दिव्य कुरआनातील आदेशाला मूर्त स्वरूप - इंदापूर शहरात मस्जिदमध्ये सुरू झाली अभ्यासिका
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क (समीर सय्यद) इंदापूर (२६ फेब्रुवारी) - दिव्य कुरआनातील इकरअ अर्थात "वाच आपल्या पालनकर्त्याच्या नावाने ज्याने तुला निर्माण केले" या आयतीपासून प्रेरित होऊन इंदापूरमधील मुस्लिमांनी एका अनोख्या, परंतु इस्लाम इतक्याच पुरातन, तथा मुहम्मद पैगंबरांनी मस्जिदे नबवीमध्ये राबविलेल्या आदर्श उपक्रमाला नव्याने सुरुवात केली आहे. इंदापूर शहरातील शेख मोहल्ला स्थित मक्का मस्जिदमध्ये मुस्लिम युवकांसाठी 'इकरअ' या नावाने अभ्यासिका सुरू करण्यात आली. त्यामुळे इंदापूर शहरातील मुस्लिम युवकांना आता मक्का मस्जिदमध्ये आध्यात्मिक आणि आदर्श इस्लामी संस्कारांबरोबरच आधुनिक शिक्षणही घेता येणार आहे. मस्जिदशी संलग्न जवळपास ७५० स्के.फू. जागेतील या अभ्यासिकेत एकाच वेळी २० पेक्षा जास्त मुस्लिम युवक भविष्य घडविण्यासाठी ज्ञानार्जन करू शकणार आहेत. २४ फेब्रुवारी रोजी या स्टडी सेंटरचा शुभारंभ कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक अधिकारी कर्मचारी असोसिएशन, पुणे जिल्ह्याचे पदाधिकारी व राष्ट्रपती पदक प्राप्त निवृत्त एसीपी जानमोहम्मद पठाण, निवृत्त सहाय्यक प...