कधीतरी साऊची सावली होऊन पाहावं - स्वाती लोंढे - चव्हाण
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
💐💐 साऊची सावली 💐💐
कधीतरी साऊची सावली होऊन पाहावं....!!
अन् स्वतःच्या अस्तित्वाचं भान घेऊन जगावं....!!
महालक्ष्मी,वैभवलक्ष्मी,
व्रतवैकल्ये अन् उपास-तापास;
या सगळ्यांच्या फेर्यात,
लागला का कधी तुझ्याच अस्तित्वाचा तपास?
कधीतरी साऊची सावली होऊन पाहावं....!!!
भान-जाण आणि ज्ञान,
साऊ-ज्योतीनं दिलं,
शबरी आणि शनीचा,
मग कशाला हवा हव्यास??
का करून घ्यावा स्त्रीत्वाचा उपहास??
कधीतरी साऊची सावली होऊन पाहावं...!!
मुक्ताच्या सवालातून
व्यक्त होऊन पाहावं!
परंपरेच्या बेड्या तोडून,
तिमिरातून तेजाकडे पाहावं!
फातिमाच्या साथीनं
विद्येचं बीज अंकुरावं!!!!
कधीतरी साऊची सावली होऊन पाहावं.....!!!
चूल-मूल,भोग-उपभोग,
अन् मढ्यावरचं जळणं
मुंडन,खंडण आणि अपमान,
हेच होतं ना जगणं?
मग विद्येची देवता
सरस्वतीलाच का मानावं??
कधीतरी साऊची सावली होऊन पाहावं.....!!
पुराणातल्या सावित्रीनं
हतबलताच शिकवली..
पण जोतिबाच्या साऊनं लढण्याची ऊर्मी दिली...
तू लावलीस ज्योत,
मी वणवा होईन;
ही ऊर्मी घेऊन जगावं,
अन् संघर्षाचा फकीर व्हावं!!
कधीतरी साऊची सावली होऊन पाहावं.....!!!
स्त्रीला विद्येचा अधिकार
नाकारणार्यांच्या मुस्कटात मारलेली चपराक होती साऊ;
यशवंताच्या ममत्वाची भूक होती साऊ!!
त्या अन्यायाच्या प्रतिकाराची हाक
होऊन पाहावं!!
कधीतरी साऊची सावली होऊन पाहावं.....!!
तुझ्या अस्तित्वाचं भान
अन् अस्मितेची जाण;
अक्षर-अक्षर शब्दांचं मोती,
प्रत्येक लेक उजळून निघाली,
जशी साऊ-ज्योती,
त्या ज्योतीची मशाल होऊन उजळावं!!
कधीतरी साऊची सावली होऊन पाहावं.....!!
कधीतरी साऊची सावली होऊन पाहावं.....!!!
अन् स्वतःच्या अस्तित्वाचं भान घेऊन जगावं.....!!!
स्वाती लोंढे- चव्हाण (मो. 7350223000)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा