उद्या विधानभवनावर धडकणार लहुजी शक्ती सेनेचा महामोर्चा
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क
इंदापूर (२६ डिसेंबर) :- अनुसूचित जातीकरिता असलेले एकत्रित आरक्षण अ,ब,क,ड नुसार वर्गीकरण करण्यात यावे, या व अशा विविध मागण्यांसाठी लहुजी शक्ती सेनेचा, संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णूभाऊ कसबे यांच्या नेतृत्वाखाली निघालेला भव्य महामोर्चा मुंबईतील विधानभवनावर २७ डिसेंबर रोजी धडकणार आहे. १९ डिसेंबर रोजी पुण्यातील आद्यक्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या तालमीपासून संघटनेचे हजारो कार्यकर्ते पायी मुंबईकडे रवाना झाला असून, काल (२५ डिसेंबर) हा महामोर्चा वाशी (नवी मुंबई) या ठिकाणी मुक्कामास होता, अशी माहिती लहुजी शक्ती सेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय जगताप यांनी मुत्सुद्देगिरी दिली आहे.
मातंग समाज अनेक वर्षापासुन अनुसुचित जातीकरीता एकत्रित असलेल्या १३% आरक्षणाची अ,ब,क,ड नुसार वर्गवारी करण्याची, तसेच अ. जा करीता एकत्रित असलेल्या सर्व योजनांची अ,ब,क,ड नुसार वर्गवारी करण्यात यावी ही मागणी घेऊन रस्त्यावर लढा देत आहे. महाराष्ट्रात अनुसुचित जाती गटातील ५९ जातींना १३% एकत्रित आरक्षणाची तरतुद आहे. मात्र आरक्षणाचा सर्वाधिक लाभ शैक्षणिकदृष्टया, आर्थिकदृष्टया व सामाजिकदृष्ट्या सक्षम व आक्रमक असलेले लोकच घेत असून, स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतरही मातंग समाज सामाजिक न्यायाच्या प्रतिक्षेत आहे.
केंद्र व राज्य शासनाने गठित केलेल्या वेगवेगळ्या आयोगांनीही अ,ब,क,ड वर्गीकरणासंदर्भात शिफारशी केल्या आहेत. मात्र अद्याप यावर शासनस्तरावर कोणत्याही हालचाली झाल्या नसल्याने या मागणीसह, साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचं स्मारक संगमवाडी येथे व्हावे, मुंबई विद्यापीठाला जगदविख्यात साहित्यिक साहित्यसम्राट लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचं नाव देण्यात यावे, महाराष्ट्रभरातील सामाजिक आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्यात यावे, महाराष्ट्रभर होत असलेल्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात सरकारने उचित असे कायदे तयार करून त्याची अंमलबजावणी त्वरित करावी, अशा विविध मागण्या घेऊन १९ डिसेंबर रोजी पुण्याहून निघालेले लहुजी शक्ती संघटनेचे हजारो कार्यकर्ते विष्णूभाऊ कसबे यांच्या नेतृत्वाखाली २७ डिसेंबर रोजी विधानभवनावर धडकणार आहेत. मागण्या मान्य न झाल्यास निदर्शने व वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्याचा इशारा लहुजी शक्ती सेनेने शासनाला दिला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा