दरोड्यातील आरोपी इंदापूर पोलिसांकडून काही तासांतच जेरबंद

 

पोलीस खात्याची मान उंचवणाऱ्या या लाजवाब कामगिरीचे सर्वत्र कौतुक

समीर सय्यद (उप संपादक)

इंदापूर (६ एप्रिल) :- इंदापूर तालुक्यातील लोणीदेवकर गावाच्या हद्दीत डोंगरे सरपंचवस्ती येथे सोमवारी (४ एप्रिल) रात्री पडलेल्या सशस्त्र दरोड्यानंतर अवघ्या काही तासांत दरोडेखोरांच्या मुसक्या आवळण्याची दमदार कामगिरी इंदापूर पोलिसांनी केली. आनंद सहदेव डोंगरे यांच्या घरावर चार अज्ञात दरोडेखोरांनी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास टाकलेल्या या सशस्त्र दरोड्यात चाकूचा धाक दाखवून रोख रकमेसह तब्बल दीड लाखांचा ऐवज दरोडेखोरांनी लुबाडला होता. या दरोड्याची माहिती मिळताच इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तय्यब मुजावर यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर पोलिसांनी तात्काळ सूत्रे हलवत अवघ्या काही तासांतच दोघा दरोडेखोरांना बेड्या ठोकत चोरलेल्या ऐवजासह ६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. तर अन्य दोघा आरोपींच्या बाबत 'पुलिस के हाथ जल्द ही उनकी गर्दन तक होंगे' असा विश्वास पोलीस निरीक्षक तय्यब मुजावर यांनी व्यक्त केला आहे.

दरोडेखोरांनी डोंगरे यांच्या घरातील सदस्यांना मारहाण करत चाकूच्या धाकाने रोख रक्कम, सोन्याचे दागिने व चार मोबाईल असा एकूण दीड लाखांचा ऐवज लुबाडला होता. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक तय्यब मुजावर यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत दरोडाग्रस्तांनी दिलेल्या माहितीआधारे तात्काळ तपासाची सूत्रे हलवत करमाळा तालुक्यातील खांबेवस्ती नजिक दरोड्यात वापरण्यात आलेल्या पांढऱ्या स्कॉर्पिओसह (एम एच १३ एसी ०२९६) दोघा दरोडेखोरांना चोरीच्या मुद्देमालासह मंगळवारी पहाटे ४.३०-५.०० वाजण्याच्या दरम्यान जेरबंद केले. पोलीस खात्याची मान उंचावणाऱ्या इंदापूर पोलिसांच्या या लाजवाब कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

या कारवाईत पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूरचे पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय लिगाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर धनवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील, फौजदार सुधीर पाडुळे, पोलीस नाईक सलमान खान, पोलीस नाईक मोहम्मद अली मड्डी, पोलीस कॉन्स्टेबल विकास राखुंडे, पोलीस शिपाई जगदीश चौधर, पोलीस शिपाई विशाल चौधर आदींनी सहभाग घेतला असून, या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माने करत आहेत.

अनेक अडचणीनंतरही पोलिसांनी दरोडेखोरांना कशा पद्धतीने केले जेरबंद?

माहिती मिळाल्यानंतर अवघ्या ५-७ मिनिटांत घटनास्थळी पोहोचत पोलीस निरीक्षक तय्यब मुजावर यांनी तात्काळ पोलिसांची ४ पथके आरोपींच्या शोधात रवाना केली. तात्काळ वेगवेगळ्या ठिकाणांची सि.सि.टी.व्ही फुटेज तपासण्यात आले. सरडेवाडी टोलनाक्यासह सोलापूर दिशेसह अन्य दिशेच्या टोल नाक्यांच्या सि.सि.टी.व्ही फुटेजमध्ये डिटेक्ट झालेल्या पांढऱ्या रंगाच्या अनेक स्कॉर्पिओ गाड्यांमधून संशयितांची गाडी शोधणे कठीण होते. असे असतानाही अर्धवट नंबर असलेल्या गाडी भोवती तपासाची सूत्रे एकत्र करत संशयित गाडीचा पाठलाग करण्यात आला. स्वतः लीड करत असलेल्या तय्यब मुजावर यांच्या पथकाने मोहोळ, माढा, कुर्डुवाडी, करमाळा अशा अनेक ठिकाणी दरोडेखोरांचा शोध घेतला. अनेक अडचणीनंतरही अखेर पहाटे ४.३०-५.०० वा. दरम्यान करमाळा तालुक्यातील खांबेवस्तीनजीक चोरीचा ऐवज, दरोड्यात वापरण्यात आलेली स्कॉर्पिओ आणि दोघा संशयित दरोडेखोरांना पोलिसांनी जेरबंद करत 'पुलिस के हाथ कितने लंबे होते है' याची चुणूक दाखवून दिली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट