इंदापूरमधील वकिलाच्या मुलाला धारदार कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न; तब्बल ८ दिवसानंतर आरोपीला झाली अटक
भूतकाळातील पार्श्वभूमी पाहता इंदापूर शहरातील युवकांमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असून, लहान सहान कारणांवरून युवक टोकाची भूमिका घेताना दिसत आहेत. भूतकाळात टोळी संघर्षातून शहरात अनेकांचे खून देखील झाले आहेत. पोलीसांनी कठोर पाऊले उचलत जून महिन्यात पवार टोळीतील ५ जणांवर संघटित गुन्हेगारी (मोक्का) कायद्यांतर्गत कारवाई केली होती. मात्र, अद्यापही युवक कायद्याला जुमानत नसल्याचे दिसत असून, लवकरच इंदापूरचे मुळशी होईल की काय अशी भीती निर्माण झाली आहे.
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क
इंदापूर (११ जानेवारी) :- इंदापूर शहरातील प्रसिद्ध वकील ॲड. विलास (बंटी) बाब्रस यांचा मुलगा शंतनु विलास बाब्रस (वय २३ वर्ष) याच्यावर धारदार कोयत्याने वार करत त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार ३ जानेवारी रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास कसबा परिसरातील तांबडी शाळा या ठिकाणी घडला असून, धारदार कोयत्याने हल्ला करणाऱ्या ओम सोमनाथ तारगावकर (रा. महतीनगर, इंदापूर) या २० वर्षीय युवकाविरोधात इंदापूर पोलीस ठाण्यात ४ जानेवारीच्या रात्री आय.पी.सी. कलम ३०७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. काल आरोपीला अटक झाली आहे. या हल्ल्यात शंतनु बाब्रस गंभीर जखमी झाला असून, सध्या त्याच्यावर पुण्यातील संजीवनी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सविस्तर वृत्त असे की, ॲड. विलास बाब्रस यांचा काही दिवसांपूर्वी ओम तारगावकर या युवकाबरोबर किरकोळ कारणावरून वाद झाला होता. याचाच राग मनात धरून ओम तारगावकर याने ३ जानेवारीला रात्री ११ वाजण्याच्या सुमारास, आपल्या घराशेजारीच तांबड्या शाळेच्या कट्ट्यावर मित्रांबरोबर गप्पा मारत बसलेल्या शंतनु बाब्रस याच्या मानेवर धारदार कोयता ठेऊन "तुला व तुझ्या बापाला खलासच करतो" अशी धमकी देत कोयत्याने सपासप वार करायला सुरुवात केली. अभिजित कांबळे, पवन सुर्यवंशी आणि रवी जबडे या मित्रांच्या मदतीमुळे शंतनु या जीवघेण्या हल्ल्यातून बचावला असला तरी, या हल्ल्यात तो जबर जखम झाली आहे. इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर, मगर हॉस्पिटल व सध्या पुण्यातील संजीवनी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
हे देखील वाचा - तर अशाने ऐतिहासिक इंदापूरात ऐतिहासिक काहीच उरणार नाही
वार करून फेकून दिलेला कोयता दाखविण्याच्या बहाण्याने पोलीसांना चकमा देत फरार झालेल्या आरोपीला तब्बल ८ दिवसानंतर काल (१० जानेवारी) इंदापूर पोलीसांनी अटक केली आहे. वकिलाच्या मुलावर झालेल्या या जीवघेण्या हल्ल्यानंतर ५ जानेवारीला इंदापूर कोर्टातील वकिलांनी अर्धा दिवस काम बंद ठेऊन या हल्ल्याचा निषेध नोंदवला होता. आज आरोपीला इंदापूर न्यायालयात हजर करण्याची शक्यता असून, आरोपीपासून आपल्या व आपल्या कुटुंबाच्या जीवाला धोका असल्याचे ॲड. बाब्रस यांनी म्हटले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा