Indapur Crime Report - आंबे विक्री करण्याच्या बहाण्याने आले आणि २८ लाखांचे दागिने चोरून पसार झाले; खडकपुऱ्यावरील साई समर्थ सोन्या चांदीच्या दुकानावर चोरट्यांचा डल्ला

 

मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क

इंदापूर (३० एप्रिल) :- आंबे विक्री करण्याच्या बहाण्याने आलेल्या दोघा जणांनी इंदापूर शहराच्या खडकपुरा परिसरात असणाऱ्या साई समर्थ ज्वेलर्स हे सोन्या चांदीचे दुकान फोडून तब्बल २८ लाखांचे दागिने लंपास केल्याची खळबजनक घटना २८ एप्रिलच्या मध्यरात्री घडली. या घटनेत संशयाची सुई साई समर्थ दुकानाशेजारीच आंबे विक्री करणाऱ्या सलीम शेख नूर मोहम्मद आणि त्याचा साथीदार अमित कासार यांच्याकडे जात असून, इंदापूर पोलिसांचे पथके या दोघाही संशयितांच्या मागावर रवाना झाली आहेत. साई समर्थ ज्वेलर्सचे मालक राहुल महादेव शहाणे (रा. माळवाडी नं १, ता. इंदापूर) यांच्या फिर्यादीवरून या दोघा संशयितांविरोधात इंदापूर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहुल शहाणे यांनी गुरुवारी (२८ एप्रिल) सकाळी १० वा. दुकान उघडल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. चोरट्यांनी काऊन्टरच्या शोकेस आणि डिस्प्लेमध्ये लावलेले सोन्या चांदीचे तब्बल २८ लाखांचे दागिने लंपास केले असून, यामध्ये ३०० ग्राम सोन्याचे आणि ३० किलो चांदीच्या दागिन्यांचा समावेश आहे. चोरट्यांनी दुकानात असलेल्या स्ट्राँग रुमच्या दरवाज्याचा पत्रा गॅस कटरच्या सहाय्याने कट करून लॉकर फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्याचे दिसून आले. चोरी करण्यापूर्वी दुकानातील CCTV कॅमेराही चोरट्यांनी बंद केला होता.

आंबे विक्री करण्याच्या बहाण्याने आलेल्या सलीम शेख आणि अमित कासार यांच्यावर संशय

सलीम शेख नूर मोहम्मद आणि अमित कासार या दोघा जणांनी आंब्याचे व्यापारी असल्याच्या बहाण्याने अविनाश वाघ (रा. इंदापूर) यांची साई समर्थ ज्वेलर्स शेजारीच असलेला गाळा आणि त्यावर असलेली रूम एका महिन्यापूर्वी भाड्याने घेतली होती. चोरीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर राहुल शहाणे यांनी पहिल्या मजल्यावर जाऊन पाहणी केली असता त्यांना चोरट्यांनी गॅलरीला लावलेले प्लायवूड व त्यापाठीमागे असणाऱ्या ग्रिलचे लोखंडी गज कापलेले दिसले. ग्रिलचे कापलेले लोखंडी गज, प्लायवूड आणि सोन्या चांदीचे दागिने ठेवलेल्या रिकाम्या पिशव्या दोघा संशयितांच्या रुममध्ये आढळून आल्या. त्यामुळे आंबे विक्रीच्या बहाण्याने आले आणि २८ लाखांचे दागिने घेऊन पसार झाले अशीच काहीशी चर्चा शहरात सुरू आहे.

चोरट्यांनी दुकानात कसा केला प्रवेश?

शहाणे यांच्या दुकानाच्या वर त्यांच्या मालकीच्या घराच्या बाल्कनीमधील गॅलरीला लावलेले प्लायवूड आणि त्यामागील ग्रिल कापून किचन रुमकडे प्रवेश केला. किचन रुमला असलेल्या खिडकीतून किचनमध्ये प्रवेश केला. तदनंतर किचनमधील जिन्याच्या साहाय्याने तळमजल्यावरील ज्वेलरीच्या दुकानात प्रवेश केला.

(विनंती - कृपया परवानगी शिवाय बातमी कॉपी पेस्ट करू नये.)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट