सोनाईच्या पायथ्याशी झालेल्या अपघातात इंदापूर शहरातील सिव्हील इंजिनियर युवकाचा दुर्दैवी मृत्यू

मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क

इंदापूर (७ जून) :- सोनाई दूध डेअरीच्या (निमगाव बाजूकडील) पायथ्याशी हेगडे वस्तीच्या डाव्या बाजूला आज सकाळी १० वा. ३० मिनिटांच्या आसपास ह्युंदाई स‌‌ॅंन्ट्रो आणि टाटा टियागो या चारचाकींच्या समोरासमोर झालेल्या धडकेत इंदापूर शहरातील प्रसिद्ध कंत्राटदार मुख्तार पठाण यांच्या सिव्हील इंजिनियर असलेल्या मोठ्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर या अपघातात दोघे जण जखमी झाले आहेत. अझहर मुख्तार पठाण (वय अंदाजे २३ वर्ष, रा. ४० फुटी रोड, दर्गाह मस्जिद चौक, शिवशंभो मंदिरासमोर, इंदापूर) असे या अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. या संदर्भात सरफराज मुलाणी यांनी दिलेल्या माहितीआधारे टाटा टियागोच्या अनोळखी चालकाविरोधात इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अझहर पठाण हा आपल्या मामा समीर मुलाणी, मावशी सायरा मुसा खान, मावस बहीण सलोनी मुसा खान व मावस भाऊ आफताब मुसा खान यांच्याबरोबर ह्युंदाई कंपनीच्या स‌‌ॅंन्ट्रो (एमएच ४२ एएक्स ५७९८) गाडीतून इंदापूरच्या दिशेने निघाला होता. दरम्यान निमगावच्या दिशेने अतिवेगात निघालेल्या टाटा टियागोने (एमएच १३ डीटी ४१२२) चुकीच्या दिशेला जात समीर मुलाणी चालवत असलेल्या स‌‌ॅंन्ट्रो गाडीच्या ड्रायव्हर सिटच्या पाठीमागील बाजूस जोरदार धडक दिली. त्यामुळे ड्रायव्हरच्या पाठीमागे बसलेल्या अझहर पठाण याच्या डोक्याला गंभीर इजा झाली. ही धडक इतकी जोरदार होती की धडकेनंतरही टियागो ७० फुटांपेक्षा जास्त अंतरावर उजव्या बाजूने असलेल्या झुडूपांमध्ये जाऊन अडकली. टीयागो गाडीचा वेग १२० किमी प्रती तास असावा असा अंदाज प्रत्यक्षदर्शिंनी वर्तवला आहे.

अपघातानंतर अझहर पठाण याला इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी अझहर याला मृत घोषित केले. तर अन्य जखमींवर इंदापूर शहरातील क्रिटीकेअर या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अझहर हा उच्चशिक्षित आणि होतकरू तरुण होता. त्याने सिव्हील इंजिनिअरिंग मध्ये शिक्षण घेतले होते. त्याला नुकताच पुण्यातील एका कंपनीत जॉब लागला होता. पुढील तीन दिवसांत तो कामावर हजर होणार होता अशी माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली आहे. अझहरवर काळाने अचानक घाला घातल्याने त्याच्या कुटुंबीयांसाठी खूप मोठा धक्का बसला असून, त्याच्या अपघाती मृत्यूमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

कुत्र्याला चुकवण्याच्या नादात झाला अपघात?

घटनास्थळी प्रत्यक्षदर्शिंनी दिलेल्या माहितीनुसार अतिवेगात वाहन चालवत असलेल्या  टियागो गाडीच्या चालकाने अचानक आडवे आलेल्या कुत्र्याला चुकवण्याच्या नादात गाडी चुकीच्या दिशेला नेहली. दरम्यान १२० पेक्षा जास्त प्रती तास वेगाने असलेल्या गाडीवरील ताबा सुटल्याने टियागो गाडीने अझहर यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. स‌‌ॅंन्ट्रो चालवत असलेल्या समीर मुलाणी यांनी वाचण्याचा खूप प्रयत्न केला मात्र टियागो गाडी अतिशय वेगात असल्याने त्यांचे प्रयत्न अपुरे ठरले. कोणतीही चूक नसताना या अपघातात अझहरचा मृत्यू झाल्याने प्रत्यक्षदर्शिही हळहळ व्यक्त करत होते. दरम्यान जवळच असलेल्या दूध डेअरीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर कुत्र्यांचा वावर असतो अशीही चर्चा अपघातस्थळी सुरू होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट