इंदापूर येथील पालखीचा मुक्काम नक्की कुठे होणार याबाबत अजूनही अनिश्चितता? देहू संस्थान भूमिका उद्या स्पष्ट करणार
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क
इंदापूर (२७ जून):- इंदापूर शहरातील पालखी मुक्काम नेमका कुठे होणार याबाबत अद्यापही अनिश्चितता असून, देहू संस्थानाचे विश्वस्त उद्या (२८ जून) पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका स्पष्ट करणार असल्याचे ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाकडून सांगण्यात आले आहे. शनिवारी (२५ जून) देहू संस्थानाच्या विश्वस्तांना भेटण्यासाठी इंदापूर ग्रामस्थांचे शिष्टमंडळ यवत (ता. दौंड) येथे गेले होते. यावेळी देहू संस्थानाचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांच्याशी चर्चा झाल्याचे ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाकडून सांगण्यात आले. त्यामुळे देहू संस्थान उद्या काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शुक्रवारी (२४ जून) शासकीय विश्रामगृह या ठिकाणी झालेल्या बैठकीनंतर इंदापूर ग्रामस्थांचे शिष्टमंडळ शनिवारी (२५ जून) देहू संस्थांनाच्या विश्वस्तांना भेटण्यासाठी यवत येथे गेले होते. यावेळी ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने ग्रामस्थांची भावना देहू संस्थानाचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांच्यासमोर स्पष्ट केली होती. मात्र यावर देहू संस्थानाच्या सर्व विश्वस्तांशी चर्चा करून आपण निर्णय देऊ असे स्पष्टीकरण नितीन महाराज मोरे यांनी दिल्याचे ग्रामस्थांच्या शिष्टमंडळातील सदस्याने म्हटले आहे. पालखी मंगळवारी (२८ जून) बारामती मुक्कामी येणार असून, ग्रामस्थांचे शिष्टमंडळ उद्या पुन्हा भेट देऊन देहू संस्थानाच्या विश्वस्तांचे मन परिवर्तन करण्याचा प्रयत्न करणार आहे.
देहू संस्थान लवचिक भूमिका स्वीकारेल अशी अपेक्षा
दुसरीकडे ग्रामस्थांच्या विरोधानंतरही नव्या पालखी तळाचे काम प्रशासनाकडून युद्ध पातळीवर सुरू आहे. त्यामुळे नियोजित स्थळ बदलले जाणार नसल्याची चर्चा रंगत आहे. मात्र देहू संस्थानाने निर्णय न बदलल्यास पेच आणखी वाढणार आहे. ग्रामस्थांच्या भावना तीव्र असून, २ आणि ३ जुलै रोजी पालखी मुक्कामी असताना इंदापूर बंदचा इशारा ग्रामस्थांनी याआधीच दिला आहे. हा पेच बंदपर्यंत ताणला गेल्यास देहू संस्थानाच्या अध्यक्षांनीही इंदापूरला बायपास करण्याचा इशारा २० जून रोजी दिला होता. मात्र उद्भवणारी परिस्थिती टाळण्यासाठी मध्यममार्ग म्हणून देहू संस्थानाने आपला निर्णय बदलल्यास हा वाद तूर्तास संपुष्टात येऊ शकतो. कारण या वादावर चर्चा करण्यास, तोडगा काढण्यास प्रशासन, देहू संस्थान आणि ग्रामस्थांना पुढे एका वर्षाचा कालावधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे देहू संस्थानाने तुकाराम महाराजांच्या 'एक मेका साह्य करू अवघे धरू सुपंथ' या शिकवणीस साजेशी लवचिक भूमिका स्वीकारावी अशी अपेक्षा केली जात आहे. कारण वारीचा उद्देश फक्त देवदर्शन नसून, सर्व भेदाभेद, सर्व वादविवाद मिटवून सर्व समाजातील सर्व स्तरातील लोकांना एकत्र आणणे हा आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा