अवैध भिशी प्रकरणात आता भटक्या विमुक्त जमाती संघटना आणि रिपब्लिकन क्रांती सेनेची उडी; गुंतवणूकदार आणि तक्रारदार यांच्यावरही गुन्हे दाखल करण्याची मागणी

२७ जून रोजी इंदापूर पोलीस ठाण्यासमोर बेमुदत धरणे आंदोलन आणि बोंबाबोंब आंदोलन करण्याचा इशारा

मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क

इंदापूर (१८ जून) :- अवघ्या महाराष्ट्रात गाजलेल्या इंदापूर शहरातील अवैध भिशी प्रकरणाला जवळपास ५ महिन्यानंतर आता नवे वळण लागले आहे. भिशीमध्ये कोट्यवधींचा घोटाळा करून हजारो भिशी धारकांना चुना लावल्याचा आरोप असलेल्या भिशी चालकांबरोबरच आता शासनाची फसवणूक करणाऱ्या गुंतवणूकदार आणि गुन्ह्यातील फिर्यादी यांच्यावरही खाजगी सावकारी प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी भटक्या विमुक्त जमाती संघटना महाराष्ट्र राज्य आणि रिपब्लिकन क्रांती सेनेकडून एका निवेदनाच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाकडे करण्यात आली आहे. त्यामुळे आता या प्रकरणात आणि उलथापालथ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यासंदर्भात पोलीस प्रशासन कोणती भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

२० जानेवारी रोजी शिवसेना शहर प्रमुख महादेव सोमवंशी आणि संदीप चित्तरंजन पाटील यांच्या फिर्यादीवरून अनुक्रमे ११ आणि ५ जणांवर इंदापूर पोलीस ठाण्यात १२०/ब, ४०३, ४०८, ४०९ आणि ४२० कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर २३ मार्च रोजी रणजित शहाजीराव तोडमल यांच्या फिर्यादीवरून तिघा जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पैकी दोघे सोमवंशी यांच्या फिर्यादीतही आरोपी असल्याने या प्रकरणातील एकूण आरोपींची संख्या १७ झाली होती. यामध्ये सध्या ३ जण अटकेत असून, ५ जण अंतरिम जामिनावर, तर ९ आरोपी अजूनही फरार आहेत. मात्र या १७ आरोपींव्यतिरिक्तही अनेक भिशी चालक अजूनही शाबूत असल्याची शहरात चर्चा आहे. त्यामुळे हे चालक कोण आहेत? हे शाबूत का राहिले? यांना कोण अभय देत आहे? याचीही चौकशी झाली पाहिजे अशी चर्चा होत आहे.

पोलीस निरीक्षक तय्यब मुजावर यांना निवेदन देताना तानाजी धोत्रे आणि प्रा. बाळासाहेब लोखंडे
भिशी हा अवैध सावकारी व्यवसाय असून, इंदापूर शहरात भिशी चालक आणि शासनाची फसवणूक करून भिशित कोट्यवधींची मोहमाया गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार यांच्या संगनमताने भिशी व्यवसाय जोमाने चालत होता. संगनमताने चालणाऱ्या या अवैध व्यवसायात आर्थिक देवाण घेवाणीच्या मतभेदामुळे फिर्यादींनी भिशी चालकांवर गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे साहजिकच यामध्ये चालक आणि गुंतवणूकदार दोघेही समदोषी असल्याचे भटक्या विमुक्त जमाती संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष, तसेच प्रदेश सरचिटणीस तानाजी धोत्रे आणि रिपब्लिकन क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. बाळासाहेब लोखंडे यांनी नी निवेदनात म्हटले आहे. यामध्ये संबंधित फिर्यादी हे शेतकरी, नोकरदार असा उल्लेख केलेला असला तरी, सदरचे फिर्यादी हे खडी क्रशर चालक, विट भट्टी चालक असे बेकायदेशीर व शासनाचा महसूल बुडवणाऱ्या व्यवसायातील, तसेच मजूर व सहकारी संस्था चालक आहेत. त्यामुळे संदिप चित्तरंजन पाटील, रणजीत शहाजीराव तोडमल या तक्रारदारांसह जुगार चालवणारा आणि जुगार खेळणारा दोन्ही अपराधी या कायद्यान्वये अवैध भिशित कोट्यवधींची गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांवरही खाजगी सावकारी प्रतिबंधक कायदा २०१४ अन्वये गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून या दोन्ही संघटनांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे. सोबतच तानाजी धोत्रे यांनी 'सापडला तो चोर नाही तर साव' असे असूनही संबंधितांकडून पोलीस प्रशासनातील कर्तव्यदक्ष अधिकारी आणि एकूणच पोलीस प्रशासनावर दबाव आणला जात असल्याचा आरोपही केला आहे.

गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केलेले कोट्यवधी रुपये कसे व कोणत्या मार्गाने आणले? याचा तपशील शासनाला दिला का?  असे अनेक प्रश्न उपस्थित करत वरील दोन्ही संघटनांनी गुंतवणूकदारांनी भिशितील गुंतवणूकीचे व्यवहार बँकिंग अथवा धनादेशाच्या माध्यमातून केले नसल्याच्या व सदरच्या सर्व रकमांचा आयकरही भरला नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. भिशी चालक, फिर्यादी आणि गुंतवणूकदार यांना खाजगी सावकार संबोधत या सर्वांवर खाजगी सावकारी प्रतिबंधक कायदा २०१४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी वरील दोन्ही संघटनांकडून २७ जून रोजी इंदापूर पोलीस ठाण्यासमोर बेमुदत धरणे आंदोलन आणि बोंबाबोंब आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला नवे वळण मिळणार असून. त्यामुळे फिर्यादी आणि गुंतवणूकदार या सर्वांचेच धाबे दणाणनार असून, यामध्ये पोलीस प्रशासनालची भूमिका महत्वाची ठरणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट