काँग्रेसमध्ये होते खास भाजपमध्ये अजूनही वेट ॲण्ड वॉच; विधान परिषदेसाठी भाजपने हर्षवर्धन पाटील यांना पुन्हा डावलले
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क
इंदापूर (८ जून) :- आगामी विधानपरिषद निवडणुकीसाठी माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांना भाजपने पुन्हा एकदा डावलल्याने 'काँग्रेसमध्ये होते खास भाजपमध्ये अजूनही वेट ॲण्ड वॉच' अशी चर्चा तालुक्यात रंगू लागली आहे. २० जून रोजी १० जागांसाठी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपने बड्या नेत्यांना डावलत अनपेक्षितरित्या भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा व गोपीनाथ मुंडे यांच्या निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या उमा खापरे आणि भाजपचे प्रदेश सरचिटणीस तसेच देवेंद्र फडणवीस यांचे ओएसडी श्रीकांत भारतीय या नव्या चेहऱ्यांना संधी देऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. तर कर्जत जामखेडचे माजी आमदार राम शिंदे आणि विरोधी पक्षनेते म्हणून प्रवीण दरेकर, तसेच प्रसाद लाड यांना भाजपकडून संधी देण्यात आली आहे.
जुलै महिन्यात रिक्त होणाऱ्या विधान परिषदेच्या १० जागांसाठी २० जून रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजपचे एकूण संख्याबळ पाहता ४ उमेदवार सहज निवडून येथील अशी परिस्थिती आहे. मात्र भाजपकडून ५ उमेदवार दिले जातील अशी शक्यता वर्तवली जात होती. पैकी हर्षवर्धन पाटील यांचे नाव आघाडीवर असल्याचे बोलले जात होते. त्यामुळे तालुक्यातील पाटील समर्थकांमध्ये उत्साहाचे, तर पाटील यांना संधी मिळणार का अजूनही थांबावेच लागणार याबाबत तालुक्यात औत्सुक्याचे वातावरण होते. या निवडणुकीसाठी हर्षवर्धन पाटील यांच्यासह प्रवीण दरेकर, पंकजा मुंडे, राम शिंदे, प्रसाद लाड, चित्रा वाघ आणि गोपाल अग्रवाल यांच्याही नावांची चर्चा होती. पैकी प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, यांचे नाव नक्की मानले जात होते. यांच्यासह भाजपने अनपेक्षितरीत्या उमा खापरे आणि श्रीकांत भारतीय या चर्चेत नसणाऱ्या उमेदवारांना संधी देऊन सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
पवारांची पॉवर कमी करण्यासाठी भाजप हर्षवर्धन पाटील यांची पॉवर वाढवणार या चर्चांना सध्यातरी पूर्ण विराम
पवारांची पॉवर कमी करण्याकामी, अर्थातच २०२४ मध्ये खासदार सुप्रिया सुळे यांना बारामती लोकसभा मतदारसंघात टक्कर देण्यासाठी हर्षवर्धन पाटील यांना राज्यसभा अथवा विधानपरिषदेवर पाठवून भाजप पाटील यांना राजकीय पॉवर देईल अशी औत्सुक्यपूर्ण चर्चा संपूर्ण तालुक्यात अनेक दिवसांपासून रंगत आहे. मात्र शुक्रवारी (१० जून) ६ जागांसाठी होणाऱ्या राज्यसभेपाठोपाठ आता २० जून रोजी होणाऱ्या विधान परिषदेसाठीही पाटील यांना डावलण्यात आल्याने इंदापूर तालुक्यात इंदापूर हीच जन्मभूमी आणि कर्मभूमी असलेले एकाच वेळी दोन आमदार असणार या चर्चांना सध्यातरी पूर्णविराम मिळाला आहे. या निवडणुकीत कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांना शह देण्यासाठी माजी आमदार राम शिंदे यांना भाजपने या निवडणुकीत संधी दिली आहे.
काँग्रेसमध्ये असताना हर्षवर्धन पाटील पहिल्या फळीचे नेते व मुख्यमंत्री पदाचे होते दावेदार
हर्षवर्धन पाटील महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठं नाव आहे. १९९५ पासून २०१४ पर्यंत महाराष्ट्राचे राजकारण निर्विवादपणे गाजवणारे पाटील यांनी २००९ ची विधानसभा काँग्रेसमधून लढवली होती. असे असले तरी २००९ पर्यंत अपक्ष असणारे हर्षवर्धन पाटील यांनी एकूण राजकीय कार्यकाळात सर्वाधिक काळ काँग्रेसच्या मंत्रिमंडळात विविध महत्वाच्या खात्यांचे मंत्रीपद भूषविले आहे. विशेष म्हणजे पाटील काँग्रेसमध्ये असताना पहिल्या फळीचे नेते आणि मुख्यमंत्री पदाचे दावेदार मानले जात होते. मात्र २०१४ मध्ये झालेला पराभव आणि २०१९ मध्ये बदललेल्या राजकीय समिकरणांच्या गणितांची बेरीज वजाबाकी करत कर्मयोगींच्या विचारांचा डिएनए असलेल्या पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. परंतु भाजप प्रवेशाला हर्षवर्धन पाटील यांच्या अनेक समर्थकांनी, कार्यकर्त्यांनी आणि अनेक पदाधिकारी व निकटवर्तीयांनी विरोध दर्शवला होता. त्यांच्या भाजप प्रवेशाला आता तीन वर्ष होतील. असे असूनही पाटील यांना विधान परिषद, राज्यसभा अथवा पक्षात कोणतेही महत्वाचे पद मिळालेले नाही. त्यामुळे साहजिकच पाटील यांच्या कार्यकर्त्यांचे मनोधैर्य खचल्याची आणि पाटील यांच्यावर भाजपमध्ये अन्याय होत असल्याची चर्चा आहे. मात्र विधान परिषदेची सर्व नावे जाहीर झाल्यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी 'भाजपमध्ये सर्वांना संधी मिळते, कार्यकर्त्यांनो जोमाने कामाला लागा' या दिलेल्या प्रतिक्रियेवरून पाटील यांना अजूनही उमेद असल्याचे दिसत आहे.
काँग्रेसमध्ये असते तर त्यांना सन्मान आणि समाधान दोन्ही लाभले असते
२०१९ ची विधानसभा अवघ्या ३ हजार मतांच्या फरकाने हरलेले हर्षवर्धन पाटील तीच निवडणूक काँग्रेसमधून अथवा अपक्ष म्हणून लढले असते तर काँग्रेस विचारांच्या इंदापूर तालुक्यात त्यांचा विजय नक्की झाला असता अशी चर्चा आजही होते. २०१९ च्या विधानसभा निकालानंतर अनपेक्षितरीत्या राजकीय समीकरणे बदलली आणि काँग्रेस पुन्हा सत्तेत आली. पाटील आज काँग्रेसमध्ये असते तर त्यांची विधान परिषद अथवा राज्यसभा फिक्स असती अशी तालुक्यात होणारी चर्चा इंदापूरकरांना नवी नाही. किंबहुना भाजपमध्ये जाण्याची अथवा अद्यापही भाजपमध्ये असण्याची कारणे कोणतीही असो, ते पुन्हा काँग्रेसमध्ये जातील अथवा न जातील, मात्र ते आज काँग्रेसमध्ये असते तर त्यांना सन्मान आणि समाधान दोन्ही लाभले असते यात शंका नाही.

हे सगळ चुकिच आहे भाजपच साहेबांना मानसनमान मिळवुन देणार फक्त थोड थांबाव लागेल
उत्तर द्याहटवा