वयोवृद्ध आई वडिलांना मारहाण करणाऱ्या मुलाविरोधात इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल



अपत्यग्रस्त जेष्ठ नागरिकांनी तक्रारीसाठी पुढे यावे - पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांचे आवाहन

समीर सय्यद (उपसंपादक, मासिक मुत्सुद्देगिरी)

शुक्रवार (१२ फेब्रुवारी) : वयोवृध्द आई वडिलांचा सांभाळ करण्याऐवजी त्यांना दमदाटी, शिवीगाळ आणि मारहाण करणाऱ्या मुलाविरोधात इंदापूर पोलीस ठाण्यात आई वडिलांच्या व जेष्ठ नागरिक निर्वाह व कल्याण अधिनियम २००७ च्या कलम २४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रताप बाबुराव फाळके व त्यांच्या पत्नीने रवींद्र प्रताप फाळके (रा. वरकुटे बु, ता. इंदापूर, जि. पुणे) या आपल्या मुलाविरोधात फिर्याद दाखल केली आहे. इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी अशा अपत्यग्रस्त जेष्ठांना तक्रार देण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे.

वयोवृद्ध आई वडीलांचा सांभाळ करणे कर्तव्य असतानादेखील वयोवृद्ध आई वडिलांना मारहाण करणारी दुर्दैवी घटना समोर आली आहे. ७० वर्षीय प्रताप बाबुराव फाळके (रा. वरकुटे बु, ता. इंदापूर, जि. पुणे) व त्यांच्या पत्नीला औषधोपचाराचा खर्च नाकारत त्यांच्याच मुलाने शिवीगाळ, दमदाटी आणि लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. ही दुर्दैवी घटना मंगळवारी (९ फेब्रुवारी) सायंकाळी ७ वा. सुमारास घडली असून, या वृद्ध जोडप्याने इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्या अनुषंगाने रवींद्र प्रताप फाळके (रा. वरकुटे बु, ता. इंदापूर, जि. पुणे) यांच्याविरोधात काल (११ फेब्रुवारी) इंदापूर पोलीस ठाण्यात आई वडिलांच्या व जेष्ठ नागरिक निर्वाह व कल्याण अधिनियम २००७ कलम २४, तसेच भा. द. वि. कलम ३२३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास पो. ना. धंगेकर करत आहेत.

वंशाचा दिवा म्हातारपणाची काठी ठरेल अशी कुटुंबातील ज्येष्ठांना अपेक्षा असते. मात्र ही काठी वृद्ध आई-वडिलांच्याच पाठी पडत असल्याचे भयानक चित्र या प्रकरणाच्या माध्यमातून पुढे आले आहे. आयुष्यभर ज्यांच्यासाठी खस्ता खाल्ल्या त्यांनीच उतारवयात अशी परतफेड केल्याने मानसिक, शारीरिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल झालेल्या अपत्यग्रस्त जेष्ठ नागरिकांच्या पाठीशी इंदापूर पोलीस उभी असून, अशा नागरिकांनी तक्रार देण्यासाठी पुढे यावे - धन्यकुमार गोडसे (पोलीस निरीक्षक, इंदापूर पोलीस ठाणे)

वाचा काय आहेत जेष्ठ नागरिक निर्वाह व कल्याण अधिनियम २००७ मधील तरतुदी






टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट