबा, सय्यद याकूत बाबा यांचा उल्लेख येऊ शकतो. हजरत सय्यद याकूत बाबा यांच्या केळशी या गावातील स्थानाला ६५३ एकर जागा आज्ञापत्राने इनाम दिल्याची नोंद आहे.(७) १६६९ मध्ये भांबोर्डे येथील मस्जिदीला इनाम देण्याविषयी उल्लेख आहे. इंदापूर येथील मस्जिदीसाठी एक एकर जमीन व तेल इ. बाबत व्यवस्था केल्याचाही उल्लेख ऐतिहासिक कागतपत्रांत सापडतो.(८) तर दक्षिणेतील कित्येक मस्जिदींना शिवाजी महाराजांनी दिलेली वर्षासने आजही चालू आहेत.(९) रायगडावर महाराजांनी अगदी महालासमोर मुस्लिम मावळ्यांसाठी मस्जिद बांधली ज्यामध्ये काझी राईसकर (कसबे लोनशी) हे इमाम नमाज पठणासाठी येत असत. त्याबद्दल त्यांना ४ रु. तश्रीफ मानधन दिले जात असे.(१०)

याशिवाय महाराजांनी मध्यपूर्वेतील मुस्लिम अरब देशांशी आपले व्यापारी संबंध जोडले होते. महाराजांची मोठी व्यापारी जहाजे मध्यपूर्वेतील मस्कत, बसरा, एडण इत्यादी बंदरांना व्यापारानिमित्त भेटी देत असल्याचा उल्लेख इंग्रजांच्या १६६४-६५ च्या कागदपत्रावरून आढळून येते. एका बिन तारखेचे शिवकालीन पत्रावरून महाराजांनी दोन व्यापाऱ्यांमार्फत मस्कतच्या इमामाला आपला सलाम देखील कळविला होता हे लक्षात येते.(११) शिवरायांच्या पत्रांमध्ये रब्बीऊल अव्वल (इस्लामी महिन्याचे नाव), अजरख्तखाने (कचेरीपासून), दामदैलत हूं (त्याचे राज्य चिरायू होवो),  बजानीखा (कडे) व इस्तकबाल (स्वागत) असे अरबी आणि फारशी शब्द आढळतात. यावरून महाराजांना अनेक भाषांचे ज्ञान अवगत होते हे स्पष्ट होते. संभाजी राजांचे ४ ग्रंथ हे त्याचेच फलित होते.

शिवाजी महाराज आणि मुस्लिमांचे अतुट विश्वासाचे नाते होते आणि ते आजही आहे आणि राहील यात तिळमात्र शंका नाही. शिवाजी महाराज हे एका विशिष्ट चौकटीत बांधून टाकण्याचे वा फक्त मिरवणुकांच्या घोषणांनी आवाज बुलंद करण्याचे व्यक्तिमत्त्व कदापि नव्हे, असे केल्याने त्यांची महत्ता कमी करण्याचेच पाप आपल्या हातून होईल. शिवराय तर संस्काररूपी वस्त्र आहे जे प्रत्येकाने परिधान करणे गरजेचे आहे.

महाराजांच्या लढाया ह्या धार्मीक कधीच नव्हत्या तर तो राजकीय संघर्ष होता. ज्याप्रमाणे महाराजांच्या सैन्यात मुस्लिम फक्त समाविष्टच नव्हे तर प्रमुख पदांवर होते अगदी तसेच मोगल, आदिलशाह, निजाम यांच्या सैन्यात मराठा, रजपूत आणि अन्य जाती धर्मातील सैनिक मोठ्या प्रमाणात होते. धार्मिक दृष्टीकोनातून युद्धे झाली असती तर मोगलांविरुध्द मुस्लिम मावळे आणि मुस्लिम राजांच्या पदरी असलेले असंख्य हिंदु सैनिक व पदाधिकारी महाराजांविरुध्द कधीच लढले नसते ही सामान्य बाब प्रत्येकाने लक्षात घेतली पाहीजे. असामान्य किर्तीच्या आणि धर्मनिरपेक्ष शिवाजी महाराजांना त्यांच्या अनुयायांनी फक्त एका धर्मापुरते सिमीत न करता सर्व धर्माच्या लोकांना एकत्र करुन शिवाजी महाराजांना अपेक्षीत भेदभाव रहीत, सर्वधर्म समभाव मानणारे स्वराज्य अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करणे हेच खरे कर्तव्य आहे. "ज्याचा धर्म त्याचा त्याने पालन करावा, त्यात कुणी बखेडा करू नये" या शिवरायांच्या तत्वान्वये सर्व जाती धर्मातील लोकांना समान न्याय देणारा, आपापल्या धर्माच्या शिकवणुकीनुसार आचरण करता यावा असा "समान नागरी कायदा" भारतीय राज्यघटनेच्या स्वरूपात बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून अस्तित्वात आला ज्याला शिवरायांच्या स्वराज्य निर्मितीच्या पायाभरणीवर बाबासाहेबांनी लावलेला कळस असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

प्रेषित मुहम्मद (सल्ल.) यांचे कथन आहे :- "लोकांमध्ये तो व्यक्ती श्रेष्ठ आहे ज्याचे चारित्र्य सर्वोत्तम आहे." शिवचरित्र शिवराय उत्तम आचरणाचे पाईक होते हे सिद्ध करते. मुस्लिमांच्या दृष्टिकोनातून शिवराय उत्तम चारित्र्याचे पाईक होते. मुस्लिम समाज मुळात प्रतिमापूजक नाही. कारण मूर्तिपूजा इस्लाममध्ये निषिद्ध आहे. मात्र, शिवरायांची वैचारिक प्रतिमा प्रत्येक मुस्लिमांच्या मनात आणि घराघरात आहे. सर्व भारतीयांचे हे आद्य कर्तव्य आहे की, सर्वांना प्रेरणा देणारे शिवरायांचे विचार आत्मसात करून त्यावर आचरण करावे. घाणेरडे जातीय राजकारण, अफवा, अपप्रचाराला बळी न पडता, सामाजिक आणि धार्मिक सलोखा कायम राखून शिवरायस्वरूप राज्यघटनेशी प्रामाणिक राहून देशरूपी स्वराज्याच्या उन्नतीसाठी प्रयत्नशिल रहावे."

शिवचरित्राचा अभ्यास त्या प्रत्येक व्यक्तीला जो स्वतःला शिवरायांचा अनुयायी म्हणवतो आत्मचिंतन करण्यास पर्याप्त आहे की तो कितपत अनुयायी म्हणवण्यास योग्य आहे. तर या आपण सर्व शिवचरित्राचा माध्यमातून स्वतःचे आत्मचिंतन करू, आपले गुण दोष तपासू, दोष दूर करून शिवरायांप्रमाणे आपले आचरण उत्तम करण्याचा प्रयत्न करू, जी खऱ्या अर्थाने शिवरायांना आदरांजली ठरेल.

संदर्भ :- १) हमारे मुस्लिम संत कवी, लेखक - कृ. गो. वानखडे गुरुजी, सूचना आणि प्रसारण मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली, पान ८७. मालोजीराजे आणि शहाजी महाराज यांची चिकित्सक चरित्रे पान ६६, लेखक : वा. सी. बेंद्रे. अहमदनगर शहराचा इतिहास, पान ११६-१२२, लेखक : सरदार मिरीक सरकार. निधर्मी सुराज्य स्थापणेसाठी छत्रपती शिवरायांनी केलेला जिहाद, लेखक:- ले. कर्नल सुरेश पाटील पान क्र २७-२८.

२) छत्रपती शिवाजी महाराजांच्या लढाया व्यतिरिक्त खरा इतिहास, लेखक : नामदेव जाधव, पान १५९, १६३.

३) २ नोव्हेंबर १६६९ रोजी रघुनाथराव पंडितांना लिहिलेले पत्र.

४) शिवाजी महाराजांची डायरी, लेखक - प्रा. नामदेवराव जाधव, पान २५.

५) Shivaji & his times, लेखक - जदुनाथ सरकार, पान ३२०.  प्रबोधनकारांचे ज्वलंत हिंदुत्व, लेखक - प्रबोधकार ठाकरे, पान ४३. छ. शिवाजी महाराजांची धार्मिक सहिष्णुता, लेखक: डॉ. नवथर बी. एस. इतिहास संशोधन मंडळ, दादर, मुंबई, डिसे २००३, अंक १५९, पान २६.

६) औरंगजेबाला जिझियासंबंधी शिवरायांनी फारसी भाषेत लिहलेलं पत्र जे बिकानेरच्या किल्ल्यात जपून ठेवलेलं आहे. याचा उल्लेख गोविंद पानसरेंनी त्यांच्या 'शिवाजी कोण होता' पुस्तकात उद्धृत केलेला आहे.

७) छ. शिवराय महाराजांच्या लढाया व्यतिरिक्त खरा इतिहास, लेखक - प्रा. नामदेव जाधव, पान १५९, १६३.

८)  संत, महात्मे, विचारवंत आणि इस्लाम, संकलक - सोमनाथ देवकर, पान १९.

९) प्रबोधनकारांचे ज्वलंत हिंदुत्व, लेखक : प्रबोधनकार ठाकरे, पान ४३.

१०) रायगडाची जीवनकथा, लेखक - शांताराम विष्णू आवळकर, पान ७, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ.

११) शिवाजी अरब संबंध आणि पोर्तुगीज, लेखक - माधव कंटक, शिवजयंती विशेषांक, साप्ताहिक सह्याद्री.






टिप्पण्या

  1. सय्यद सर
    सर्व प्रथम तुम्हाला ही!!
    मानाचा मुजरा
    की सुंदर अस अप्रतिम शब्दात तुम्ही लिखाण केल आहे प्रत्येकाला आवडेल असच लिखाण तुमच नेहमी असत ,
    *#रयत_सुखी_तर_राजा_सुखी* *हे* *#छत्रपति_शिवाजी_महाराजांच्या* *राज्य कारभाराचे* *#प्रधान_सूत्र_होते* . *स्वराज्य हे वतनदारांच्या कल्याणासाठी नव्हे तर रयतेच्या कल्याणासाठी आहे ही त्यांची भावना त्यांच्या अनेक आज्ञापत्रांतून व्यक्त झालेली आहे. म्हणूनच त्यांचे वर्णन इतिहासकारांनी "#रयतेचा_एकमेव_राजा' असे केलेले आहे. रयतेला काटा लागला तर त्याची कळ राजाला आली तर तो खरा रयत हितदक्ष राजा होय. या कसोटीला छत्रपती शिवाजी महाराज उतरतात* *म्हणूनच ३५० वर्षानंतर आजही छत्रपती शिवाजी महाराजांच्यावरती जनतेचे रयतेचे अपंरपार प्रेम दिसून येते.*

    🚩🙏🙏 # *जय_जिजाऊ #जय_शिवराय #जय_शंभुराजे* 🙏🙏🚩

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट