पळसदेवनजीक अपघात; १२ वर्षाचा मुलगा जागीच ठार, तर दांपत्य जखमी


मुत्सुद्देगिरी न्युज नेटवर्क

पळसदेव (२३ जानेवारी) : पुणे सोलापूर महामार्गावर पळसदेवनजीक (ता. इंदापूर) किया (kia) कंपनीच्या लाल रंगाच्या चारचाकी वाहनाने पुण्याच्या दिशेने निघालेल्या एका होंडा कंपनीच्या (शाईन) दुचाकी वाहनाला पाठीमागून धडक दिली असून, या अपघातात १२ वर्षाचा मुलगा जागीच ठार झाला. तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीआधारे पोलीसांनी तात्काळ हालचाल करत धडक देणारे वाहन कळस (ता. इंदापूर) येथून ताब्यात घेतले आहे.

सविस्तर वृत्त असे की,  इंदापूर पोलीस ठाण्याला अपघाताची खबर देणारे पोलीस पाटील पंढरीनाथ सुभाष बांडे (रा. बांडेवाडी पळसदेव, ता. इंदापूर, जि. पुणे) हे काल (२३ फेब्रुवारी) दुपारी १ वा. ३० मी. सुमारास कामानिमित्त पुण्याच्या दिशेने काळेवाडी या ठिकाणी निघाले असताना पळसदेव गांवाच्या पुढे साधारण अर्धा कि.मी. अंतरावर होंडा कंपनीच्या (शाईन) अपघातग्रस्त दुचाकीसह (एमएच १२ एलएम ४५८७) रमेश राम खेत्री व निलम रमेश खेत्री हे दांपत्य (रा. वारजे माळवाडी, पुणे) जखमी अवस्थेत, तर त्यांचा मुलगा राहुल रमेश खेत्री (वय १२ वर्ष) हा जागीच मृत झाल्याचे दिसले. या अपघातग्रस्त दुचाकी वाहनाला किया (kia) कंपनीच्या लाल रंगाच्या चारचाकी वाहनाने (एमएच १२ टीडी ४४९३) पाठीमागून धडक दिल्याची प्राथमिक माहिती जमलेल्या लोकांकडून मिळाली होती.

पंढरीनाथ सुभाष बांडे यांनी या अपघाताची माहिती त्वरित पोलीसांना कळवली. अपघाताची माहिती मिळताच पोलीसांनी त्वरित हालचाली करत धडक देणाऱ्या वाहनाला अवघ्या काही मिनिटांतच कळस (ता. इंदापूर) या ठिकाणाहून ताब्यात घेतले. पोलीस पाटील पंढरीनाथ सुभाष बांडे यांच्या महितीआधारे पोलीस हवालदार दीपक पालके यांनी खबर जबाब इंदापूर पोलीस ठाण्यात दाखल केला असून, पुढील तपास पोलीस हवालदार अरुण रासकर करत आहेत.





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट