शवविच्छेदन केलेल्या मृतांचे अवशेष उघड्यावर जाळले ही वस्तुस्थिती; अवशेषांची विल्हेवाट नियमबाह्य पद्धतीने - इंदापूर उपजिल्हा रुग्णालय प्रकरणावर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नांदापूरकर यांचे स्पष्टीकरण

अवशेष जाळलेल्या ठिकाणाची पाहणी करताना डॉ. नांदापूरकर

पारदर्शी चौकशीसाठी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत संबंधितांवर निलंबनाची कारवाई होणे गरजेचे.

चेतन चव्हाण (संपादक)

इंदापूर (२९ डिसेंबर) :- इंदापूर उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात असलेल्या शवविच्छेदन गृहाबाहेरच शवविच्छेदन करण्यात आलेल्या मृत व्यक्तींचे अर्धवट जळालेले अवशेष भटके कुत्रे व डुकरे खात असल्याचा निंदनीय प्रकार सोमवारी (२७ डिसेंबर) उघडकीस आला होता. अवशेष उघड्यावर जाळले ही वस्तुस्थिती असल्याचे व नियमानुसार अवशेषांची विल्हेवाट लावल्याचे प्राथमिकत: दिसत नसल्याचे सांगत, पुणे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर यांनी लवकरच चौकशी पूर्ण करून अहवाल वरिष्ठांना सादर करू, तदनंतर कारवाईबाबत वरिष्ठ निर्णय घेतील असे म्हटले आहे. काल (२८ डिसेंबर) ते घटनेची चौकशी करण्यासाठी इंदापूर उपजिल्हा रुग्णालय येथे आले होते. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी वरील मत व्यक्त केले.

इंदापूर उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारातील शवविच्छेदन गृहाबाहेरच शवविच्छेदन करण्यात आलेल्या व्यक्तींचे शरीराचे अर्धवट जाळण्यात आलेले अवशेष भटके कुत्रे आणि डुकरे खात असल्याचा निंदनीय प्रकार उघडकीस आल्याने या प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी होऊन दोषींवर कारवाई व्हावी अशी मागणी केली जात होती. या गंभीर घटनेची दखल घेत तातडीने घटनेची चौकशी करण्यासाठी डॉ. नांदापूरकर काल इंदापूर येथे आले होते. या घटनेच्या चौकशीसाठी आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉक्टर संजोग कदम आणि एमडी पॅथॉलॉजिस्ट डॉ. मिलिंद कुलकर्णी यांची नेमणूक करण्यात आली असून, पारदर्शी चौकशीसाठी चौकशीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत संबंधितांना निलंबित करणे आवश्यक आहे.

घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर, मृतांच्या अवशेषांना उघड्यावर जाळले ही वस्तुस्थिती असून, अवशेषांची विल्हेवाट नियमबाह्य व चुकीच्या पद्धतीने लावण्यात आली असल्याचे डॉ. नांदापूरकर यांनी यावेळी मान्य करत, घटनेचा अहवाल लवकरच वरिष्ठांना सादर करू व त्या अनुषंगाने दोषींवर कारवाई करण्याचा निर्णय वरिष्ठ अधिकारी घेतील असे नांदापूरकर यांनी म्हटले आहे. मुळात मृतांचे काढण्यात आलेले अवशेषांची (वीसारा) ठराविक कालावधीनंतर विल्हेवाट लावण्यात येते. मात्र, मागील ६ वर्षाच्या कालावधीत शवविच्छेदन करण्यात आलेल्या मृतांचे अवशेष शवविच्छेदन गृहात 'जैसे थे' अवस्थेत ठेवण्यात आले होते. या अवशेषांची विल्हेवाट नियमबाह्य पद्धतीने लावण्यात आल्याने घटनास्थळी भयानक दुर्गंधी पसरली होती व गंभीर स्वरूपाचे आजार पसरण्याचा धोका निर्माण झाला होता. विशेष म्हणजे या ठिकाणापासून अवघ्या काही मीटर अंतरावर लोकवस्ती व लहान मुलांचे रुग्णालय आहे.

दहनानंतर मृताची राखही गंगेत सोडण्याची संस्कृती आपल्याकडे असताना, मृतांचे अवशेष अशा पध्दतीने भटक्या जनावरांचे भक्ष्य बनत असतील तर हा प्रकार गंभीर आहे. साधे कुलुपही नसलेल्या शवविच्छेदन गृहातून उद्या भटक्या कुत्र्यांनी मयताचे शरीर ओढून नेहले तर आश्चर्य वाटायला नको, अशा प्रतिक्रिया सामान्यांतून येऊ लागल्या आहेत. अनेक तक्रारी होऊनही कारवाई होत नसल्यानेच असे निंदनीय प्रकार मागील दोन वर्षांपासून प्रभारी अधिकाऱ्यांच्या भरवशावर असलेल्या इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात अगदी सहजरीत्या घडत आहेत का असा सवाल या निमित्ताने सामान्य इंदापूरकरांना पडत असून, अशा गंभीर प्रकारानंतरही दोषींची पाठराखण केली जाणार का अशी चर्चा इंदापूरकरांमध्ये सुरू आहे.

वैद्यकीय अधिकार्‍याला स्वतःचा खाजगी दवाखाना चालवण्याची परवानगी नाही - डॉ. अशोक नांदापूरकर

इंदापूर उपजिल्हा रुग्णालयाच्या चहूकडे अवघ्या काही मीटर अंतरावर खाजगी दवाखान्यांचा विळखा आहे. त्यामुळे याचा परिणाम शासकीय रुग्णालयात रुग्णांच्या उपचारांवर होत असल्याची कुजबुज शहरात नेहमी होत असते. शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती असलेल्या कोणत्याही वैद्यकीय अधिकाऱ्याला स्वतःचा खाजगी दवाखाना टाकण्याची परवानगी नसते असे डॉ. नांदापुरकर यांनी पत्रकार परिषदेतील एका प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले. इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी पदावर काम करणाऱ्या काही डॉक्टरांचे स्वतःचे खाजगी रुग्णालय शासकीय रुग्णालयाच्या अवघ्या काही मीटर अंतरावर असल्याचे पत्रकारांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर डॉ. नांदापूरकर यांनी कोणी तक्रार केल्यास निश्चित यावर कारवाई करू असे स्पषटीकरण दिले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट