इंदापूर शहरातील ईद ठरली सामाजिक सलोखा वाढवणारी; वाचा काय होती वैशिष्टे
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क
इंदापूर (४ मे) :- कोरोनामुळे मागील दोन वर्ष मुस्लिम बांधवांना ईदची नमाज सामुहिकरीत्या पठण करता आली नव्हती. यावेळी मात्र कोरोनाचा प्रभाव ओसरल्याने मुस्लिम बांधवांनी इंदापूर शहरातील ईदगाह मैदानांवर उस्फूर्तपणे ईदची नमाज सामुहिकरीत्या पठण केली. शहरातील मदिना मस्जिद आणि श्रीराम सोसायटीच्या मागे असलेला ईदगाह अशा दोन ईदगाह मैदानांवर मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज पठण केले. विशेष म्हणजे देशभरात धार्मिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न राजकीय मंडळी आणि काही समाजद्वेषी संघटनांकडून होत असताना इंदापूर मात्र सामाजिक सलोखा अबाधित कसा राखावा याबाबत आदर्श ठरत आहे. काल (३ मे) मुस्लिम बांधवांनी मुस्लिमेतर बांधवांसाठी आयोजित केलेली शिरखुर्मा पार्टी, मंडपाच्या कमानींवर साकारलेले महापुरुषांचे फ्लेक्स, मुस्लिमेतर बांधवांनी मुस्लिमांना ईदगाह मैदानावर येऊन दिलेल्या शुभेच्छा, ईदगाह मैदानावरून परतताना मुस्लिम बांधवांनी शिवरायांना अर्पण केलेला पुष्पहार अशा विविध कारणांनी यंदाची ईद खऱ्या अर्थी सामाजिक सलोखा वाढवणारी ठरली.
सामूहिक नमाज पठण झाल्यानंतर सर्वच ठिकाणी दिव्य कुरआनातील विविध आयतींचा हवाला देत इमामांनी उपस्थित मुस्लिम बांधवांना उपदेश केले. विशेषतः दर्गाह मस्जिदचे इमाम अब्दुलकरीम मुशाहीदी यांनी उपस्थित मुस्लिम बांधवांना भाईचारा संबंधित उपदेश करताना, अल्लाहवर श्रद्धा ठेवणाऱ्यांच्या प्रेम आणि उपकराचे हक्कदार केवळ मुस्लिमच नव्हे तर, सर्व जाती धर्मातील बांधव, प्राणी आणि वनस्पती देखील असल्याचे म्हटले. यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह वेगवेगळ्या क्षेत्रातील हजारो मुस्लिमेतर बांधवांनी, वेगवेगळ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी ईदगाहवर उपस्थित राहून मुस्लिमांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. शेवटी सामूहिक दुआमध्ये सर्व देशवासीयांसाठी प्रार्थना करण्यात आली. तदनंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना आलिंगन देऊन ईदच्या शुभेच्छा देत एकमेकांची रजा घेतली.
हे प्रेम असेच अबाधित राहावे - राज्यमंत्री भरणे
रमजान ईद सामाजिक सद्भावनेची, प्रेमाची, आपुलकीची प्रतीक आहे. मुस्लिम समाजाकडून आपल्याला नेहमीच प्रेम मिळाले आहे. आपल्या दुआमुळेच मी इथपर्यंत पोहोचलो आहे. मुस्लिम समाजाच्या विकासासाठी आपण निधी कमी पडू देणार नाही. इंदापूर तालुक्यातील सर्व धर्मीय लोकं गुण्यागोविंदाने राहतात. हे प्रेम असेच अबाधित राहावे हीच आजच्या दिनी ईश्वरचरणी प्रार्थना.
मुस्लिमांकडून शिवरायांना पुष्पहार अर्पण
रमजान आणि अक्षय तृतीया एकाच दिवशी येणे ही गोष्ट धार्मिक सलोखा वाढवण्याचा संदेश देणारी बाब आहे. याच दिनी शिवरायांची तिथीनुसार जयंती साजरी केली जाते. ही गोष्ट लक्षात घेता ईदगाहवर नमाज पठण केल्यानंतर मुस्लिम बांधवांनी शहरातील खडकपूरा येथे असलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून धार्मिक, सामाजिक ऐक्याचा संदेश अधिक दृढ केला.
मुस्लिमेतर बांधवांसाठी शिरखुर्मा पार्टीचे आयोजन
इंदापूरला धार्मिक एकोप्याचा इतिहास आहे. ईदनिमित्त H.K.G.N. ग्रुप, बागवान जमात आणि तकवा बॉईज यांनी दर्गाह मस्जिद चौक आणि टेंभूर्णी नाका चौकात मुस्लिमेतर बांधवांसाठी शिरखुर्मा पार्टीचे आयोजन केले होते. यावेळी मुस्लिम बांधवांनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो असलेले फ्लॅक्स दर्शनी भागात लावले होते. विशेष म्हणजे शिवजयंती मिरवणूक येणार असल्याने मिरवणुकीला अडचण होऊ नये यासाठी H.K.G.N. ग्रुप आणि बागवान जमात यांनी दर्गाह मस्जिद चौकातील मंडप मिरवणुकीआधीच काढून सामाजिक सौहार्द जपले.
सोनाई परिवाराकडून दुधाचे, तर जावेद शेख यांच्याकडून शिरखुर्म्याच्या किटचे वाटप
जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण माने यांच्या सोनाई परिवाराकडून दरवर्षी प्रमाणे यंदाही शहरातील मुस्लिम बांधवांना ५ हजार लिटर दुधाचे वाटप करण्यात आले. तर इंदापूर शहरातील प्रसिद्ध उद्योजक जावेद शेख यांनी देखील शहरातील मुस्लिम बांधवांना शिरखुर्म्याच्या किटचे वाटप केले.
सिकंदर बागवान यांच्याकडून ईदगाह मैदानावर थंड पाण्याची सोय
उन्हाच्या कडाक्यात ईदगाह मैदानावर जमा झालेल्या लोकांची तहान भागवण्यासाठी सिकंदर बागवान हे मागील १० वर्षांपासून थंडगार पाण्याची व्यवस्था करत आहेत. यावेळीही त्यांनी पाण्याच्या जारची व्यवस्था केली होती.






टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा