खा. सुप्रिया सुळे इंदापूरचा उल्लेख संसदेत करणार; नरेंद्र मोदींनाही देणार इंदापूर भेटीचे आमंत्रण
इंदापूर (२१ एप्रिल) :- गुजरात हे विकासाचं मॉडेल असल्याचे सांगत गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि एकूणच भाजपने २०१४ साली केंद्रात सत्ता मिळवली. 'सबका साथ सबका विकास' हा नारा देणाऱ्या नरेंद्र मोदींनाच आता आपण विकास काय असतो हे बघण्यासाठी इंदापूर भेटीचे आमंत्रण देणार असल्याचे संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. सोबतच एक आदर्श शहर आणि विकासाचं मॉडेल कसं असावं या संदर्भात आपण आवर्जून इंदापूर शहराचा उल्लेख संसदेत करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. इंदापूर शहरातील १० कोटींच्या विविध विकास कामांच्या भूमिपूजन आणि उद्घाटन सोहळ्या संदर्भात त्या रविवारी (१७ एप्रिल) इंदापूर येथे आल्या होत्या.
जुमला ठरलेल्या 'सबका साथ सबका विकास' या नाऱ्याआधारे २०१४ साली भाजपने केंद्रातील सत्ता काबीज केली. यावेळी विकासाचं मॉडेल म्हणून गुजरातला प्रमोट करण्यात आले. गुजरातचे त्यावेळचे मुख्यमंत्री व आजचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना आपण विकासाचं मॉडेल नक्की कसं असतं हे दाखवण्यासठी इंदापूर भेटीचे निमंत्रण देणार असल्याचे खा. सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. त्यामुळे खरंच त्या संसदेत इंदापूरचं नाव उल्लेखणार का? मोदींना निमंत्रण देणार का? दिलं तर मोदी ते स्वीकारणार का? असे सवाल इंदापूरकरांना पडू लागले आहेत. सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मंत्रिपदाच्या मागील दोन वर्षांच्या कार्यकाळात कोट्यवधीचा निधी इंदापूर तालुक्याला मिळाला आहे. या निधीतून विकास कामांचा धडाका सुरू असून, विकासाचं मॉडेल कसं असावं या संदर्भात इंदापूरचे नाव आपण संसदेत काढणार असल्याचेही सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. शहरातील वेगवेगळ्या चौकांत बसवण्यात आलेली विठ्ठलाची भव्य मूर्ती, वारकरी मूर्ती, सुंदर परी, डाळिंब, मालोजीराजेंचा पुतळा, तालुक्यातील रस्ते, सेतू भवन, नृसिंहपूरचा विकास ही लक्षवेधी कामे बघून आम्ही केवळ नावाला स्मार्ट नसून कृतीमध्येही आम्ही स्मार्ट असल्याचे सिद्ध होत असल्याचेही सुळे यांनी म्हटले आहे.
इंदापूर शहरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या नवीन वर्ग खोल्यांचे, इंदापूर तहसील कार्यालयातील अभिलेख कक्ष सेतू कार्यालयाचे उद्घाटन, तसेच शहरातील चौक सुशोभीकरण आणि पथदिव्यांचे उद्घाटन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली खा. सुप्रिया सुळे यांच्या हस्ते रविवारी पार पडले. यावेळी, प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, तर तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, कार्याध्यक्ष अतुल झगडे, शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, महिला तालुकाध्यक्षा छाया पडसळकर, महिला शहराध्यक्षा उमा इंगोले, माजी नगराध्यक्ष विठ्ठल ननवरे, शहर युवक अध्यक्ष इम्रान शेख, अमोल भिसे, शुभम निंबाळकर, धनंजय बाब्रस, श्रीमंत ढोले, दीपक जाधव, दिलीप वाघमारे, श्रीधर बाब्रस, हामा पाटील, सचिन खामगळ, अक्षय कोकाटे, नवनाथ रुपनवर, राजेंद्र गलांडे, सुभाष डरंगे, धनंजय वैद्य, आण्णासाहेब धोत्रे आदी उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा