मुहम्मद पैगंबर अवमानना प्रकरणी इंदापूर बंदला इंदापूरकरांचा उस्फुर्त प्रतिसाद; इंदापूरकर सामाजिक सलोखा बिघडविणाऱ्या प्रवृत्तींविरोधात असल्याचे स्पष्ट
मुस्लिम बांधवांनी मानले सर्व इंदापूरकरांचे आभार; सामाजिक एकोपा दृढ रहावा यासाठी केली प्रार्थना
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क
इंदापूर (११ जून) :- भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नुपुर शर्मा व नविन जिंदाल यांनी मुहम्मद पैगंबरांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ इंदापूर शहर व तालुक्यातील मुस्लिम बांधवांकडून शनिवारी (११ जून) इंदापूर शहर बंदची हाक देण्यात आली होती. हा बंद पूर्ण शांततेत पार पडला असून, इंदापूर शहरातील सर्व जाती व धर्मातील नागरिक आणि व्यापाऱ्यांनी संपूर्ण सहकार्य करत या बंदला उस्फुर्त प्रतिसाद दर्शविला. १००% यशस्वी झालेल्या या बंदमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता मुख्य बाजारपेठेसह शहरातील सर्व लहान मोठ्या व्यापाऱ्यांनी आपले व्यवसाय बंद ठेवले होते.
भाजपाच्या प्रवक्त्यांनी पैगंबरांबद्दल आक्षेपार्ह विधान करून मुस्लिम समाजाच्या नव्हे तर देश व जगभरातील शांतीप्रिय लोकांच्या धार्मिक भावना भडकावून सामाजिक शांतता व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्यावर गुन्हे दाखल करुन त्यांना तात्काळ अटक करावी या मागणीसह इंदापूर शहर व तालुक्यातील मुस्लिम बांधवांनी शनिवारी (११ जून) इंदापूर शहर बंदची हाक दिली होती. या बंदला इंदापूर शहरातील सर्व जाती व धर्मातील नागरिक व व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद ठेऊन आम्ही महापुरुषांचा अपमान करणाऱ्या आणि सामाजिक सलोखा बिघडविणाऱ्या प्रवृत्तींविरोधात असल्याचे स्पष्ट केले आहे.
मुस्लिम बांधवांकडून सर्व नागरिक आणि व्यापाऱ्यांचे आभार
हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या मालोजी राजेंच्या इंदापूर शहरातील मागील तीस वर्षांचा इतिहास पाहता मुस्लिम समाजाकडून पहिल्यांदाच इंदापूर बंदची हाक देण्यात आली होती. इंदापूर शहरात हिंदू मुस्लिम एकोपा घनिष्ट असल्याने पैगंबरांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाच्या पार्श्वभूमीवर मुस्लिमांच्या दुखावलेल्या भावना लक्षात घेता शहरातील सर्व जाती धर्मातील लोकांनी बंदला १०० % पाठिंबा देत आपले व्यवसाय बंद ठेवले. या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवांनी इंदापूर शहर वासियांचे आभार मानले असून, हा एकोपा असाच दृढ रहावा यासाठी प्रार्थना केली आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा