नेहरू चौक ते पाणदरा दरम्यानचे खड्डे तात्काळ बुजवण्याची गरज
खड्डे ठरू शकतात वारकऱ्यांना त्रासदायक; थोड्या पावसातही खड्ड्यांना डबक्यांचे स्वरूप
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क
इंदापूर (२९ जून) :- पालखी मुक्कामाच्या वादावर पडदा पडल्याने पालखीचा मुक्काम इंदापूर शहरातील नारायणदास रामदास हायस्कूलमध्ये होणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे. पाणदरा आणि नेहरू चौकातून होत पालखी दरवेळी मुक्काम स्थळी जात असते. मात्र पाणदरा आणि नेहरू चौकादरम्यानचा रस्ता सध्या पूर्णपणे खड्डेमय झाला असल्याने हा रस्ता यंदा वारकऱ्यांसाठी त्रासदायक ठरणार असल्याचे दिसत आहे. पालखी येण्यास अवघे दोन दिवस बाकी असल्याने पालिका प्रशासनाने तत्परता दाखवत तात्काळ हे खड्डे बुजवण्याची गरज आहे.
संत तुकाराम महाराजांची पालखी येत्या २ आणि ३ जुलै रोजी इंदापूर मुक्कामी येणार आहे. रिंगण आटोपल्यानंतर पालखीसह हजारो वारकरी अकलूज नाका, रामवेस, कसबा, संभाजी चौक, पाणदरा, नेहरू चौक, खडकपूरा मार्गे हायस्कूलच्या प्रांगणात जात असतात. मात्र पाणदरा ते नेहरू चौकादरम्यानच्या रस्ताचे काम अनेक महिन्यांपासून अपूर्णावस्थेत आहे. अरुंद असलेला अंदाजे १०० मिटर अंतराचा हा रस्ता सध्या पूर्णपणे खड्डेमय अवस्थेत आहे. अवघ्या काही मिनिटांच्या पावसात संपूर्ण रस्त्यावर पाण्याचे डबके, चिखल आणि चिकचिक होत असल्याने नागरिकांना चालनेही कठीण होत आहे.
पालखीच्या रथाबरोबर हजारो वारकऱ्यांना या खड्ड्यांतून चालने कठीण व त्रासदायक ठरणार आहेत. या खड्ड्यांमुळे हजारो वारकऱ्यांच्या गर्दीत एखादा वारकरी, वयस्कर व्यक्ती, महिला, अडखळून पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नगरपरिषद प्रशासनाने तात्काळ हे खड्डे बुजविण्याची तसदी घेणे आवश्यक आहे.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा