विधान परिषद - हर्षवर्धन पाटील आज सहाव्या जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार?
इंदापूर (९ जून) :- २० जून रोजी १० जागांसाठी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीसाठी कालच (८ जून) भाजपने पाच उमेदवारांची नावे जाहीर केली होती. मात्र आता भाजप सहाव्या जागेसाठी उमा खापरे यांच्यासह सहावा उमेदवार देखील आज उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. दरम्यान, भाजपकडून सहाव्या जागेसाठी हर्षवर्धन पाटील यांचे नाव चर्चेत असल्याची माहिती येत आहे. गुप्त मतदानाच्या आधारावर सहा उमेदवार निवडून आणण्याचा भाजपकडून दावा केला जात आहे.
बुधवारी भाजपने आपल्या पाच उमेदवारांची नावे जाहीर केली होती. यामध्ये प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना भाजपने दुसऱ्यांदा उमेदवारी दिली, तर उमा खापरे आणि श्रीकांत भारतीय या नव्या चेहऱ्यांना संधी देऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. माजी मंत्री राम शिंदे यांनाही भाजपने संधी दिली आहे. यामध्ये हर्षवर्धन पाटील यांचे नाव वगळण्यात आल्याने इंदापूर तालुक्यातील पाटील समर्थकांमध्ये नाराजी, तर विरोधकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. मात्र पाटील यांनी काल माध्यमांना, 'कार्यकर्त्यांनो जोमाने कामाला लागा भाजपमध्ये सर्वांना संधी मिळते' अशी सूचक प्रतिक्रिया दिली होती. अवघ्या काही तासांत बदलत्या घडामोडी पाहता आज हर्षवर्धन पाटील आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
हे देखील वाचा - काँग्रेसमध्ये होते खास, भाजपमध्ये अजूनही वेट ॲण्ड वॉच
२०१९ साली काँग्रेसमधून भाजपामध्ये गेलेल्या हर्षवर्धन पाटील यांचे आजही महाविकास आघाडीतील घटक पक्षांतील अनेक नेत्यांशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीतील मतं मिळवण्यासाठी फायदा होईल असा विश्वास भाजपला असल्यानेच अवघे चार उमेदवार निवडून येतील एवढे संख्याबळ असूनही भाजप आपला सहावा उमेदवार रिंगणात उतरवणार आहे. त्यामुळे निवडणुकीतील चुरस आणखीनच वाढणार आहे. मात्र सहावा उमेदवार उतरविण्याचा प्रयोग कितपत यशस्वी होईल याबाबत शंका आहे. मात्र पाटील यांना संधी मिळाल्यास किंबहुना ते चमत्कारिकरित्या निवडून आल्यास इंदापूर तालुक्याला इंदापूर हीच जन्मभूमी आणि कर्मभूमी असलेले दोन आमदार एकाच वेळी भेटतील. मात्र आता बघावे लागेल की हर्षवर्धन पाटील यांना संधी मिळते, का यावेळीही हर्षवर्धन पाटील हे नाव केवळ चर्चेत राहते?

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा