विधान परिषदेसाठी हर्षवर्धन पाटील यांचे नांव आघाडीवर; पवारांना शह देण्यासाठी भाजप हर्षवर्धन पाटील यांना पॉवर देणार?

मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क

इंदापूर (४ जून) :- जुलै महिन्यात रिक्त होणाऱ्या विधान परिषदेच्या १० जागांसाठी २० जून रोजी मतदान होणार असून, भाजपकडून हर्षवर्धन पाटील यांचे नाव आघाडीवर असल्याची माहिती समोर येत आहे. या निवडणुकीसाठी हर्षवर्धन पाटील यांच्यासह पंकजा मुंडे, राम शिंदे, प्रसाद लाड, चित्रा वाघ आणि गोपाल अग्रवाल यांच्याही नावांची चर्चा आहे. तर प्रविण दरेकर यांचं नाव निश्चित मानलं जात आहे. सलग दोनवेळा विधानपरिषद आणि आता राज्यसभेसाठीही हर्षवर्धन पाटील यांना डावलल्याने पाटील समर्थकांमध्ये भाजप विरोधात नाराजीचा सुर दिसत होता. त्यामुळे यावेळी तरी पाटील यांची लॉटरी लागणार? का संधी केवळ चर्चेतच विरून जाणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

उत्तर पश्चिम महाराष्ट्रात कमकुवत असलेली भाजप आपली ताकत वाढवण्यासाठी विधानपरिषदेच्या माध्यमातून हर्षवर्धन पाटील यांचे पुनर्वसन करेल अशी चर्चा होती. मे २०२० मध्ये झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत भाजपने हर्षवर्धन पाटील यांना डावलून सोलापूर जिल्ह्यात प्राबल्य असलेल्या, तसेच माढा लोकसभेची जागा राष्ट्रवादीकडून खेचून आणणाऱ्या व एकट्या माळशिरस विधानसभा मतदार संघातून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना एक लाखापेक्षा जास्त मताधिक्य मिळवून देणाऱ्या मोहिते पाटील यांच्या घराण्यातील माजी खासदार रणजिसिंह मोहिते पाटील यांना संधी दिली होती. तर डिसेंबर २०२१ मध्ये झालेल्या विधानपरिषद आणि आता १० तारखेला होणाऱ्या राज्यसभेसाठीही भाजपने हर्षवर्धन पाटील यांना संधी न दिल्याने इंदापूर तालुक्यातील पाटील समर्थकांचे अवसान गळाल्याचे चित्र आहे. १९ वर्षांच्या राजकारणात विविध खात्यांच्या मंत्री पदाचा दांडगा अनुभव असलेल्या पाटील यांना विधान परिषदेवर संधी देऊन भाजपने पाटील यांचे पुनर्वसन केल्यास गळालेले अवसान कार्यकर्त्यांना निश्चितच पुन: प्राप्त होईल. सोबतच हर्षवर्धन पाटील यांनाही चांगलेच बळ मिळणार असून, भरणे यांच्या खुर्चीलाही खतरा निर्माण होणार आहे.

पवारांना शह देण्यासाठी भाजप हर्षवर्धन पाटील यांना पॉवर देणार?

महाराष्ट्रातील निर्विवाद सत्तेसाठी भाजपला सध्या तरी बारामती हीच मुख्य अडसर आहे. त्यामुळे बारामतीला बारामतीतच अडकवून ठेवण्यासाठी भाजप सतत प्रयत्नशील आहे. २०२४ मध्ये खासदार सुप्रिया सुळे यांना शह देण्यासाठी हर्षवर्धन पाटील यांना, तर आमदार रोहित पवार यांना शह देण्यासाठी राम शिंदे यांना बळ देण्याची रणनीती भाजप आखत आहे. त्या अनुषंगाने भाजप हर्षवर्धन पाटील आणि राम शिंदे यांना २० जून रोजी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीत संधी देईल अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे.

इंदापूर तालुक्याला मिळणारा भरमसाठ निधी हर्षवर्धन पाटील यांच्या भीतीनेच?

सलग तीन वेळा लोकसभा निवडून आलेल्या सुप्रिया सुळे यांना मताधिक्य देणारा इंदापूर तालुका सुळे यांच्यासाठी आतापर्यंत वन वे मानला जात होता. या मताधिक्यात मोलाचा वाटा असलेल्या हर्षवर्धन पाटील यांनी २०१९ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केल्याने २०२४ च्या निवडणुकीचे चित्र वेगळे असेल याची जाणीव पवार कुटुंबीयांना आहे. त्यातच भाजप २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सुळे यांच्या विरोधात हर्षवर्धन पाटील यांना संधी देईल अशी शक्यता आहे. असे झाल्यास सुळे यांच्यासाठी लोकसभेचा मार्ग आणखी खडतर ठरणार आहे. साहजिकच त्यामुळे पवार कुटुंबीय इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादीची पॉवर वाढावी, पर्यायाने हर्षवर्धन पाटील यांची पॉवर कमी व्हावी यासाठी भलतेच धडपडताना दिसत आहेत. याचाच एक भाग म्हणून राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून पवार कुटुंबीय कोट्यवधींचा निधी इंदापूर तालुक्याला देत असल्याची चर्चा आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट