ॲड. राहुल मखरे यांच्या टोल बंद आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर टोल व्यवस्थापन वठणीवर
| नागपूरे यांना नियुक्तीपत्र देताना टोलचे अधिकारी, पोलीस निरीक्षक मुजावर, ऍड. राहुल मखरे, नगरसेवक पोपट शिंदे आणि इतर वैचारिक मतभेद बाजूला सारून आंदोलनाला मिळाला सर्वपक्षीय पाठिंबा |
मुत्सुद्देगिरी न्युज नेटवर्क
इंदापूर (२१ डिसेंबर) :- २७ नोव्हेंबरच्या रात्री भीमानगर पुलावर झालेल्या भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेला सरडेवाडी टोल प्रशासनाचा मनमानी कारभार व निष्काळजीपणा जबाबदार असल्याच्या आरोपांना काही दिवसच ओलांडले असताना, आता सूचना न देता कामावरून काढल्याच्या मुद्द्यावरून इंदापूर शहरातील गणेश नागपूरे या टोल कर्मचाऱ्याने कामावरून बडतर्फ केल्याच्या कारणास्तव टोल प्रशासनाविरोधात शनिवारी (१८ डिसेंबर) आमरण उपोषणाचा पावित्रा घेतला होता. या आंदोलनाला सामान्यांचा मसिहा ठरत असलेल्या ॲड. राहुल मखरे यांनी रविवारी (१९ डिसेंबर) दिलेल्या टोल बंद आणि बुम तोड आंदोलनाच्या इशाऱ्याची जोड मिळताच वठणीवर आलेल्या टोल प्रशासनाने आपली चूक मान्य करत विनाशर्त नागपूरे यांना पुन्हा कामावर रुजू करून घेतले आहे.
अपवादात्मक घटना वगळता इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तय्यब मुजावर यांनी केलेल्या मध्यस्थीचा फायदा सामान्यांना होत असून, या प्रकरणातही तय्यब मुजावर यांच्या मध्यस्थीनंतर, ॲड. मखरे यांनी आंदोलन एक दिवस पुढे ढकलत, नागपूरे यांना पुढील २४ तासांत कामावर न घेतल्यास टोलचे बुम काढून सरडेवाडी टोल कायमस्वरूपी टोल फ्री करू असा कडक इशारा टोल प्रशासनाला दिला होता. या इशाऱ्यानंतर घाबरलेल्या टोल प्रशासनाने तातडीने रविवारी रात्री ८ वा. गणेश नागपूरे यांना १ जानेवारी पासून कामावर रुजू होण्याचे नियुक्ती पत्र दिल्याने ॲड. मखरे यांनी आंदोलन स्थगित केले. मखरे यांनी टोल वाल्यांचे कान चांगलेच टोचले असेल तरी, टोल प्रशासनाच्या वारंवार होणाऱ्या चुका कर्मचाऱ्यांसह सामान्यांनाही त्रासदायक ठरत असल्याचे सांगत, यापुढे चुका केल्यास आंदोलनाच्या माध्यमातून चांगला धडा शिकवू असे ॲड. मखरे यांनी म्हटले आहे. याआधीही २१ जून आणि २१ डिसेंबर रोजी वेगवेगळ्या कारणास्तव स्थानिकांनी टोल प्रशासनाविरोधात आंदोलने केली होती. तर खुद्द राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनीही २१ नोव्हेंबर रोजी टोल प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा अनुभव घेतला आहे.
हे देखील वाचा - शरीर सौष्ठव स्पर्धेत इंदापूर महाविद्यालयाचे घवघवीत यश
टोल प्रशासनाच्या मनमानी कारभाराविरोधात वेगवेगळ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी मतभेद बाजूला ठेवत ॲड. मखरे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला हे या आंदोलनाचे वैशिष्ट ठरले. यामध्ये, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक पोपट शिंदे, नगरसेवक अमर गाडे, नगरसेवक गजानन गवळी, भारत मुक्ती मोर्चाचे राज्य उपाध्यक्ष नानासाहेब चव्हाण, राजू ताटे, ॲड. सुरज मखरे, अजिंक्य जावीर, बहुजन मुक्ती पार्टीचे शहराध्यक्ष संतोष क्षीरसागर, भारत मुक्ती मोर्चाचे शहराध्यक्ष नागेश भोसले, सूरज धाईंजे, गौस सय्यद, वसीम शेख, वसीम बागवान, रोहित ढावरे, अक्षय मखरे व इतर अनेक पक्षीय नेते व कार्यकर्त्यांनी सक्रीय सहभाग घेतला होता.
ॲड. मखरे यांचं कोणतंही आंदोलन आजवर अयशस्वी झालेलं नाही. अन्याग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा नेता अशी ओळख असणाऱ्या ॲड. मखरे इंदापूर तालुक्यातील सामान्यांसाठी मसिहा ठरत आहेत. अन्यायग्रस्तांसाठी कोणाशीही भिडण्याची धमक त्यांच्याकडे असून, अन्यायग्रस्त कोणत्याही पक्षाचा असो, कोणत्याही जाती वा धर्माचा असो, समस्या कोणत्याही प्रकारची असो, अन्यायग्रस्त आपल्या नेत्याकडे नव्हे, तर हक्काने व न्यायाच्या उमेदीने ॲड. मखरे यांच्याकडेच जातो हा आजवरचा इतिहास आहे. मात्र दुर्दैव निवडणूक येताच ॲड. मखरे यांच्या माध्यमातून न्याय मिळालेला अन्यायग्रस्त आपल्याच नेत्याचा आणि पक्षाचा झेंडा आपल्या खांद्यावर मिरवताना दिसतो. त्यामुळेच की काय ॲड. मखरे यांना आजवर स्थानिक राजकारणात म्हणावे तसे यश संपादन करता आलेले नाही.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा