दुर्दैवी - बंधाऱ्यात पोहताना बुडून इंदापूरमधील युवा डॉक्टरचा दुर्दैवी मृत्यू; कसबा परिसरावर शोककळा

समीर सय्यद (उपसंपादक, मुत्सुद्देगिरी)

इंदापूर (५ मे) :- सीना नदीवरील बंधाऱ्यात पोहताना पाण्यात बुडून एका तरुण डॉक्टराचा दुर्दैवी मृत्यू झाला. डॉ. रेहान आरिफ सय्यद (वय २६, रा. कसबा पेठ, इंदापूर, जि. पुणे) असे या युवा डॉक्टरचे नाव असून, बुधवारी (४ मे) दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास रिधोरे पापणस (ता. माढा, जि. सोलापूर) येथील बंधाऱ्यात पोहताना ही दुर्दैवी घडली. या संदर्भात अवेज जलिल मुलाणी (वय २९, रा. कसबा पेठ, इंदापूर, जि. पुणे) यांच्या खबरवरून कुर्डुवाडी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

डॉ. रेहान सय्यद हे सोलापूर येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये कार्यरत होते. रमजान ईद साजरी करण्यासाठी ते इंदापूर येथील आपल्या घरी आले होते. सुट्टी असल्याने ते आपल्या कुटुंबीयांसह ते त्यांच्या वडिलांचे मित्र संजय सरोदे (रा. म्हैसगाव, ता. माढा) यांच्या फार्महाऊसवर गेले होते. डॉ. रेहान, लहान भाऊ अमन, चुलत भाऊ जिब्रान आणि सलमान हे चौघे भाऊ पोहण्यासाठी रिधोरे पापणस बंधाऱ्यातील सीना नदीपात्रात गेले होते. मात्र पोहताना नकळत डॉ. रेहान हे बंधाऱ्याच्या दाराजवळ पोहोचले. बंधाऱ्याच्या दाराच्या दिशेने पाण्याच्या प्रवाहाला खूप वेग असल्याने त्यांना परतता आले नाही. त्यामुळे थकल्याने ते पाण्यात बुडाले. तत्पूर्वी त्यांनी आपल्या भावंडांना आपण बुडत असल्याचे म्हटले होते. परंतु भावंडांचे प्रयत्न अयशस्वी ठरले.


बंधाऱ्याच्या दाराजवळ जात लहान भाऊ अमन व चुलत भाऊ जिब्रान यांनी त्यांना बाहेर काढले. त्यावेळी डॉ. रेहान बेशुद्धावस्थेत होते. उपचारासाठी त्यांनी कुर्डुवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. डॉ. रेहान यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि लहान भाऊ असा परिवार आहे. वडील रेल्वे पोलिसमध्ये, तर आई शिक्षिका आहेत. त्यांची पत्नी देखील डॉक्टर असून, त्या पुण्याच्या ससून रुग्णालयात कार्यरत आहेत. अवघ्या काही महिन्यांपूर्वीच त्यांचा विवाह झाला होता.

मनमिळावू स्वभावासाठी डॉ. रेहान होते प्रसिद्ध

धार्मिक वृत्तीचे असलेल्या डॉ. रेहान यांनी शासकीय कोट्यातून पुणे येथील महाविद्यालयातून एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले होते. सध्या ते सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कार्यरत होते. शांत आणि मनमिळावू स्वभावासाठी ते प्रसिद्ध होते. डॉक्टर असूनही गर्वाचा लवलेशही त्यांच्या स्वभावात कधीच जाणवला नाही. वैद्यकीय क्षेत्राच्या माध्यमातून पैसा कमावणे हा उद्देश न ठेवता लोकांची सेवा करण्याचा त्यांचा मानस होता. त्यांच्या जाण्याने इंदापूरकरांनी भविष्यातील एका चांगल्या डॉक्टरला गमावल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. त्यांच्या अकस्मात निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. काल (४ मे) रात्री दहा वाजता त्यांच्यावर इंदापूर येथील कब्रस्तानात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यविधीला मोठ्या प्रमाणावर युवकांनी गर्दी केली होती.

(टीप - कृपया बातमी विना परवानगी कॉपी करू नका.)



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट