निमगाव केतकी बाह्यवळण - शेतकऱ्यांच्या आंदोलनाला किसान काँग्रेसचा पाठिंबा
| नायब तहसीलदार यांना निवेदन देताना काँग्रेसचे पदाधिकारी |
इंदापूर (२६ जानेवारी) - संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील निमगाव केतकी येथील नियोजित बाह्यवळणा विरोधात शेतकरी १०० पेक्षा जास्त दिवसांपासून आंदोलन करीत आहेत. आता या आंदोलनाला महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेस आणि इंदापूर काँग्रेसने आपला पाठिंबा दर्शविला असून, या संदर्भात सोमवारी (२४ जानेवारी) किसान कॉंग्रेस आणि इंदापूर काँग्रेसच्या वतीने इंदापूरच्या तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी, महाराष्ट्र प्रदेश किसान कॉंग्रेस सरचिटणीस तानाजी भोंग, इंदापूर तालुका कॉंग्रेसचे सरचिटणीस नितीन राऊत, संतोष शेंडे, राहुल आचरे, युवक काँग्रेसचे मिलिंद साबळे, अरुण राऊत, पोपट तरंगे आदी उपस्थित होते.
पालखी मार्गावर बारामती पासून इंदापूरपर्यंत कोणतेही बाह्यवळण नाही. मग अनेक अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या जमिनी संपादन करून त्यांना भूमिहीन करून बाह्यवळण बनवण्याचे काय औचित्य. या अनाकलनीय निर्णयाने स्थानिक छोट्या छोट्या अनेक व्यावसायिकांचेही मोठे नुकसान होणार आहे. १५ ऑगस्ट रोजी बाह्यवळण करु नये असा ग्रामसभेचा ठराव प्राधिकरणाला सादर केलेला असतानाही प्रशासन शेतकरी विरोधावर ठाम आहे. प्राधिकरणाने चालू रस्ता १०० फूट असताना ७० फूट दाखवून दिशाभूल केली, चालू रस्त्याच्या दक्षिण बाजूने असणाऱ्या जुन्या रस्त्याचा विचार केला नाही, Google Earth नकाशानुसार चालू रस्ता ३६०० मी. लांबीचा दाखविला, लांबीची दिशाभूल केली, रिअलाईनमेंट रस्त्याचे खोटे इस्टीमेट दाखवून दिशाभूल करण्यात आली, असे अनेक प्रश्न उपस्थित करत रिअलाईनमेंट रद्द व्हावे या मागणीसाठी निमगाव केतकी येथील अनेक अल्पभूधारक शेतकरी ३० सप्टेंबर पासून धरणे आंदोलन करीत आहेत.
राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस अखेरपर्यंत काळ्या कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीतील ऐतिहासिक, यशस्वी व हुकूमशाही केंद्र सरकारचा अहंकार तोडणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी होती हे संपूर्ण देशाने पाहिले आहे. शेतकरी दिल्लीतला असो अथवा गल्लीतला काँग्रेससाठी सर्व शेतकरी महत्वाचे आहेत. काँग्रेस नेहमीं शेतकऱ्यांच्या पाठीशी असून, किसान काँग्रेस निमगाव केतकी येथील शेतकऱ्यांच्याही पाठीशी खंबीरपणे उभी राहिल - तानाजी भोंग, सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेस
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा