न्यायप्रविष्ट प्रकरणात हस्तक्षेप करून अल्पसंख्यांक समाजावर अन्याय करणाऱ्या दोषींवर कारवाई करावी - इंदापूर एमआयएमची मागणी
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क
इंदापूर (८ जून) :- प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाही पोलीस प्रशासनाच्या मदतीने हुकूमशाही पद्धतीने अकलूज येथील अल्पसंख्यांक समाजातील नागरिकांची घरे उध्वस्त करण्याच्या पापात सहभागी नीरा उजवा कालवा पाटबंधारे विभागातील संबंधित अधिकाऱ्यांवर आणि कर्मचाऱ्यांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी इंदापूर येथील एआयएमआयएम पक्षाकडून करण्यात आली आहे संबंधित मागणीचे निवेदन सोमवारी (६ जून) इंदापूर तहसीलदार यांच्याकडे देण्यात आले. यावेळी पक्षाचे इंदापूर युवक शहराध्यक्ष आझम खान पठाण, अख्तर मुलाणी, अरबाज पठाण, शाहिद शेख, स्वालेद कोरबू, सैफअली पठाण, सलीम पठाण आणि अक्रम जहागिरदार उपस्थित होते.
आनंदनगर-गिरमेवस्ती (अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर) येथील नऊचारी भागात नीरा उजवा कालवा पाटबंधारे विभागाने शुक्रवारी (३ जून) कारवाई करत सदर भागात राहणाऱ्या सय्यद साहेबलाल शेख, आणि अल्लाबक्ष साहेबलाल शेख यांचे राहते घर जमीनदोस्त केले. त्यामुळे जवळपास १५ सदस्य असलेली अल्पसंख्यांक समाजातील दोन कुटुंबे ऐन पावसाळ्यात उघड्यावर आली आहेत. विशेष म्हणजे सदर प्रकरण माळशिरस येथील न्यायालयात न्यायप्रविष्ट असताना कोणतीही पूर्वसूचना न देता पाठबंधारे विभागाने हुकूमशाही पद्धतीने ही अन्यायपूर्ण कारवाई केल्याने लोकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या कारवाई नंतर शेख कुटुंबीयांनी शुक्रवार पासून माळशिरस येथील पाठबंधारे विभागाच्या कार्यालयाबाहेर आमरण उपोषणाचा पावित्रा घेतला आहे. सदरची जागा अतिक्रमित नसून, आपण ती मुळ मालकाकडून कायदेशीर पद्धतीने विकत घेतली असल्याचे शेख कुटुंबीयांनी म्हटले आहे.
बेकायदेशीर कारवाई करून अल्पसंख्यांक समाजातील कुटुंबियांवर अन्यायपूर्ण कारवाई करणाऱ्या संबंधित पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता, फलटण व सहाय्यक अभियंता, शाखाधिकारी माळशिरस व संबंधीत सर्वांना त्वरित निलंबित करून, पीडितांना त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी सोमवारी एका निवेदनाद्वारे एआयएमआयएम पक्षाकडून करण्यात आली आहे. अन्यथा जलसंपदामंत्री यांच्या निवासस्थानासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रशासकिय कार्यालयांसमोर तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही एआयएमआयएम पक्षाकडून देण्यात आली आहे.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा