लाकडी निंबोडी योजनेस मंजुरीमुळे इंदापूर बारामतीच्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण; राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रयत्नांना यश

मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क

इंदापूर (१३ मे) :- राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रयत्नांमुळे गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेल्या लाकडी निंबोळी उपसा जलसिंचन योजनेस अखेर मंजुरी मिळाली. साहजिकच यामुळे इंदापूर आणि बारामतीच्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या योजनेमुळे इंदापूर आणि बारामती तालुक्यातील जवळपास सात हजार पेक्षा जास्त हेक्टर ओलिताखाली येणार आहे. मागील पंचवीस ते तीस वर्षापासून तालुक्यातील प्रत्येक निवडणुकीत हा विषय चर्चेत येत होता. अखेर हा विषय मार्गी लागल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. लाकडी निंबोडी उपसा जलसिंचन योजनेच्या ३४८.११ कोटी इतक्या किंमतीच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासाठी महत्वाच्या असलेल्या या विषयासाठी त्यांनी कसोशीने प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे.

या योजनेमुळे इंदापूर तालुक्यातील १० गावांमधील ४३३७ हेक्टर क्षेत्र, तर बारामती तालुक्यातील ७ गावांमधील २९१३ हेक्टर क्षेत्र असे एकूण ७२५० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. त्यामुळे या दोन्ही तालुक्यातील दुष्काळी व जिरायती शेती बागायती होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या योजनेसाठी शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ३४८ कोटींच्या आराखड्यास मान्यता दिल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री जयंत पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे यांचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आभार मानले आहेत.

महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजना ही भीमा (उजनी) प्रकल्पाचाच भाग असल्याने सदर योजनेस प्राधिकरणाच्या मान्यतेची आवश्यकता नसल्याचे  कळविले आहे. त्यानुसार या योजनेस एकूण ३४८.११ कोटींच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

अशी येईल योजना अमलात - लाकडी निंबोडी योजनेचे भूमिपूजन शरद पवार यांच्या हस्ते होणार असल्याचे दत्तात्रय भरणे यांनी म्हटले आहे. कुंभारगांव परिसरातून साधारण ७६५ अश्वशक्ती क्षमतेच्या चार विद्युत पंपाच्या साहाय्याने हे पाणी शेटफळगडे आणि निरगुडेच्या सीमेवर आणले जाईल. ६४० अश्वशक्तीचे तीन आणि ५७० अश्वशक्तीचे दोन विद्युत पंप त्या ठिकाणी बसवले जातील. त्यामुळे या योजनेतून इंदापूर तालुक्यातील दुष्काळी पट्ट्यातील ११,००० एकर शेती ओलिताखाली येणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट