सामान्य जनतेला काय हवंय हे जाणलेल्या असामान्य कर्तृत्वाच्या या नेत्याच्या गाडीची काच कधीच वर नसते...
संपादकीय
१ जून १९६८ रोजी इंदापूर तालुक्याच्या ग्रामीण भागात जन्मलेले दत्तात्रय विठोबा भरणे यांचा छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक ते महाराष्ट्र राज्याच्या विविध खात्यांचे राज्यमंत्री असा प्रवास थक्क करणारा आहे. गर्भश्रीमंत व सघन शेतकरी कुटुंबात जन्म घेऊनही अत्यंत संयमी, शांत आणि गर्वाचा लवलेशही नसलेल्या या नेत्याने अल्पावधीत इंदापूर तालुक्यातील जनतेच्या ह्रदयात आपली जागा निर्माण केली आहे. सत्ता नसतानाही कोट्यवधींचा निधी तालुक्यात आणण्याची किमया त्यांनी साधली आहे. मंत्री पदाच्या अवघ्या दोन वर्षाच्या अल्प कार्यकाळात तालुक्याला विकासाच्या नव्या उंचीवर घेऊन जाणारा नेता म्हणून त्यांची ख्याती तालुक्यात निर्माण झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून महाराष्ट्रात 'न भूतो न भविष्यती' इतका निधी इंदापूर तालुक्याला उपलब्ध करून दिला आहे. परिणामी खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांना 'तुम्ही केवळ इंदापूर तालुक्याचे नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे मंत्री आहात थोडा निधी बारामतीलाही द्या असे म्हणावे लागले.'
कोणताही प्रबळ राजकीय वारसा नसताना भरणे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाची सुरुवात २००९ च्या विधानसभा निवडणुकीत इंदापूर मतदार संघातून जितक्या मतांच्या फरकाने पराभूत होऊन केली त्याच्या दुप्पट मतांनी पराभव करत तालुक्याच्या राजकारणावर जवळपास दोन दशके निर्विवाद वर्चस्व असलेल्या एका धुरंदर नेत्याला पराभूत करून काढला. परिणामी एकेकाळी महाराष्ट्राच्या राजकारणातील मुख्यमंत्री पदाचा दावेदार असलेला नेता आज राजकारणात आपले अस्तित्व शोधताना दिसत आहे. भरणे यांनी १९९२ मध्ये छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदाची, तर १९९६ मध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदाची सूत्रे हाताळली आहेत. २००१ ते २००२ पर्यंत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (पीडीसीसी) अध्यक्षपदाची, तर २००२ ते २००७ या पाच वर्षांच्या कालखंडात छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाची सूत्रेही त्यांच्याकडेच होती. त्यांनी २०१२ ते २०१४ पुणे जिल्हा परिषदेच्या सभापती पदाची धुराही यशस्वीपणे सांभाळली आहे.
![]() |
| शिक्षक सोसायटीच्या विजयी उमेदवारांच्या सत्कार समारंभा वेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे आणि सर्व शिक्षक |
प्रबळ राजकीय वारसा आणि खाजगी तसेच सहकारी संस्थांच्या माध्यमातून मतांचा गठ्ठा पाठीशी नसताना २०१९ मध्ये सलग दुसऱ्यांदा विधानसभा जिंकून भरणे यांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. पवार कुटुंबीयांचे अतिशय निकटवर्तीय मानले जाणारे भरणे यांनी ३० डिसेंबर २०१९ रोजी सार्वजनिक बांधकाम, मृद व जलसंधारण विभाग, वनीकरण, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय, सामान्य प्रशासन विभाग अशा विविध खात्यांचे राज्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला होता. तर मागील दोन वर्षांपासून सोलापूरच्या पालकमंत्री पदाचा भारही ते यशस्वीपणे पार पाडत आहेत.
स्वातंत्र्योत्तर काळापासून अनेक वर्ष मंत्रीपद भोगलेल्या इंदापूर तालुक्यातील अनेक रस्त्यांनी भरणे यांच्या कार्यकाळातच कातन सोडली. रस्त्यांचा चेहरा बदलला. उजनीच्या पाण्यावर एकाचवेळी दावा सांगणाऱ्या इंदापूर आणि सोलापूरकरांमध्ये समन्वय साधून ५ टीएमसी पाण्याचा प्रश्न भरणेच सोडवतील असा विश्वास देखील दोन्ही बाजूंनी व्यक्त केला जात आहे. मागच्या २५-३० वर्षांपासून रखडलेला लाकडी निंबोडी सारखा पाण्याचा प्रश्नही निकाली काढून भरणे यांनी इंदापूर आणि बारामतीतील हजारो शेतकऱ्यांचा दुआ घेतला आहे. ऐन सभेत अचानक निधीची मागणी करणाऱ्यालाही मागणीपेक्षा दुप्पट निधी देणाऱ्या, सर्वांना आपला वाटणाऱ्या, सामान्यांसाठी झटणाऱ्या, झगडणाऱ्या या तालुक्याच्या मामाला ५५ व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा