भिशी घोटाळा - भिशी धारकांचा इंदापूर पोलीस ठाण्यासमोर आमरण उपोषणाचा पावित्रा; फरार भिशी चालकांना त्वरित अटक करण्याची मागणी
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क
इंदापूर (१ मे) :- संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरलेल्या इंदापूर येथील अवैध भिशी प्रकरणातील फरार आरोपींना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी या प्रकरणातील फिर्यादीसह अनेक भिशी धारकांनी आता आमरण उपोषणाचा पावित्रा घेतला आहे. इंदापूर पोलीस ठाण्यात कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आलेल्या एकूण १७ आरोपींपैकी १४ आरोपी अद्याप फरार असल्याचा दाखला देत फिर्यादी महादेव सोमवंशी यांच्यासह अनेक भिशी धारक आजपासून (१ मे) इंदापूर पोलीस ठाण्यासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत.
कोट्यावधींच्या अवैध भिशी प्रकरणात २० जानेवारीला शिवसेनेचे इंदापूर शहर प्रमुख मेजर महादेव सोमवंशी आणि संदीप पाटील यांच्या फिर्यादीवरून अनुक्रमे ११ आणि ५ अशा एकूण १६ जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर २३ मार्च रोजी रणजित तोडमल यांच्या फिर्यादीमुळे आरोपींच्या संख्येत आणखी एकाची भर पडली होती. त्यामुळे भिशी प्रकरणातील आरोपींची एकूण संख्या १७ झाली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्ह्याची व्याप्ती आणि गांभीर्य लक्षात घेता हा गुन्हा पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. एकूण १७ आरोपींपैकी तिघे जण सध्या न्यायालयीन कोठडीत असून, चार जणांना मुंबई उच्च न्यायालयाने ९ जून पर्यंत अटक पूर्व (अंतरिम) जामीन मंजूर केला आहे.
हे देखील वाचा - नेमके काय आहे भिशी प्रकरण जाणून घ्या.
तक्रार दाखल होऊन जवळपास साडेतीन महिन्यांचा कालावधी उलटून गेला असून, अजूनही १० आरोपी फरार आहेत. आरोपी गुंड प्रवृत्तीचे असून, त्यांना लवकर अटक न झाल्यास सामान्य तक्रारदारांच्या जीवितास धोका होऊ शकतो. त्यामुळे सामान्य तक्रारदारांमध्ये दहशतीचे वातावरण असल्याचे कारण देत तक्रारदार महादेव सोमवंशी यांच्यासह आमरण उपोषणाला बसलेल्या भिशी धारकांनी आरोपींना लवकर अटक करण्याची मागणी इंदापूर पोलिसांकडे केली आहे. तर आपण आर्थिक गुन्हे शाखेकडे तीन दिवसांपूर्वी यासंदर्भात निवेदन दिल्याचे महादेव सोमवंशी यांनी मुत्सुद्देगिरीशी बोलताना म्हटले आहे.
उपोषणकर्ते आणि पोलीस अधिकारी यांच्यात चर्चा; मात्र अद्याप तोडगा नाही
इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि उपोषणकर्ते यांच्यामध्ये आज अनेक तास चर्चा झाली. मात्र तोडगा निघू शकला नाही. पोलीस निरीक्षक तय्यब मुजावर यांनी पुढील १५ दिवसांत कारवाई करण्यासंदर्भात आश्वासन दिले खरे, मात्र उपोषणकर्ते ठोस आणि लेखी आश्वासन दिल्याखेरीज भूमिका बदलण्यास तयार नसल्याचे दिसले. दरम्यान, आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी दिलीप पवार यांच्याबरोबरही मोबाईल फोनवरून संभाषण केले असता त्यांच्याकडूनही उडवाउडविची उत्तरे मिळाल्याचे महादेव सोमवंशी यांनी म्हटले आहे.
तुम्हीच आम्हाला आरोपींची माहिती द्या; तपास अधिकाऱ्याचे हास्यास्पद उत्तर
आपण आरोपींच्या अटके संदर्भात तपास अधिकारी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी कारवाई चालू असल्याचे सांगितले. मात्र संथगतीने चाललेल्या कारवाई संदर्भात विचारणा केली असता तुम्हीच आम्हाला आरोपींची माहिती द्या, आम्ही त्यांना अटक करू असे हास्यास्पद उत्तर दिल्याचे महादेव सोमवंशी यांनी म्हटले आहे. यावर सोमवंशी यांनी तपास अधिकारी या प्रकरणाबाबत गंभीर नसल्याचा आरोप केला आहे.
राजकीय दबाव अथवा आर्थिक देवाण घेवाण झाली असल्याचा संशय?
कोट्यावधींच्या अवैध भिशी प्रकरणात गुन्हा दाखल होऊन १०० दिवसांचा कालावधी होऊनही आरोपींना अटक होत नसल्याने या प्रकरणात तपास अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव असल्याचा अथवा आर्थिक देवाणघेवाण झाली असल्याचा संशय महादेव सोमवंशी आणि इतर भिशी धारकांनी व्यक्त केला आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा