तर लोक वर्गणीतून प्रती पालखी इंदापूरमध्ये तयार करू; देहू संस्थान अध्यक्षांच्या इशाऱ्यावर इंदापूर ग्रामस्थांचा प्रती इशारा

मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क

इंदापूर (२१ जून) :- पालखी मुक्काम स्थळावरून इंदापूरमध्ये रणकंदन माजले असून, देहू संस्थानाच्या अध्यक्षांनी आडमुठी भूमिका घेतल्यास इंदापूरकर लोक वर्गणीतून प्रती पालखी तयार करून इंदापूरमध्ये दोन दिवस पालखी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करतील अशी प्रतिक्रिया इंदापूरच्या ग्रामस्थांनी देहू संस्थानाचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांच्या विधानावर दिली आहे. सोमवारी (२० जून) देहू संस्थानाचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांनी प्रशासन आणि इंदापूरच्या ग्रामस्थांमध्ये पालखी मुक्कामासंदर्भात तोडगा न निघाल्यास इंदापूरचा पालखी मुक्काम रद्द करून पुढे जाऊ असा इशारा दिला होता. इंदापूर ग्रामस्थांनी आज पालखी मुक्काम संदर्भातील आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात पुणे सोलापूर हायवेवर चक्का जाम करत देहू संस्थानाच्या अध्यक्षांच्या कालच्या वक्तव्यावर ही प्रतिक्रिया दिली आहे.

मागील ७० वर्षांपासून संत तुकाराम महाराजांच्या पालखी इंदापूर शहरातील नारायणदास रामदास हायस्कूलमध्ये थांबण्याची परंपरा आहे. यावेळी मात्र प्रशासनाकडून मुक्काम स्थळ बदलण्यात आल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. परंपरा कायम राहावी यासाठी सोमवारी (२० जून) ग्रामस्थांनी सिध्देश्वर मंदिर ते तहसील कार्यालय पायी वारी काढत तहसीलदारांना मागणीचे निवेदन दिले होते. प्रशासनाने निर्णय न बदलल्यास मंगळवारी (२१ जून) रास्ता रोको, गुरूवारी (२३ जून) इंदापूर तहसील कचेरी समोर लाक्षणिक उपोषण, रविवारी (२६ जून) तहसील कचेरीवर मोर्चा, तर शेवटच्या टप्प्यात पालखी मुक्कामी असताना (२ आणि ३ जुलै) इंदापूर शहर बंद ठेवण्याचा निर्वाणीचा इशारा ग्रामस्थांनी दिला होता. या आंदोलनाचा पहिला टप्पा आज रास्ता रोकोच्या स्वरूपात पार पडला.

हे देखील वाचा - तर पालखीचा इंदापूर मुक्काम रद्द करू - देहू संस्थानाचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांचे मोठे विधान

ग्रामस्थ आपल्या भूमिकेवर ठाम असून, प्रशासन आणि ग्रामस्थांमध्ये चाललेल्या या वादावर नितीन महाराज मोरे यांनी काही आरोपात्मक प्रश्न उपस्थित करत तोडगा न निघाल्यास पालखीचा इंदापूर मुक्काम रद्द करून पुढे जाण्याचा इशारा सोमवारी (२० जून) दिला होता. या वक्तव्यानंतर संतापलेल्या इंदापूर ग्रामस्थांनी लोक वर्गणीतून प्रती पालखी तयार करण्याचा आणि इंदापूर शहरात दोन दिवसांचा जंगी पालखी सोहळा साजरा करण्याचा इशारा देत प्रशासन आणि देहू संस्थानाच्या अध्यक्षांच्या आडमुठ्या भूमिकेपुढे आम्ही झुकणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. यावेळी इंदापूरकरांनी चालत आलेली परंपरा, आजवर इंदापूरकरांनी वारकऱ्यांची केलेली सेवा आणि पालखीसाठी केलेल्या त्यागाचे हवाले देत प्रशासन आणि देहू संस्थानाच्या अध्यक्षांना आडमुठी भूमिका मागे घेण्याची विनंती केली आहे. असे न झाल्यास ठरल्याप्रमाणे आंदोलन सुरूच राहील असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

नितीन महाराज मोरे यांचे सर्व आरोप ग्रामस्थांनी फेटाळले

देहू संस्थानाचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांनी मुक्काम रद्द करण्याच्या दिलेल्या इशाऱ्यानंतर आक्रमक झालेल्या इंदापूर ग्रामस्थांनी नितीन महाराज मोरे यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. ७ मे रोजी पालखी मुक्कामासंदर्भात ग्रामस्थांच्या भावना माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी निवेदनाद्वारे देहू संस्थानाला कळविल्या होत्या. अरुंद रस्त्यांची सांगितलेली अडचणही अनाठायी आहे. याधीही देहू संस्थानाच्या विश्वस्तांनी राज्यमंत्री भरणे आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या संदर्भात आडमुठी भूमिका घेतली होती. देहू संस्थानाच्या विश्वस्तांची, वारकऱ्यांची सोय करण्यात इंदापूरकर कुठेही, कधीही कमी पडलेले नाहीत. कोणतीही अडचण आजवर येऊ दिली नाही. त्यामुळे देहू संस्थान आणि प्रशासनाने अनाठायी हट्ट सोडून इंदापूरकरांच्या भावनांचा आदर करून निर्णय बदलावा अशी विनंती यावेळी करण्यात आली.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट