इंदापूर तालुका प्रशासकीय चषक क्रिकेट स्पर्धेत इंदापूर पोलीस ठाण्याच्या संघाची बाजी; शिक्षक संघ उपविजेता



समीर सय्यद (उपसंपादक, मासिक मुत्सुद्देगिरी)

रविवार (१४ फेब्रुवारी) : क्रीडा विभागाच्या पुढाकाराने क्रीडा संकुलाच्या मैदानावर ७-१४ फेब्रुवारी दरम्यान खेळल्या गेलेल्या 'इंदापूर तालुका प्रशासकीय चषक' क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात 'जि. प. प्राथमिक शिक्षक संघाचा' पराभव करत इंदापूर पोलीस ठाण्याच्या संघाने विजेतेपद पटकावले. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंदापूर पोलीस ठाण्याच्या संघाने ५ षटकांत अवघ्या ४० धावांचे लक्ष शिक्षक संघापूढे ठेवले होते. मात्र उत्कृष्ट गोलंदाजी आणि चपळ क्षेत्ररक्षण करणाऱ्या इंदापूर पोलीस ठाण्याच्या संघापुढे शिक्षक संघाला ३८ धावांपर्यंतच मजल मारता आली.

कोरोनाच्या महामारीमुळे गेली वर्षभर प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण भलताच वाढला होता. कामाच्या ताणातून वाढलेला तणाव कमी व्हावा तसेच वेगवेगळ्या विभागात काम करणाऱ्या प्रशासकीय कर्मचाऱ्यांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध निर्माण व्हावेत याकरिता इंदापूर तालुका प्रशासकीय चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. क्रीडा विभागाच्या पुढाकाराने पार पडलेल्या या स्पर्धेत, क्रीडा विभाग, महसूल विभाग, जि. प. प्रा. शिक्षक संघ, पत्रकार संघ आणि पोलीस ठाण्याच्या संघासहित एकूण १४ संघांनी भाग घेतला होता.

हे देखील वाचा - बेकायदेशीर गुटखा विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर इंदापूर पोलीसांची कार्यवाही इंदापूर शहरातील गुटखा वॉरचा परिणाम?

भल्या भल्या गुन्हेगारांना पळता भुई थोडी करणारे व अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देणारे इंदापूर पोलीस आणि शिक्षणाच्या माध्यमातून पिढी व देश घडवणाऱ्या शिक्षकांच्या क्रिकेट संघांदरम्यान आज (१४ फेब्रुवारी) झालेल्या रंगतदार आणि अटीतटीच्या अंतिम सामन्यात प्रथम नाणेफेक जिंकून फलंदाजी करताना पोलीस नाईक दीपक पालके यांच्या नेतृत्वात खेळणाऱ्या इंदापूर पोलीस ठाण्याच्या क्रिकेट संघाने पोलीस शिपाई गणेश भापकर यांच्या ५ चेंडूतील १३ धावांच्या बळावर ५ षटकांत ४० धावांचे लक्ष शिक्षक संघासमोर ठेवले होते. मात्र उत्कृष्ट गोलंदाजी व चपळ क्षेत्ररक्षणाच्या बळावर प्रतिस्पर्धी संघाच्या ४ फलंदाजांना धावबाद करत इंदापूर पोलीस ठाण्याच्या संघाने शिक्षक संघाला ३८ धावांवर रोखत केवळ एका धावेने हा सामना जिंकून 'इंदापूर तालुका प्रशासकीय चषक' आपल्या ताब्यात केला. उत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन करत पोलीस शिपाई कुणाल निकम यांनी २ षटकांत तब्बल ७ चेंडू निर्धाव टाकत संघाचा विजय सोपा केला. उपांत्य फेरीमध्ये इंदापूर पोलीस ठाण्याच्या संघाने पंचायत समितीच्या संघाला तर शिक्षक संघाने पत्रकार संघाला हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला होता.






टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट