माजी नगराध्यक्ष दिवंगत रत्नाकर मखरे यांच्या प्रथम स्मृतीदिनी आजी माजी मंत्र्यांसह अनेक दिग्गजांची हजेरी
इंदापूर (१५ मे) :- इंदापूरचे माजी नगराध्यक्ष रत्नाकर मखरे यांच्या प्रथम स्मृतीदिनाचा कार्यक्रम शनिवारी (१४ मे) भिमाई आश्रमशाळेत पार पडला. या कार्यक्रमाला इंदापूर तालुक्याच्या आजी माजी मंत्र्यांसह विविध क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावत दिवंगत रत्नाकर मखरे यांच्या स्मृतींना उजाळा दिला. यावेळी अस्थींचे पुजन, प्रतिमापूजन व तदनंतर बुद्ध पुजा व प्रवचनाचा कार्यक्रम भंते धम्मसार, बौद्धाचार्य बाळासाहेब धावारे, बाळासाहेब सरवदे यांच्या हस्ते संपन्न झाला. पूजेस शकुंतला रत्नाकर मखरे, ॲड. राहुल मखरे, संतोष मखरे, ॲड. समीर मखरे व कुटुंबीय उपस्थित होते. तर विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली.
यावेळी रत्नाकर मखरे यांच्या स्मृतीस उजाळा देताना राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, तात्या हे आंबेडकरी चळवळीतील अभ्यासू, लढवय्ये नेते व कार्यकर्ते होते. त्यांच्या निधनाने समाजकार्यात पोकळी निर्माण झाली. त्यांचे माझ्यावर व्यक्तीश: प्रेम होते. मी नेहमीच त्यांचे मार्गदर्शन घ्यायचो. ते माझ्या कामावर खूश व्हायचे, कधी चुकलो तर मलाही सुनवायचे. खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणणारे तात्या स्पष्टवक्ते होते. तात्यांनी माझ्यावर संस्थेची काही जबाबदारी सोपविली आहे.
यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले की, दिवंगत रत्नाकर मखरेंच्या जाण्याने इंदापूर तालुका हा पुरोगामी विचाराला मुकला असून, आंबेडकरी चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांनी आयुष्यभर वंचित, उपेक्षित व कष्टकरी वर्गासाठी काम केले. माझे त्यांच्याशी जवळचे संबंध होते. त्यांनी मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टच्या माध्यमातून उपेक्षित, वंचित, कष्टकरी व भटके-विमुक्तांच्या मुलांसाठी शिक्षणाची व निवासाची सोय केली. तात्यांच्या रूपाने गोरगरिबांचा थोर समाजसेवक आपल्यातून निघून गेला.
याप्रसंगी ॲड. राहुल मखरे यांनी, दिवंगत रत्नाकर मखरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरू केलेल्या शैक्षणिक संस्थेचा लेखाजोखा उपस्थितांना सांगितला. यावेळी सुधीर सोनवणे, कैलास चव्हाण (बारामती), कैलास कदम, नगरसेवक भरत शहा, प्रा. कृष्णा ताटे, बलभीम राऊत, अनिल मोरे (मुंबई), तुळशीराम जगताप (फुरसुंगी), ॲड. बापूसाहेब साबळे, संजय घोडके (मिरजगाव), तानाजी धोत्रे, आनंदराव थोरात, ॲड. समीर टिळेकर आदींनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन नानासाहेब चव्हाण यांनी केले तर आभार नानासाहेब सानप यांनी मानले.
तात्यांनी माझ्यावर टाकलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडीन - ॲड. राहुल मखरे
तात्यांनी अथक परिश्रमातून, कष्टातून उभी केलेली ही शिक्षणसंस्था पुढे चालवण्याचे आव्हान माझ्यासमोर नक्कीच आहे. मात्र त्यांनी दिलेला संघर्षाचा वारसा शैक्षणिक संस्था चालवण्यासह जीवनातील प्रतेक क्षेत्रात नक्कीच कामी येईल. तात्यांनी माझ्यावर टाकलेली जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडीन याचा मला विश्वास आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा