इंदापूर तालुक्यातील नागरिकांनी लसीचा दुसरा डोस न घेतल्यास होणार कारवाई
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क
इंदापूर (१२ डिसेंबर) :- कोरोनाच्या ओमीक्रॉन व्हेरियंटचा संभाव्य धोका लक्षात घेता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी कोरोनाच्या दुसऱ्या डोसवरून इंदापूर तालुक्यासह बारामती, दौंड आणि पुरंदर तालुक्यातील नागरिकांना कारवाईचा इशारा दिला आहे. या तालुक्यातील नागरिकांनी कोरोना लसीच्या दुसऱ्या डोसला प्रतिसाद न दिल्यास येणाऱ्या बैठकीत यावर कारवाईबाबत कठोर निर्णय घ्यावा लागेल, कारण तज्ञांनी 'काहीही करा पण नागरिकांना दुसरा डोस द्या' असा सल्ला दिला असल्याचे मत अजित पवार यांनी पुण्यात एका ठिकाणी बोलताना व्यक्त केले आहे.
पुण्यामध्ये पहिला डोस १०० टक्क्यांच्या जवळपास झाला आहे. परंतु दुसऱ्या डोसचं प्रमाण फार कमी असल्याचे नमुद करताना अजित पवार यांनी, इंदापूर तालुक्यासह बारामती, दौंड आणि पुरंदर तालुक्यामध्येही दुसऱ्या डोसची पुरेशी संख्या पाहायला मिळत नसल्याचे म्हटले आहे. आम्ही पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद दोघांनाही जिल्ह्यातील यंत्रणांना कामाला लावण्याचे आदेश दिले असल्याचेही म्हटले आहे.
हे देखील वाचा - ऐतिहासिक चाँदशाहवली बाबांची दर्गा आणि उरुसावर एक विशेष लेख
या ठराविक तालुक्यांमध्ये दुसऱ्या लसीच्या डोसची संख्या वाढावी म्हणून या आठवड्यात प्रशासनाला संधी दिली असून, त्याला कसा प्रतिसाद मिळतो ते पाहण्याबरोबरच या तालुक्यातील लोकांनी सहकार्य केलं नाही, तर पुढील बैठकीत आम्ही थोडासा कठोर आणि कडक निर्णय घेऊ. कारण तज्ज्ञांनी काहीही करा पण प्रत्येक जिल्ह्यातील आणि संपूर्ण राज्यातील जनतेला लसीचे दोन्ही डोस देण्याचा सल्ला दिला आहे, असं अजित पवार यांनी सांगितलं.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा