तर अशाने ऐतिहासिक इंदापूरात ऐतिहासिक काहीच उरणार नाही

तलावाचा खचलेला भाग व लावलेले बॅरीगेट्स

चेतन चव्हाण (संपादक)

इंदापूर (७ जानेवारी) :- ऐतिहासिक इंदापूर शहरात भविष्यात ऐतिहासिक असं काहीच उरणार नसून, शाहू महाराजांच्या गुरूंचा वारसा असलेला भार्गवराम तलावाच्या दुरुस्तीचा प्रश्नही मागील एका वर्षापासून दुर्लक्षित आहे. तलावाच्या पूर्वेकडील भिंत सप्टेंबर (२०२०) महिन्यात झालेल्या अतिृष्टीमुळे ढासळली होती. प्रशासनाने त्वरा करत धोकादायक बनलेल्या भागाला बॅरिगेट्स लावून सुरक्षित केले खरे, मात्र एका वर्षांनंतरही परिस्थिती जैसे थे असून, ऐतिहासिक तलावाची दुरावस्था, वाहतुकीला अडथळा आणि अपघाताच्या शक्यतांमुळे नागरिकांमध्ये नाराजी असल्याचे दिसत आहे. दुरूस्तीचे काम निधीअभावी रखडले असल्याचे स्पष्टीकरण देत नगराध्यक्षांनी प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना पाठवला असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता ऐतिहासिक तलावाच्या डागडुजीसाठी आणि रस्त्यावरील वाहतूक सुरळीत होण्यासाठी इंदापूरकरांना जिल्हाधिकारी मेहेरबान होण्याची वाट पाहावी लागणार आहे.

भार्गवराम तलावाला ३०० पेक्षा जास्त वर्षांचा इतिहास आहे. असे म्हटले जाते की, सन १७१० मध्ये पडलेल्या दुष्काळात छत्रपती शाहू महाराज आणि पहिले बाजीराव पेशवे यांचे गुरू ब्रह्मेंद्रस्वामी धाडवशीकर यांनी या तलावाची निर्मिती केली होती. येथे भार्गवराम ऋषींनी तपसाधना केल्यामुळे तलावास त्यांचे नाव देण्यात आले होते. पावसाळ्यात तलाव तुडुंब भरून तलावातील पाण्याच्या निचऱ्याचा फायदा शहरातील छोट्या छोट्या आड आणि विहिरींना व्हायचा. त्यामुळे प्रत्येक गल्लीत नागरिकांना पिण्यासाठी व वापरासाठी आड व विहिरींचे

खचलेल्या भागाची पाहणी करताना नगराध्यक्षा
थंडगार पाणी वर्ष-भर उपलब्ध व्हायचे. परंतु ऐतिहासिक तलावाची झालेली बाग इंदापूरकरांच्या पथ्यावर पडली नाही. बाग म्हणूनही फारसा उपयोग नागरिकांना झाला नाही. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मालोजीराजेंची गढी आज भुईसपाट झालेली दिसून येते, तर गढी शेजारील घोड्या व हत्तींना पाणी पिण्यासाठीच्या पुरातन टाक्याही नामशेष झाल्या आहेत. रामवेसच्या तटबंदीचा एक एक दगड निखळून तटबंदी धोकादायक बनली आहे. इंदापूरातील उरल्यासुरल्या ऐतिहासिक बाबी अजूनही दुर्लक्षित राहिल्या तर ऐतिहासिक इंदापूरात ऐतिहासिक असं काहीच उरणार नाही.

एक एक दगड निखळून धोकादायक झालेली रामवेशीची तटबंदी
खचलेल्या भिंतीला खेटून खोदलेल्या केबलच्या चारीत पावसाचे पाणी मुरल्याने भिंत ढासळली. अपघाताच्या शक्यतांमुळे ढासळलेल्या भिंतीकडेला लावलेल्या बॅरिगेट्समुळे बाजूचा रस्ता एकेरी झाला. त्यात अर्धा खराब. तलावाच्या आसपासच्या परिसरात शासकीय व खाजगी रुग्णालये, व्यापारी गाळे, प्रशासकिय कार्यालये असून, खाजगी व शासकीय रुग्णालयात ये जा करण्यासाठी रुग्णवाहिका चालक बहुतेकदा याच शॉर्टकट मार्गाचा अवलंब करतात. त्यामुळे या रस्त्यावर नेहमी पादचारी व वाहनांची वर्दळ असते. मात्र, बॅरिगेट्समुळे गेली वर्षभर वाहतूक एकेरी सुरू आहे. त्यामुळे खाजगी वाहनांसह रुग्णवाहिकांच्या वाहतुकीस अडथळे निर्माण होत आहेत, तर रात्री अपरात्री अपघात. काही मोजक्या बाबी वगळता नगरपरिषदेच्या कामकाजाचा मागील ५ वर्षांचा कार्यकाळ पाहता वरील समस्या नगरपरिषद प्रशासन लवकर सोडवेल अशी अपेक्षा इंदापूरकर करत आहेत.

दुर्लक्षामुळे मालोजीराजेंच्या गढीची झालेली अवस्था
भार्गवराम तलावाच्या ढासळलेल्या भिंतीच्या दुरुस्ती संदर्भात निधीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना पाठवला आहे. नगरपरिषद प्रशासन यासंदर्भात सकारात्मक असून, आम्ही याचा पाठपुरावा करून ही समस्या लवकरात लवकर सोडवू.
(अंकिता शहा, नगराध्यक्षा, इंदापूर नगरपरिषद)


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट