इंदापूरमध्ये जनावरांवर झालेला तो हल्ला बिबट्याचा नव्हे लांडग्याचा; वन अधिकाऱ्याचा निर्वाळा
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क
इंदापूर (३१ मे) :- काल रात्री (३१ मे) इंदापूर शहरातील शेंडे मळा परिसरात राहणाऱ्या प्रवीण चंद्रकांत शेंडे या शेतकऱ्याच्या शेतातील म्हशीच्या रेडकुंवर झालेल्या हल्ल्यानंतर हा हल्ला बिबट्याने केला असल्याच्या चर्चांनी संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र हा हल्ला बिबट्याचा नसून लांडग्याने अथवा त्या सारख्या तत्सम प्राण्याने केला असल्याचा निर्वाळा वन अधिकारी अजित सुर्यवंशी यांनी दिला आहे.
काल रात्री झालेल्या या हल्ल्यात प्रवीण शेंडे यांच्या म्हशींच्या तीन रेडकुंपैकी दोन रेडकू ठार झाले आहेत, तर एक गंभीर जखमी झाले आहे. या हल्ल्यात शेंडे यांचा कुत्राही ठार झाला आहे. या घटनेत प्रवीण शेंडे यांचे अंदाजे ४०-५० हजारांचे नुकसान झाले असून, पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आलेल्या या घटनेनंतर संपूर्ण शहरात बिबट्यानेच हा हल्ला केला असल्या संदर्भात चर्चा सुरू झाल्या आहेत. सोशल मीडियावर देखील बिबट्या असल्या संदर्भात घेटनेचे व्हिडिओ वायरल झाले आहेत. त्यामुळे साहजिकच सकाळ पासून संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण दिसत आहे. ही घटना समजताच वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत संपूर्ण परिसराची पाहणी केली. बिबट्या असल्या संदर्भात कोणतेही पुरावे आम्हाला आढळले नसून, हल्ल्याची पद्धत पाहता हा हल्ला लांडग्यांने अथवा लांडग्या सारख्या तत्सम प्राण्याने हा हल्ला केला असल्याचा निर्वाळा वन अधिकाऱ्यांनी दिला आहे.
हा हल्ला बिबट्याचा नव्हे....
आम्ही घटनेची संपूर्ण पाहणी केली असून, जनावरांवर झालेला हल्ला पाहता हा हल्ला बिबट्याने केला नसून, लांडग्याने अथवा लांडग्या सारख्या तत्सम प्राण्याने हा हल्ला केला असल्याच्या निष्कर्षावर आम्ही पोहोचलो आहे. परिसराची पाहणी केली असता बिबट्याच्या असण्या संदर्भात कोणतेही पुरावे आम्हाला सापडलेले नाहीत. त्यामुळे शहरातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये. आम्ही घटनेचा पंचनामा केला असून, शासकीय नियमांन्वये शेंडे यांना लवकरच नुकसान भरपाई मिळेल - अजित सुर्यवंशी (वन अधिकारी)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा