शिक्षक सोसायटीच्या निवडणुकीत हर्षवर्धन पाटील समर्थक शिक्षक विकास पॅनलचा सुपडा साफ; आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी धोक्याची घंटा
इंदापूर (२५ एप्रिल) :- इंदापूर तालुक्यातील विविध शिक्षक संघटनांची मूठ बांधत स्वाभिमानी शिक्षक परिवर्तन पॅनलने इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक सह. पतसंस्थेच्या सत्ताधारी शिक्षक विकास पॅनलची १५ वर्षांची निर्विवाद सत्ता अखेर उलथवून टाकत हर्षवर्धन पाटील समर्थक शिक्षक विकास पॅनलचा सुपडा साफ केला. २१ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत राज्यमंत्री दत्तात्रय भरणे समर्थक स्वाभिमानी शिक्षक परिवर्तन पॅनलने सर्वच्या सर्व जागा जिंकत पाटील गटाला सपशेल व्हाईट वॉश दिला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये तालुक्याचा कल कुठे असणार याचा अंदाज देणाऱ्या या निवडणुकीत सत्ताधारी शिक्षक विकास पॅनलचा झालेला हा एकतर्फी पराभव हर्षवर्धन पाटील यांना मोठा धक्का मानला जात आहे.
स्वाभिमानी शिक्षक परिवर्तन पॅनलने तालुक्यातील महाराष्ट्र राज्य शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटना, इब्टा आणि शिक्षक भारती या चार शिक्षक संघटनांची मूठ बांधत सत्ताधाऱ्यांविरोधात तगडे आव्हान उभे केले होते. पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक ११ टक्क्यांनी सी.सी. देत असताना सत्ताधाऱ्यांनी इंदापूर अर्बन बँकेकडून १५ टक्क्यांनी ८ कोटी रुपये कर्ज घेऊन संस्थेचे नुकसान करण्याचे कारण काय असा सवाल करत स्वाभिमानी शिक्षक परिवर्तन पॅनलने सत्ताधाऱ्यांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह आणि भ्रष्टाचाराचे अनेक आरोप केले होते. 'हम करे सो कायदा' याप्रमाणे मनमानी पद्धतीने वागणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्ट कारभाराविरोधात तालुक्यातील शिक्षकांमध्ये प्रचंड रोष असल्याचे बोलले जात होते.
काल पार पडलेली ही निवडणूक प्रक्रिया तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांपुरती मर्यादित असली तरी, साडे नऊशेच्या आसपास असणारा महिला व पुरुष शिक्षक मतदार मात्र संपूर्ण तालुक्याच्या जवळपास सर्वच भागातील आणि वेगवेगळ्या घटकातील होता. त्यामुळे ही निवडणूक आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये तालुक्यातील मतदारांचा कल कोणत्या दिशेने असेल याचा अंदाज देऊन जाणार असल्याची चर्चा निवडणुकीपूर्व सुरू होती. तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका २०२४ मध्ये होणाऱ्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीची रंगीत तालीम ठरणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे साहजिकच शिक्षक सोसायटीच्या कालच्या निवडणुकीला वेगळेच महत्व प्राप्त झाले होते. काल शिक्षक मतदारांनी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या बाजूने दिलेला कौल भरणे समर्थक गटात जल्लोष निर्माण करणारा, तर पाटील समर्थक गटात चिंतेचे वातावरण निर्माण करणारा ठरला आहे. त्यामुळे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा