बेकायदेशीर गुटखा विक्रेत्यांवर इंदापूर पोलीस व अन्न औषध प्रशासनाची कार्यवाही; गुटखा वॉरचा परिणाम?
शनिवार (१३ फेब्रुवारी) : इंदापूर पोलीस प्रशासन आणि अन्न औषध प्रशासन यांनी काल (१२ फेब्रुवारी) संयुक्तरित्या केलेल्या कार्यवाहीमध्ये इंदापूर शहरामध्ये बेकायदेशीर गुटखा विक्री करणाऱ्या पदमाकर नरहरी तांदूळकर आणि अजीज नूरमुहम्मद मोमीन या दोघा व्यापाऱ्यांकडून तब्बल १,२७,३८८ रूपयांचा बंदी असलेला गुटखा हस्तगत केला आहे. याप्रकरणी इंदापूर पोलीस ठाण्यात कलम १७९, १८८ ,२७२, २७३, ३२८ तसेच अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ च्या कलम ३०(२-a-१), २६ (२) (iv) अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, ही कार्यवाही म्हणजे शहरातील दोघा गुटखा किंगमधील गुटखा वॉरचा परिणाम असल्याची चर्चा शहरामध्ये सुरू आहे.
इंदापूर शहरामध्ये बंदी असलेला गुटखा विक्री केला जात असल्याची माहिती इंदापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांना मिळाली होती. त्याआधारे इंदापूर पोलीस प्रशासन आणि अन्न व औषध प्रशासन यांनी काल (१२ फेब्रुवारी) संयुक्तरित्या धाडी टाकत पदमाकर नरहरी तांदूळकर आणि अजीज नूरमुहम्मद मोमीन यांच्याकडील ४२,९६० किंमतीचा विमल पान मसाला (ब्ल्यू) ३५८ पॅकेट, १४,१४० रु. किंमतीची व्ही वन तंबाखू (ब्ल्यू) ४६८ पॅकेट, १२,५२९ रु. किंमतीचा विमल पान मसाला (लाल) ६७ पॅकेट, २,४०९ रु. किंमतीची व्ही वन तंबाखू ६७ (लाल ) पॅकेट, ३०,२४० रु. किंमतीचा आर एम डी पान मसाला ४२ पॅकेट, १२,६०० रु. किंमतीची एम सेंटेड तंबाखू ४२ पॅकेट, ६,१६१ रु. किंमतीचा विमल पान मसाला किंग २८ पॅकेट, ५,५४४ रु. किंमतीची व्ही वन तंबाखू किंग २८ पॅकेट, ५,१६० रु. किंमतीचा विमल पान मसाला ४३ पॅकेट, १,२९० रु. किंमतीची व्ही वन तंबाखु ४३ पॅकेट, असा एकूण १,२७,३८८ रु. किंमतीचा बंदी असलेला गुटखा हस्तगत केला आहे.
याबाबत अन्नसुरक्षा अधिकारी शुभांगी बालकृष्ण अंकुश (रा.सिंहगड रोड, पुणे) यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, कलम १७९, १८८ ,२७२, २७३, ३२८ तसेच अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ च्या कलम ३० (२-a-१), २६ (२-iv) अशा विविध कलमान्वये वरील दोघा व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव करीत आहेत.
ही कार्यवाही इंदापूरमधील गुटखा वॉरचा परिणाम?
इंदापूर शहर गुटखा विक्रीचे केंद्र बनत चालले असून, छोट्या टपऱ्यांवर देखील गुटखा अगदी सहज उपलब्ध होतो. ही बाब पोलीस प्रशासनाच्या निदर्शनात नाही असे म्हणणे चुकीचे ठरेल. किंबहुना याला पोलीसांचे अभय आहे? अशी चर्चा शहरामध्ये आहे. बेकायदेशीर गुटखा विक्री करणाऱ्यांवर काल अथवा यापूर्वी झालेल्या कार्यवाह्या केवळ दोन गुटखा किंगमध्ये सुरू असलेल्या गुटखा वॉरचा परिणाम असल्याची चर्चा देखील इंदापूर शहरामध्ये सुरू आहे.






टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा