इंदापूर ग्रामस्थांचे आज तहसील समोर लाक्षणिक उपोषण, रविवारी मोर्चा; वेळ इंदापूर बंदची येऊ नये हीच अपेक्षा


संपादकीय

इंदापूर (२३ जून) :- इंदापूरमध्ये पालखी मुक्कामाच्या स्थळावरून इंदापूर ग्रामस्थ विरुद्ध प्रशासन वाद चांगलाच शिगेला पोहोचला असून, वारकऱ्यांसाठी अनेक दृष्टिकोनातून सोयीस्कर असलेला पारंपरिक पालखी तळ बदलण्याचा निर्णय प्रशासन आणि देहू संस्थानाच्या हेकेखोरपणातून घेण्यात आल्याचा आरोप इंदापूरच्या ग्रामस्थांकडून केला जात आहे. या निर्णयाविरोधात इंदापूर ग्रामस्थांकडून आज (२३ जून) इंदापूर तहसील कार्यालयापुढे एका दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले जाणार आहे. तदनंतरही प्रशासनाने भूमिका न बदलल्यास रविवारी (२६ जून) तहसील कार्यालयावर धडक मोर्चा आणि आंदोलनाच्या शेवटच्या टप्प्यात पालखी इंदापूर मुक्कामी असताना इंदापूर शहर बंद ठेवण्याचा निर्णय इंदापूर ग्रामस्थांनी जाहीर केला आहे. मात्र या प्रश्नावर योग्य तोडगा निघावा आणि बंदची वेळच येऊ नये अशी अपेक्षा केली जात आहे.

प्रशासन आणि देहू संस्थानाने ग्रामस्थांच्या भावनांचा विचार न करता हेकेखोरपणे इंदापूर शहरातील २०० वर्षांचा, तर ७० वर्षांची परंपरा असलेल्या नारायणदास रामदास हायस्कूलमधील पारंपरिक पालखी तळ शहराबाहेरील कचरा डेपो नजीक आयटीआय प्रांगणात नव्याने उभारण्यात आलेल्या पालखी तळावर हलवल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या निर्णयाविरोधात ७ जून रोजी देहू संस्थानाला, तर २० जून रोजी प्रशासनाला ग्रामस्थांच्या भावना निवेदनाच्या माध्यमातून कळविण्यात आल्या होत्या. तर देहू संस्थानाचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांनी पालखीचे नियोजन एका दिवसात झाले नसल्याचे सांगत पालखी तळ हलवण्याचे खापर ग्रामस्थांवरच फोडत प्रशासन आणि ग्रामस्थांमध्ये तोडगा न निघाल्यास इंदापूरला बायपास करून पुढे जाण्याचा इशारा दिला आहे. नितीन महाराज मोरे यांचा पूर्वोतीहास पाहता ते सहजासहजी निर्णय बदलतील अशी शक्यता कमी वाटते. त्यांच्या या विधानावर ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त करत प्रती पालखीच्या भावना बोलून दाखवल्या होत्या. त्यामुळे हा वाद कुठपर्यंत ताणला जाईल हे सांगणे कठीण आहे.

खरं तर पालखी आणि इंदापूर हे समीकरण भक्तीचं, भावनेचं, आदराचं, सेवेचं, सन्मानाचं आणि समर्पणाचं आहे. पालखीमध्ये सामिल देहू संस्थानाचे विश्वस्त असोत अथवा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणारे वारकरी असोत, इंदापूर सारखी सोय कुठेच होत नाही हे मान्य करतात. गावातील सर्व जाती धर्मातील लोकांच्या घरी दिंड्याही थांबतात. "तुजवरी ज्याचें मन । दर्शन दे त्याचें ॥१॥ कैसा जाती शुद्ध भाव । हात पाव ना वृत्ती ॥ध्रु.॥" हे हरी तुझ्यावर जे आसक्त आहेत ज्यांचे तुझ्यावर प्रेम आहे त्या भक्तांचे दर्शन मला घडू दे। याच अपेक्षेतून ग्रामस्थ पालखीचे स्वागत करतात. कदाचित राजकारण विरहित, निस्वार्थी सेवेच्या शुद्ध भावनेतून आणि पालखी आपल्यापासून दूर जात आहे या भीतीतून पालखी तळ गावाबाहेर जावे हे ग्रामस्थांना मान्य नाही.

ग्रामस्थांचा सेवाभाव पाहता पालखी तळाचा वाद ताणला गेला तरी ग्रामस्थ इंदापूर बंद ठेऊन पाहुण्या वारकऱ्यांची गैरसोय करतील अशी शक्यता कमी आहे. असे असली तरी प्रशासन आणि देहू संस्थानाने इंदापूर ग्रामस्थांच्या भावनांचा विचार करून यावर्षी तरी हा निर्णय बदलावा असे काहींचे मत आहे. कारण चर्चा करायला, तोडगा काढायला, वाद मिटवायला पुन्हा एका वर्षाचा कालावधी मिळणार आहे. सर्व जाती धर्मातील, अपवाद वगळता सर्व राजकीय पक्षातील नेते कार्यकर्ते पक्ष, राजकारण बाजूला ठेऊन केवळ ग्रामस्थ म्हणून आंदोलनात सहभागी झाले आहेत. परंतु पालखी तळ हलवण्यावरूनही इंदापूरकरांमध्ये दुअंगी चर्चा आणि दुमत आहे हे देखील मान्य करावे लागेल. 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट