अवैध भिशी प्रकरणात आणखी काही चालकांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता; सभासदांवरही गुन्हे दाखल होणार?
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क
इंदापूर (२३ जानेवारी) :- भिशी नामी जुगार प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलीसांनी हालचाली तीव्र केल्या असून, इंदापूर पोलीसांनी आतापर्यंत १६ जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. तर वेगवेगळ्या दोन फिर्यादीनुसार फसवणुकीचा आकडा १२ कोटींच्या घरात पोहोचला आहे. शिवसेना शहर प्रमुख महादेव सोमवंशी यांच्या फिर्यादीवरुन ११ जणांविरोधात भा. द. वी. कलम ४०३, ४०८, ४०९, ४२०, १२० ब अशा जामीनपात्र व अजामीनपात्र कलमांन्वये गुरुवारी (२० जानेवारी) रात्री उशिरा, तर संदीप पाटील यांच्या फिर्यादीवरून ५ जणांविरोधात वरील कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. शहरात छोटे मोठे अनेक लिलाव भिशी चालक अस्तित्वात होते. त्यामुळे या प्रकरणात आणखी काही भिशी चालकांविरोधात गुन्हा दाखल होण्याच्या शक्यतेसह भिशी फोफावण्याला कारणीभूत ठरलेल्या भिशी धारकांवरही गुन्हा का दाखल होऊ नये अशी चर्चा शहरात सुरू आहे. सोबतच कायद्याच्या दट्टयाने काही भिशी चालक पैसे देण्यास तयार झाल्याचे व अनेक चालक कारवाईपासून वाचण्यासाठी फसवणूक झालेल्या सभासदांच्या गर्दीतच आरडाओरडा करत असल्याची चर्चा आहे.
साल २०१४ ते २०१९ दरम्यान संबंधित भिशी चालकांनी लोकांचा विश्वास संपादन करत आर्थिक फायद्याचे आमिष दाखवून शहर व तालुक्यातील दोनशेहून अधिक भिशी धारकांकडून कोट्यावधी रुपयांची माया गोळा केली असून, या पैशांतून गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांपैकी काही जणांनी कोट्यावधी रुपयांची बेकायदेशिर मालमत्ता आपल्या व आपल्या नातेवाईकांच्या नावे खरेदी केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यामध्ये ६ कोटी ५४ लाखांना फसवणूक झाली असल्याची आकडेवारी २१ जणांच्या नावांसह देण्यात आली आहे. मात्र, बेकायदेशीर लिलाव भिशीच्या करोडो रुपयांच्या या तोंडी आकडेवारीला कायदेशीर आधार काय असा सवाल अनेकांना पडला आहे. तर ही तोंडी आकडेवारी न्यायालयासमोर सिद्ध होण्याबाबत अनेक शंका कायदे तज्ञ उपस्थित करत आहेत. काही चालकांनी व्यवहार बऱ्यापैकी मिटविले होते. मात्र काही चालकांच्या पैशांच्या न मिटलेल्या हव्यासामुळे आज ही परिस्थिती उद्भवली. ज्यामुळे काही चालक नाहक अडकले, अशीही चर्चा शहरात आहे.
बेकायदेशीर लिलाव भिशीने केला अनेकांचा घात - डिव्हिडंट नामी छुप्या व्याजावर आधारलेल्या व झटपट श्रीमंत होण्याच्या या बेकायदेशिर मार्गाने अनेकांचा घात केला आहे. यामध्ये प्रतिष्ठित डॉक्टर, शिक्षक, राजकारणी, शेतकरी, प्रतिष्ठित व्यापारी, कर्मचारी अशा अनेकांचा समावेश आहे. यात हजारो गरीब गुंतवणूकदार नाहक मेले आहेत. या चक्रव्यूहात अडकलेल्या अनेकांना शहर सोडावे लागले आहे. अनेकांचे व्यवसाय बुडाले. अनेकांना मानसिक, शारीरिक, कौटुंबिक त्रास सहन करावा लागला. काहींनी आत्महत्येचाही पर्याय निवडला. तर काहींना जीवे मारण्याचाही प्रयत्न झाल्याची चर्चा आहे. परंतु शासनाची खुलेआम फसवणूक करून इंदापूर शहरात भिशीच्या माध्यमातून चालक व सभासद खुलेआम कोट्यावधींची बेकायदेशीर उलाढाल करण्याला संबंधित प्रशासन जबाबदार नाही का असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
भिशी चालक व सभासद यांनी पैशांचं केलं तरी काय? - सर्व भिशी चालकांवर आरोप करण्यात आला नसला तरी काही भिशी चालकांनी भिशीच्या माध्यमातून आपल्या व आपल्या नातेवाईकांच्या नावे जमिनी घेतल्याचा आरोप महादेव सोमवंशी यांनी आपल्या फिर्यादीत केला आहे. शहरात भिशीचं स्तोम माजलं असताना काही चालकांनी आपलेच असलेले अनेक बोगस नंबर उचलून सभासदांची फसवणूक केली. आलेल्या रकमेतून चढ्या भावाने जमिनी खरेदी केल्या. काही चालक व सभासदांनी आलिशान घरेही बांधली. अनेकांनी खाजगी सावकारांकडे टक्केवारीने पैसे गुंतवले. अनेक चैनीच्या व महागड्या वस्तू खरेदी केल्या. शाही मेजवान्या, ट्रिपा, मोक्याच्या ठिकाणी जमिनी, प्लॉटिंग, आणखी बरंच काही केल्याचे बोलले जात आहे.
झटक्यात श्रीमंत करणारी ही अवैध यंत्रणा का बंद पडली? - कमी वेळेत, कमी कष्टात लाखोंचा फायदा मिळवण्याच्या दृष्टिकोनातून इंदापूर तालुक्यातील अनेकांनी लिलाव भिशित गुंतवणूक केली. मात्र भिशीची यंत्रणा ऐन शिखरावर असताना अचानक नोटबंदी झाली. पर्यायी भिशीच्या रकमेतून चढ्या भावात खरेदी केलेल्या जमिनी आणि बांधलेले आलिशान बंगले आणि प्लॉटिंगचे अचानक भाव उतरल्याने त्यांची विक्री ठप्प झाली. भिशी चालकांचे करोडो रुपये अडकले. नफा कमावण्यासाठी खाजगी सावकारांकडे चालकांनी गुंतवलेल्या रकमा अडकून पडल्या. काही खाजगी सावकार पळून गेले. अनेक भिश्यांच्या जंजालात सभासदांनीही अनेक भिश्या तोट्यात व चढ्या भावात उचलल्या. एक भिशी भरण्यासाठी दुसरी भिशी तोट्यात उचलली. त्यामुळे काही भिशी धारकांनाही गाव सोडावे लागले. हर भिशी चालक व सभासद एकमेकांना अटॅच असल्याने अनियंत्रित असलेले हे भिशीचे बेकायदेशीर चक्र अखेर बंद पडले. चालकांचा हव्यास आणि भिश्या उचललेल्या सभासदांकडे अडकलेली रक्कम, या व अशा अनेक कारणांनी लिलाव भिशीची यंत्रणा खड्डयात गेली.
भिशी धारकांवरही गुन्हे दाखल का होऊ नयेत? - भिशी बेकायदेशीर असल्याने भिशी चालक असो वा भिशी धारक कोणाबाबतही सहानुभूती दाखवण्याचं काहीच कारण नाही. व्याजावर आधारित या बेकायदेशीर यंत्रणेत आज चालक व सभासद असे दोन गट दिसत असले तरी एकेकाळी हे चांगले मित्र आणि भिशीच्या माध्यमातून गरजवंताच्या गरजेचा (डिव्हीडंट, बोनस) फायदा उचलणारे समभागीदार होते. त्यामुळे झटपट श्रीमंत होण्याच्या हव्यासापोटी गरजवंताच्या मुंड्या मुर्गळणारी ही बेकायदेशीर भिशी इंदापूर शहरात या सर्वांच्या माध्यमातून फोफावली होती यात दुमत नाही. त्यामुळे शासनाचा लाखोंचा कर बुडवून शासनाची फसवणूक करून बेकायदेशीर मार्गाचा अवलंब करणारे चालक व चालकांना बळ देणारे सभासद दोघांवर गुन्हे दाखल का होऊ नयेत? सभासदांची फसवणूक करणारे व बेकायदेशीर मार्गाने लाखो रुपयांची माया गोळा करणारे चालक आणि लाखो रुपये भरणारे सभासद दोघांच्या बेनामी मालमत्तेची, त्यांच्या उत्पन्नाच्या स्त्रोतांची, न भरलेल्या आयकराची (टॅक्स) चौकशी का होऊ नये? अशी प्रश्नात्मक चर्चा शहरात सुरू आहे.
मेजर सोमवंशी यांच्या प्रयत्नांना यश - खाजगी सावकारांच्या त्रासाला कंटाळून विषारी औषध पित एकाने आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर खऱ्या अर्थी भिशी प्रकरण अधिक हायलाईट झाले. अनेक वर्षांपासून अनेकांचं दुखणं असलेल्या या विषयाला वाचा फोडली ती शिवसेना शहर प्रमुख मेजर सोमवंशी यांनी. त्यांनी भिशीत फसवणूक झालेल्या नागरिकांच्या वारंवार बैठका घेतल्या. आतापर्यंत १६ जणांवर दाखल झालेला गुन्हा हा मेजर सोमवंशी यांच्याच प्रयत्नांचा भाग आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा