BIG BREAKING - तर पालखीचा इंदापूर मुक्काम रद्द करून पुढे जाऊ - देहू संस्थानाचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांचे मोठे वक्तव्य
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क
इंदापूर (२० जून) :- इंदापूर शहरातील पालखी मुक्कामाची जागा बदलण्यावरून इंदापूरचे ग्रामस्थ आक्रमक झाले असताना देहू संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांनी मोठे वक्तव्य केले आहे. पालखीच्या मुक्काम स्थळावरून प्रशासन आणि ग्रामस्थांमधील वाद वेळीच मिटला नाही तर संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा इंदापूर शहरातील नियोजित मुक्काम आम्हाला रद्द करून पुढे जावे लागेल असे त्यांनी मुत्सुद्देगिरीशी बोलताना म्हटले आहे. असे झाल्यास ही इंदापूरच्या इतिहासाला न शोभणारी व इंदापूरकरांसाठी खूप लाजिरवाणी गोष्ट ठरणार आहे. त्यामुळे प्रशासन आणि ग्रामस्थ यांच्यात लवकर तोडगा निघणे महत्वाचे ठरणार आहे.
दोन वर्षांच्या कोरोना संकटानंतर जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखी २ आणि ३ जुलै रोजी इंदापूर मुक्कामी येत आहे. मात्र प्रशासनाने पालखीच्या मुक्कामाची जागा बदलल्याने प्रशासन आणि ग्रामस्थ यांच्यात चांगलेच वादंग निर्माण झाले आहे. प्रशासनाने निर्णय न बदलल्यास मंगळवारी (२१ जून) रास्ता रोको, गुरूवारी (२३ जून) इंदापूर तहसील कचेरी समोर लाक्षणिक उपोषण, रविवारी (२६ जून) तहसील कचेरीवर मोर्चा, तर शेवटच्या टप्प्यात पालखी मुक्कामी असताना (२ आणि ३ जुलै) इंदापूर शहर बंद ठेवण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
![]() |
| तहसीलदार श्रीकांत पाटील यांना मागणीचे निवेदन देताना ग्रामस्थ |
प्रशासन आणि इंदापूरचे ग्रामस्थ यांच्यातील वादाची कल्पना आधीच असती तर पालखीच्या नियोजनात आम्ही बदल केला असता असे नितीन महाराज मोरे यांनी म्हटले असून, प्रशासन आणि ग्रामस्थ यांच्यात वेळीच तोडगा न निघाल्यास आम्हाला इंदापूर शहरातील पालखीचा नियोजित मुक्काम रद्द करून पुढे जावे लागेल असे मोठे विधान त्यांनी मुत्सुद्देगिरीशी बोलताना केले आहे. या त्यांच्या मोठ्या वक्तव्यानंतर प्रशासन आणि ग्रामस्थ आता यावर काय भूमिका घेणार हे बघावे लागणार आहे.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा