इंदापूर भूमी अभिलेख कार्यालयातील लिपिक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात; २० हजारांची लाच घेतल्या प्रकरणी कारवाई

मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क

इंदापूर (१५ जून) :- शासनाचा भरमसाठ पगार असूनही हराम कमाईसाठी नागरिकांना नाहक त्रास देणारा इंदापूर भूमी अभिलेख कार्यालयातील लिपिक (आवक जावक विभाग, उप अधीक्षक कार्यालय) लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला आहे. काल (१४ जून) सायंकाळी ७ वाजून १५ मिनिटांच्या सुमारास झालेल्या या कारवाईमध्ये जमिनीची हद्द कायम करण्याकामी २० हजारांची लाच घेणाऱ्या राजाराम दत्तात्रय शिंदे (रा.  ढोक बाभूळ, ता. मोहोळ, जि. सोलापूर) या लिपिकास २० हजारांची लाच घेतल्या नंतर पुण्याच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. या संदर्भात निंबोडी (ता. इंदापूर, जि. पुणे) येथील शेतकरी ज्ञानदेव संभाजी घोळवे यांनी १० जून रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.

ज्ञानदेव संभाजी घोळवे यांच्या चुलत्यांच्या निंबोडी हद्दीत असलेल्या जमिनीची इंदापूर भूमी अभिलेख कार्यालयातील लिपिक दत्तात्रय शिंदे यांनी दोन महिन्यांपूर्वी मोजणी केली होती. तदनंतर हद्द कायम करण्यासाठी शिंदे यांनी ज्ञानदेव घोळवे यांच्याकडे २५ हजारांच्या लाचेची मागणी केली होती. शेवटी २० हजारांच्या मोबदल्यात काम क्लिअर करून देण्याचे आर.डी. शिंदे यांनी मान्य केले होते. या संदर्भात १० जून रोजी ज्ञानदेव घोळवे यांनी पुण्याच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे मोजणीदार राजाराम शिंदे यांची तक्रार केली होती. त्या अनुषंगाने लाच लुचपत विभागाकडून पोलीस निरीक्षक संदीप वऱ्हाडे यांच्या नेतृत्वाखाली सापळा रचण्यात आला होता. काल (१४ जून) सायंकाळी ७ वाजून १५ मिनिटांच्या सुमारास या सापळ्यात अडकलेल्या राजाराम दत्तात्रय शिंदे यांना २० हजारांची लाच घेतल्याप्रकरणी लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी लाचेच्या रकमेसह रंगेहाथ पकडले. या प्रकरणी इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, इंदापूर तालुक्याचे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून प्रसिद्ध असलेले तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्या ऑफिस शेजारीच लाच खोरीचा हा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

शासकीय कार्यालये की सामान्य नागरिकांच्या लुटीची केंद्रे?

शासकीय कर्मचाऱ्यांना लागलेल्या हराम पैशांच्या मोहामुळे इंदापूर तालुक्यातील शासकीय कार्यालये ही सामान्य नागरिकांच्या लुटीची केंद्रे बनली आहेत. विशेषतः तहसील कार्यालयातील वेगवेगळ्या विभागात बेकायदेशीरपणे काम करणारे कॅडेट सामान्य नागरिकांसाठी मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या त्रासदायक ठरत असल्याची चर्चा आहे. या आधीही १८ फेब्रुवारी रोजी पंचायत समितीच्या समाज कल्याण विभागातील कनिष्ठ सहाय्यक लिपिक पदावर काम करणारी अश्विनी भोंग ही महिला कर्मचारी अवघ्या ५०० रुपयांसाठी लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात अडकली होती. लाच आणि भ्रष्टाचाराच्या चिखलात एखादा कर्मचारी लोळला नसेल तर त्याला देव माणूस म्हटलं तर वावगं ठरणार नाही. परंतु, सापडला तो चोर नाही तर बादशाहपेक्षा थोर. त्यामुळेच चोर ठरण्याआधीच अशा थोर माणसांवरदेखील कायद्याचा वचक बसणे आवश्यक आहे.

टिप्पण्या

  1. अहो,सगळा चोरांचा बाजार आहे। म्यनिसीपालटी ,ग्रामपंचायत पासून वर दिल्लीपर्यंत हेच चाललेल्ं आहे।कुणी तक्रार केली अन् त्याला कुणी भक्कम पाठिंबा नसेल तर त्याला मरणयातना देतात हे लोक।

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट