बुद्धांना दलित बनवण्याचे षडयंत्र हाणून पाडायला हवे

(प्रासंगिक लेख)

सत्य, अहिंसा आणि समतेवर आधारित बौद्ध धर्माचे संस्थापक तथागत गौतम बुद्ध यांचा आज जन्मदिवस. जगाच्या पाठीवर बुद्धांचा जन्मदिवस भारतासह श्रीलंका, चीन, जपान, थायलंड, मलेशिया, तिबेट, मंगोलिया, कोरिया, जावा, सुमात्रा, कंबोडिया, अफगाणिस्तान, आणि तुर्कस्तान अशा अनेक देशांमध्ये साजरा होत असला तरी भारतात जन्मलेले हे अनमोल बुद्धत्व भारतातच दलित होऊन राहिलं आहे ही खूप मोठी शोकांतिका आहे. बौद्ध धम्माचा उगम, विकास भारतात होऊनही हवी तितकी रुजवणूक न झाल्याने धम्माचा शेवटही भारतातच झाल्याचे दिसते. जगाच्या नकाशात बुद्धांचा देश म्हणून मिरवणारा भारत देश स्वतःच्या भूमीत मात्र तथागतांच्या तत्त्वज्ञानाला रुजवण्यात कमी पडला. बौद्ध साहित्य संपदाही भारतात अल्प, मात्र इतर देशांमध्ये हे प्रमाण जास्त दिसून येते. त्यामुळे साहजिकच या सर्व कारणांची मीमांसा करणे अत्यावश्यक आहे. किंबहुना बुद्धांचे अनुयायी म्हणणाऱ्यांची ही नैतिक जबाबदारी आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध आजही हजारो वर्षानंतर काळाच्या कसोटीवर  टिकून आहेत. भारतात विषमतेवर आधारित असलेली चातूर्वर्ण्य व्यवस्था आणि जात व्यवस्था यांचा बीमोड करण्यासाठी, माणसाला माणूस म्हणून जगता यावे यासाठी डॉ. बाबासाहेबांनी विज्ञानावर आधारित असा धम्म निवडला, अनुसरला आणि आपल्या अनुयायांना देखील याच मार्गावर नेले. भारत देश बौद्धमय करण्याचे स्वप्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पाहिले होते. परंतु आज घडीला ते स्वप्न स्वप्नच राहिल्याचे दिसते. हे स्वप्न त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी, राजकारणासाठी अथवा कुठल्याही धार्मिक वर्चस्ववादासाठी नव्हे, तर मानवी उत्कर्ष आणि कल्याणाचा मार्ग म्हणून पाहिले होते. परंतु दुर्दैवाने किती लोकांना बौद्ध धर्माचे खरे आकलन झाले हा संशोधनाचा विषय आहे. खरं तर बौद्ध तत्त्वज्ञान हे जगण्याची जीवनशैली होणं गरजेचं असताना केवळ लग्न, मुंज, बारसे, अंत्यविधी अशा ठराविक कार्यक्रमांमध्ये बौद्ध पद्धतीचा अवलंब करणे हाच बौद्ध धम्म असं समजणाऱ्यांची संख्या अफाट असल्याचे दिसत आहे.

सब्ब पाप्पस्स् अकरणं कुसलस्स उपसंपदा !
सचित्त परियोदपणं एनं बुद्धानं सासनंम !!

अर्थात जे जे उन्नत, उदात्त, सर्वोच्च, सर्वोत्तम आणि विधायक अशा गोष्टींचा स्वीकार करून वाईट पापकर्मांचा त्याग करणे हा बौद्ध धम्माचा मूळ हेतू आहे. माणसाच्या जगण्याच्या जीवनशैलीचे सम्यक नियमन तथागतांनी घालून देत पंचशील तत्व, चार आर्यसत्य, अष्टांग मार्ग आणि दहा पारमिता याआधारे प्रत्येक गोष्ट ज्ञानाच्या आणि बुद्धीच्या तराजूत तोलून घेण्याचे आवाहन समस्त मानव जातीला केले. तथागत म्हणजे ज्याने यथार्थ ज्ञान प्राप्त केले, ज्याने तथ्य जसेच्या तसे जाणले. त्यामुळे जीवन जगत असताना सामान्य माणूस देखील बुद्धत्व प्राप्त करू शकतो हे तथागतांनी स्वतःच्या कृतीतून दाखवून दिले. बुद्धांनी प्राप्त बुद्धत्वाआधारे अखिल मानव जातीच्या उत्कर्षाचा मार्ग दाखवून दिला. मात्र दुर्दैव ! हजारो वर्षापासून मुर्छीत अवस्थेत पडलेल्या बुद्धाला बाबासाहेबांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी लाखो वर्णव्यवस्था पीडित, अन्यायग्रस्त लोकांना घेऊन बौद्ध धम्माची दीक्षा देऊन जीवित केले खरे, मात्र बुद्धांना मिळालेले हे जीवनदान खुद्द बुद्धांचे अनुयायी आज विसरून गेले. या जीवित झालेल्या बुद्धाला फुलवण्याचं काम इथल्या अनुयायांकडून झालं नाही. किंबहुना बुद्धांच्या तत्वज्ञानाला कमजोर करण्याचं काम खुद्द बुद्धानुयायांनीच केलं.

ज्या व्यवस्थे विरोधात विज्ञानवादी धम्म बुद्धांनी दिला. ज्या व्यवस्थेविरोधात बाबासाहेबांनी समतावादी धम्म स्वीकारला त्याच त्याच व्यवस्थेचे विषाणू आजही बुद्धानुयायांच्या बुद्धीत  जिवंत आहेत. धम्म रथ हाकण्याचे पवित्र कार्य बुद्धानुयायांकडून प्रामाणिकपणाने घडले नाही ही शोकांतिका आहे. घरातील दिवाणखान्यात बुद्ध आणि स्वयंपाक घरात मात्र हिंदू देवी देवतांची उपासना असे विदारक चित्र दुर्दैवाने आजही पाहायला मिळत आहे. हे चित्र बदलायचे असेल तर धम्म अगदी मनापासून स्वीकारून त्याचे अनुकरण होणे गरजेचे आहे. भारतीय व्यवस्थेत खोलवर रुजलेली जातिव्यवस्थेची पाळेमुळे आणि या व्यवस्थेचे तथाकथित रक्षक बुद्धाला आजही दलित बनवण्याचे घाणेरडे षड्यंत्र रचत आहेत. बुद्धांचे विश्वव्यापी, विज्ञानवादी, तार्किक, समतामूल्य  तत्वज्ञान अवघ्या विश्वासाठी नव्हे केवळ ठराविक लोकांसाठी आहे ही चुकीची धारणा रुजवू पाहत आहेत. या षडयंत्राला हाणून पाडायचे असेल तर संपूर्ण ज्ञानाच्या आणि बुद्धीच्या कसोटीवर उभ्या असलेल्या बुद्धांचे तत्त्वज्ञान मानवी उत्कर्षाचा कारक आहे ही गोष्ट आधी समजून उमजून घेतली पाहिजे आणि मग समजावून सांगता आली पाहिजे. सत्य, अहिंसा आणि समतेवर आधारित मानवतेला कारक असे बुद्धांचे हे तत्वज्ञान समाजव्यवस्थेत रुजवणे आजच्या घडीला बौद्ध अनुयायांसमोरील मोठे आव्हान आहे. हे आव्हान पेलण्यासाठी "अत्त दीप भव" या तथागतांच्या आदेशाप्रमाणे अनुसन करणे गरजेचे आहे. तरच बौद्ध धम्माला पुन्हा संजीवनी मिळेल.

        स्वाती चव्हाण
(लेखिका - बौद्ध पुरातत्व शाखेच्या अभ्यासक आहेत)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट